पुणे – राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी अधिक प्रक्रिया शुल्क आकारून रुग्णांची लूट करणार्या रक्तपेढ्यांविषयी नवीन अधिसूचना प्रसारित केली आहे. रक्त आणि प्लाझ्मा देण्यासाठी ठरवून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारणार्या खासगी रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय आणि राज्य संक्रमण परिषदेच्या संचालकांना या दंडात्मक कारवाईचे अधिकार देण्यात आले.
थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकल सेल आणि रक्ताशी संबंधित आजारांच्या रुग्णांना रक्त नाकारणे, अधिक प्रक्रिया शुल्क घेणे, ई-रक्तकोश आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या (एस्.बी.टी.सी.) संकेतस्थळावर रक्तसाठ्याविषयी प्रतिदिन माहिती न भरणे, प्लाझ्मा देण्यासाठी अवाजवी रक्कम आकारणे अशा विविध प्रकारच्या तक्रारींवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांनी सांगितले.
दंडात्मक कारवाईपूर्वी रक्तपेढ्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, तसेच वारंवार नियमांचे उल्लंघन करणार्या रक्तपेढ्यांचे परवाने अन्न आणि औषध प्रशासनाकडून रहित करण्यात येतील.