वीजदेयकांविषयीच्या तक्रारींचे निवारण होत नाही, तोपर्यंत वीजदेयके भरणार नाही ! – भाजपची मोर्च्याद्वारे चेतावणी

वीजदेयकांचा प्रश्‍न गेले अनेक मास वारंवार पुढे येत आहे ! प्रशासन त्यावर तत्परतेने काही तोडगा का काढत नाही ?

सावंतवाडी – दळणवळण बंदीच्या काळात वीज वितरण आस्थापनाकडून आलेल्या वाढीव आणि अन्यायकारक वीजदेयकांच्या विरोधात सावंतवाडी शहर भाजपकडून येथील वीज वितरण आस्थापनाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी ‘अन्यायकारक वीजदेयकांविषयी जोपर्यंत तक्रारींचे निवारण होत नाही, तोपर्यंत वीजदेयके भरली जाणार नाहीत. देयक न भरल्यास वीजजोडणी तोडली, तर चालणार नाही’, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली.

भाजपच्या वतीने वीजदेयकांच्या विरोधात राज्यात आंदोलने केली जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातही आंदोलन केले जात आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी वीज वितरण आस्थापनाचे कार्यकारी उपअभियंता एस्.एस्. भुरे यांना घेराव घालून खडसावण्यात आले.

‘दळणवळण बंदीच्या काळात ‘मीटर रिडिंग’ न घेता सरासरीप्रमाणे वीजदेयके काढण्यात आली; मात्र ती चुकीच्या पद्धतीने आणि अवाजवी काढण्यात आली. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. ज्यांची वीजदेयकाविषयी तक्रार नाही, त्यांनी वीजदेयक भरल्यास आमचा आक्षेप नाही; मात्र ज्यांच्या तक्रारी आहेत, त्यांच्या तक्रारींचे निवारण झाले पाहिजे. वीज ग्राहकांवर देयक भरण्यास बळजोरी केलेली खपवून घेणार नाही’, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली.