सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर प्रशासक नेमा ! – रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस, भाजप

आमदार रवींद्र चव्हाण

कणकवली – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा (जिल्हा बँकेचा) कारभार पहाता बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. ‘ऑडिट पॉईंट’ असतांना चुकीच्या पद्धतीने नोकरभरती चालू आहे. खोट्या हजेरी पुस्तकावर (मस्टरवर) खोट्या स्वाक्षर्‍या घेतल्या जात आहेत. हा गुन्हा असून सरकारने यामध्ये लक्ष घालून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.

येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘मुळातच जिल्हा बँकेत कर्मचारी अधिक आहेत. नव्याने कर्मचार्‍यांची भरती करू नये, असा ‘ऑडिट पॉईंट’ आलेला असतांना बँकेवरील सत्ताधारी गैरकारभार करत आहेत. बँक संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाल संपलेला असून अधिकार नसतांना लोकांना नोकरीचे आमीष दाखवून खोट्या स्वाक्षर्‍या घेतल्या जात असून याद्वारे फसवणूक केली जात आहे.’’