कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वतःसाठी नामजप न करता ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे साधक यांच्यासाठी नामजप करणार्‍या श्रीमती शुभा (स्मिता) राव !

कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वतःसाठी नामजप न करता ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे साधक यांचे आरोग्य चांगले रहावे’, यासाठी नामजप करणार्‍या पणजी (गोवा) येथील श्रीमती शुभा (स्मिता) राव !

श्रीमती शुभा राव

​मी सकाळी पूजा केल्यावर नामजप करायला आरंभ केला. त्या वेळी मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. त्यांना पाहून ‘हा नामजप त्यांच्यासाठीच करूया’, असे मला वाटले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना वाईट शक्तींचा कोणताही त्रास होऊ नये. या नामजपामुळे त्यांच्याभोवती संरक्षककवच निर्माण होऊ दे. त्यांचे सर्व चांगले होऊ दे’, अशी प्रार्थना करून ४ दिवस सकाळी मी त्यांच्यासाठी जप केला आणि संध्याकाळी सनातनच्या साधकांसाठी हा नामजप केला.

​एका साधकाला मी हे सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही स्वतःच्या मनाने करू नका. कुणालातरी विचारा.’’ त्या वेळी रामनाथी आश्रमातील पू. पृथ्वीराज हजारे यांना भ्रमणभाष केला. मी त्यांना विचारले, ‘‘सध्या सर्वांना आणि सनातनला परात्पर गुरु डॉक्टरांची आवश्यकता आहे. असे संत आपल्याला हवे आहेत. त्यामुळे स्वतःसाठी हा नामजप करण्यापेक्षा परात्पर गुरु डॉक्टरांसाठी नामजप केला, तर सर्वांना जास्त लाभ होईल’, असे मला वाटले. मी परात्पर गुरु डॉक्टरांसाठी नामजप करत आहे. ते योग्य आहे का ?’’ त्यावर पू. हजारेभाई म्हणाले, ‘‘हो. तुमचे योग्य आहे.’’ त्यांनी ‘हो’ म्हटल्यावर मला बरे वाटले. मी आता पुन्हा मनापासून जप करत आहे.

प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) मला नेहमी म्हणायचे, ‘‘तुला काही हवे ते माग’’; पण मला त्यांच्याकडे ‘माझ्यासाठी किंवा माझ्या मुलांसाठी काही मागावे’, असे कधीच वाटले नाही. आता आई आपल्या मुलासाठी काहीतरी मागते, त्याप्रमाणे वात्सल्यभाव माझ्या मनात येऊन ‘परात्पर गुरु डॉक्टरांसाठी मागावे. त्यांचे चांगले व्हावे’, असे विचार माझ्या मनात येतात. ‘परात्पर गुरु डॉक्टर प.पू. बाबांचा अवतार आहेत’, असे मला सतत वाटते.

माझी काही चूक झाली असेल, तर मला क्षमा करावी.’

– श्रीमती शुभा राव (प.पू. भक्तराज महाराज यांनी ठेवलेले नाव) (श्रीमती स्मिता राव) पणजी, गोवा. (३०.३.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक