खरी लोकशाही आणण्यासाठी सरकारला झुकवणारी शक्ती उभी करा ! – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

नगर – आंदोलनांच्या माध्यमातून जनमताचा रेटा सिद्ध केल्यास त्याला घाबरून सरकार जनतेच्या मागण्या मान्य करते. त्यामुळे आता लोकपालप्रमाणे ग्रामसभेला अतिरिक्त अधिकार देणारा कायदा करून घेण्यासाठी देशातील जनतेने देशव्यापी शक्ती निर्माण करावी. खर्‍या अर्थाने लोकशाही आणायची असेल, तर सरकारला झुकवणारी शक्ती उभी करा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने हजारे यांनी एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. त्याद्वारे त्यांनी जनतेला संबोधित केले.

हजारे पुढे म्हणाले, ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली, तरीही आपल्या देशातील पक्ष पद्धतीमुळे शासनकर्त्यांनी जनतेला खरी लोकशाही मिळू दिली नाही. ‘देशात संसद, राज्यात विधानसभा तशी गावात ग्रामसभा आणि शहरात वॉर्डसभा अशी रचना करणारा कायदा करा’, अशी आमची मागणी आहे. या मागण्यांसाठी सरकारवर अहिंसेच्या माध्यमातून दबाव आणावा लागेल.’’

‘सरकार पालटण्याची चावी मतदारांच्या हातात असते. त्यामुळे लोकसभा, विधानसभा ऐकत नसेल, तर मतदारांनी अशा पक्षाच्या लोकांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. ग्रामसभा ही लोकशाहीत महत्त्वाची आहे, हे लोकांना पटवून देऊन जागृत करण्याची आवश्यकता आहे. लोकपालच्या मागणीच्या वेळी जनता जशी जागृत झाली होती, तसे आता पुन्हा झाल्यास लोकशाही मजबूत करणारा कायदा होऊ शकेल’, असेही अण्णा हजारे म्हणाले.