आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे दर अल्प झाले !

नवी मुंबई – वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारपेठेमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक वाढू लागल्याने भाजीपाल्यांचे दर ५० टक्क्यांनी अल्प झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

२४ नोव्हेंबर या दिवशी भाजीपाल्याच्या ६३० गाड्यांची आवक झाली आहे. घाऊक बाजारात दर २० ते ३० रुपये किलो तर किरकोळ बाजारातील दर ४० ते ६० रुपये किलो झाले आहेत. १५ दिवसांपूर्वी हेच दर १०० रुपयांच्यावर पोचले होते. कांद्याच्या दरात विशेष पालट झाला नाही. कांदा ६० ते ८० रुपये किलोने विकला जात आहे. महाराष्ट्रामधील नाशिक, नगर, सांगली, कोल्हापूर येथून, तर परराज्यातील कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात येथून भाज्या येत असल्याने आवक वाढली आहे.

किरकोळ भाजीपाल्याचे प्रतिकिलो दर पुढील प्रमाणे आहेत. कारले, वांगी, फरसबी, कोबी, फ्लॉवर प्रत्येकी ४० रुपये आहेत.
पालेभाज्या (जुडी) : कोथिंबीर १० ते १५ रुपये, पालक १० रुपये, मेथी १५ रुपये.