एका शहरातील साधकांची पोलिसांकडून चौकशी

सनातनच्या साधकांच्या मागे पोलीस चौकशीचा ससेमिरा चालूच ! वेगवेगळ्या कारणांखाली साधकांची चौकशी करणार्‍या पोलिसांनी अशी चौकशी कधी आतंकवाद्यांची केली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !

१. २६.१०.२०२० या दिवशी एका शहरातील एका साधिकेची पोलिसांनी भ्रमणभाषवरून चौकशी केली. या वेळी पोलिसाने ‘तुम्ही अजून सनातनचे करता का ?’, असा प्रश्‍न विचारला. त्या वेळी साधिकेने ‘मी दळणवळण बंदीमुळे कुठे बाहेर जात नाही’, असे सांगितले. यावर पोलीस म्हणाले, ‘‘आम्हाला वरिष्ठांकडून ६ मासांतून एकदा चौकशी करायला सांगितली जाते. त्यामुळे सहज म्हणून चौकशी केली. यात तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही.’’

२. एका शहरातील साधिकेची नुकतीच स्थानिक २ महिला पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीच्या वेळी पुढील संभाषण झाले.

पोलीस : तुम्ही सनातन संघटनेचे कार्यकर्ते आहात ना ? आम्ही सर्व संघटनांची माहिती घेत आहोत. त्यामुळे आम्ही सहजच ही माहिती घेत आहोत.

(या वेळी साधिकेने त्यांचे ओळखपत्र पाहून दोन्ही महिला पोलीस असल्याची खात्री केली.)

साधिका : सध्या दळणवळण बंदी आहे, तसेच माझी तब्येत बरी नसते. त्यामुळे मी बाहेर जात नाही.

पोलीस : मग सध्या काय करता ?

साधिका : ऑनलाईन सत्संग असतात. ते कधीतरी ऐकते. तुम्ही माझी अशी चौकशी का करता ?

पोलीस : आम्ही चौकशी करत नाही. अन्य संघटनांप्रमाणे केवळ माहिती घेत आहोत.

३. नुकतीच शहरातील पोलीस ठाण्यातून एका पोलीस अधिकार्‍यांनी एका साधकाची भ्रमणभाषवरून चौकशी केली. या वेळी पुढीलप्रमाणे संभाषण झाले.

पोलीस अधिकारी : एकदा तुमची धावती भेट घ्यायची होती. तुमची ओळख असलेली बरी.

साधक : तुम्हाला माझा संपर्क क्रमांक कुणाकडून मिळाला ?

पोलीस : मी विशेष शाखेत असल्यामुळे माहिती घ्यावी लागते. जनतेच्या संपर्कात रहावे लागते. त्यामुळे कामे करण्यात अडचणी येत नाहीत. त्यामुळे आपली एकमेकांशी ओळख आणि विचारांची देवाणघेवाण असलेली बरी. तुम्ही शहरातच आहात कि कुठे बाहेरगावी ?

साधक : सध्या मी शहरातच आहे.

साधकांना सूचना

पोलीस चौकशीसाठी आल्यास त्यांचे ओळखपत्र पाहून ते पोलीस असल्याची खात्री करावी आणि त्यानंतर त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्यप्रकारे शांतपणे उत्तरे द्यावीत. भगवान श्रीकृष्ण पाठीशी असल्यामुळे साधकांनी अशा प्रसंगांत कोणतीही भीती न बाळगता प्रार्थना आणि नामजप करत खंबीरपणे प्रसंग हाताळावा.