लसीची प्रतिक्षा…!

सध्या देहलीत पुन्हा एकदा कोरोनाची लाट येत आहे आणि परत दळणवळण बंदी घोषित होण्याच्या मार्गावर आहे. काही काळाने ही स्थिती मुंबई-पुण्यात येण्याचे संकेत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यापासून म्हणजे गेल्या ८ मासांपासून त्याच्या प्रतिबंधक लसीविषयीचे संशोधन जगभर चालू चाले, त्याचे विविध प्रयोगही गेल्या काही मासांत झाले. भारतातही मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि प्रयोग यांचे सत्र चालू आहे. अनेकदा माध्यमांतून लस ‘अमुक मासांनी येणार, तमुक मासांनी येणार, वर्षाने येणार’, अशा प्रकारची वृत्ते झळकत आहेत. या वृत्तांची जणू सामान्यांना आता सवय झाली आहे. आजूबाजूला कितीही संकटे आली, तरी जगातील प्रत्येक माणसाला त्याचे दैनंदिन जीवन चालूच ठेवावे लागते; मग तो श्रीमंत असो कि गरीब. त्याप्रमाणे कोरोनाचा विविध टप्प्यांतील सर्व संकटकाळ जगाने आणि देशाने अनुभवला अन् अजूनही त्याचे पुढचे टप्पे अनुभवणे बाकी असल्याची विविध भाकिते प्रतिदिन येत आहेत. या सर्वांतील तथ्य हे आहे की, ८ मासांनंतरही सर्व जग विश्‍वासपूर्वक आणि ठामपणे सांगू शकेल, अशी लस अद्याप जगाच्या बाजारात नाही.

विदेशातील संशोधन

यापूर्वी सिद्ध झालेल्या लसींमध्ये त्याच विषाणूचा वापर करण्यात यायचा; परंतु कोरोनाच्या लसीत ‘जेनेटिक कोड’ घेऊन एका नव्या पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. ‘ऑक्सफर्ड’ या लसीची चाचणी ब्रिटनसह अनेक देशांत चालू होती. आज इंग्लंडमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केला आहे. असे असतांना त्यांनी काही मासांपूर्वीच या लसीचे १० कोटी डोस आगाऊ नोंदवून ठेवले होते आणि वृद्धांवरही याचे चांगले परिणाम आल्याचे सांगत सर्वत्र जणू लस मिळाल्याचे वातावरण निर्माण केले होते; परंतु अगदी अलीकडच्या काळात ब्रिटनने हा प्रयोग यशस्वी होण्याची निश्‍चिती नसल्याचेही म्हटले आहे. १९ मे या दिवशीच अमेरिकेने त्यांच्याकडील लसीची मानवी चाचणी यशस्वी झाल्याचे म्हटले होते. अमेरिकेच्या ‘मॉडर्ना’ आस्थापनाने त्यांची लस ९५ टक्के परिणामकारक असल्याचा दावा केला. त्यानंतर ‘फायझर बायोटेक’ या आस्थापनाने निर्माण केलेली लस ९० टक्के परिणामकारक आणि तो एक मैलाचा दगड असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांनी केलेल्या लसीच्या ६ देशांत चाचण्या घेण्यात आल्या. सध्या जगभरात २४० प्रकारच्या लसी या चाचण्यांच्या (क्लिनिकल ट्रायल) आधीच्या टप्प्यांत आहेत, ४० लसी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात, तर १५ हून अधिक लसी चाचणीच्या दुसर्‍या टप्प्यांत आणि ९ ते १० लसी चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यात आहेत. हे सर्व टप्पे पार पडल्यावर लसीला मान्यता मिळण्यासाठी आवेदन केले जाते. त्यामुळे जागतिक स्तरावर किमान १० लसी तरी मान्यता मिळण्याच्या टप्प्यावर आहेत आणि अद्यापही दुसर्‍या अन् तिसर्‍या कोरोनाच्या लाटेत जनता होरपळून निघत असतांना काहीही आश्‍वासार्ह असे बाहेर आलेले नाही, हे सत्य आहे.

रशियाने २ मास चाचण्या करून एक लस सिद्ध केल्याचा दावा ११ ऑगस्टला केला. जर्मनी, फ्रान्स, स्पेन आणि अमेरिका या देशांनी मात्र इतक्या लवकर सिद्ध झालेल्या लसीविषयी संशय घेऊन त्याविषयी सावध रहाण्यास सांगितले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीला ही लस देण्यात आली. चीनमध्ये सिद्ध होत असलेल्या लसीने मारकद्रव्य (अँटीबॉडीज्) निर्माण होते, असे म्हटले जात आहे. अमेरिका आणि रशियामध्ये लसीच्या चाचण्या झाल्याचे दावे करत त्याचे वृत्ते देत राहिले. यात अनेक राजकीय, आर्थिक आणि अन्य हेतूही असतील.

भारतातील संशोधन 

भारतात मात्र पंतप्रधान मोदी यांनी ‘लस येत नाही, तोपर्यंत कुणीही कुचराई करू नये’, असे आवाहन केले. चांगले परिणाम देणारी लस म्हणून ऑक्सफर्ड आस्थापनासमवेत भारतातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’ने ही लस बनवण्याची प्रक्रिया चालू केली आहे. त्याची तिसर्‍या टप्प्याची चाचणीही भारतातील १७ शहरांमध्ये चालू झाली. या लसीचे निकाल नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या आरंभी येणे अपेक्षित होते. ‘७३ दिवसांत ही लस उपलब्ध होईल’, असे वृत्त २२ ऑगस्टला माध्यमांनी दिले. त्यामुळे या आस्थापनाला हे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. वर्ष २०२१ च्या आरंभी ही लस येऊ शकते, असे या आस्थापनाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी सांगितले. ‘भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद’ (आय.सी.एम्.आर्.) आणि ‘भारत बायोटेक’ यांनी एकत्रित आणखी एक लस निर्माण केली आणि तीही नोव्हेंबरच्या आरंभापर्यंत दुसर्‍या टप्प्याच्या चाचण्या पूर्ण करील, असे सांगण्यात आले होते. आतापर्यंत अनेकविध पारंपरिक औषधांनी आणि योगाभ्यासादी क्रियाकर्मांनी भारतियांनी तग धरला अन् यापुढेही धरतील, यात शंका नाही.

सांगायचे तात्पर्य हे की, लसीचा घोळ चालू राहील आणि ती यायची तेव्हा येईल, कदाचित् ती केव्हा येईल, हे कुणालाच सांगता येणारही नाही. या सर्वांतून सामान्य माणसाने घेण्याचा धडा म्हणजे भल्याभल्यांची मती गुंग केलेल्या या संकटाचे गांभीर्य ओळखून सामान्य बुद्धीजीवी माणसाने जीवनाविषयी अंतर्मुख झाले पाहिजे. जीवन जगण्याची आणि सुख मिळवण्यासाठी प्रतिदिन चालू असणारी दैनंदिन घिसाडघाई क्षणभर थांबवून काळाच्या पार्श्‍वभूमीवर या संकटाचा विचार केला पाहिजे. ‘मानवी जीवन अमूल्य आहे’, हे लक्षात घेऊन त्याच्या उद्धारासाठी धर्माची, उपासनेची कास धरली पाहिजे आणि शाश्‍वत आनंदाचा मार्ग चोखळला पाहिजे. ‘एकदा परमेश्‍वराच्या पक्षात गेले की, तो कितीही संकटे आली, तरी आपला योगक्षेम वहातोच’, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘भारतीय संस्कृतीने दिलेला औषधांचा, आहार-विहाराचा आणि धर्माचरणाचा अनमोल ठेवा कोरोनासारख्या संकटात संयमी भारतियांच्या कामी आला’, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या सर्वांमुळे भारतातील मृत्यूदर अल्प राहिला. येणार्‍या काळात ‘कोरोनापेक्षा कितीही भयंकर विषाणू आले, तरी भक्तीचे शस्त्र त्याला सर्व औषधे उपलब्ध करून देईल’, ही श्रद्धाच भारतियांना यापुढेही तारून नेईल !