चीनने भूतानमध्ये घुसखोरी करून गाव वसवले !

चीनच्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षेला आता कायमस्वरूपी चाप लावण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्र येऊन कारवाई करण्याची आवश्यकता आहे, हेच यातून लक्षात येते!

नवी देहली – चीनने घुसखोरी करत भूतानमध्ये पांगडा नावाचे एक गावच वसवले आहे. चीनच्या ‘सी.जी.टी.एन्.’ वृत्तवाहिनीचे वरिष्ठ पत्रकार शेन शिवई यांनी चीनने या भागात किती विकास केला आहे, हे दाखवण्यासाठी काही छायाचित्रे पोस्ट केली; मात्र यामुळेच चीनने या गावात घुसखोरी केल्याचे उघड झाले. हे गाव भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेल्या डोकलामपासून केवळ ९ कि.मी. अंतरावर आहे. शेन यांनी छायाचित्र पोस्ट करून ट्वीट करतांना म्हटले की, हा डोकलामचा भाग आहे.

शेन यांनी पांगडा गावाचे मानचित्रही शेअर केले. हा भूभाग भूतानच्या सीमेपासून २ कि.मी. आत आहे. हे उघड झाल्यानंतर शेन यांनी हे ट्वीट हटवले आहे; मात्र गोपनीय माहिती उघड करणार्‍या ‘डेस्ट्रेस्फा’ संकेतस्थळाने एक चित्र शेअर करून चीनने गाव वसवल्याचे दाखवले आहे. चीनने या भागात मागील वर्षापासूनच बांधकाम करण्यास प्रारंभ केला होता. भूतानने चीनला या भागात गाव वसवण्याची अनुमती दिली अथवा नाही, हे स्पष्ट झाले नाही. भूताननेही अधिकृत भूमिका मांडलेली नाही.