मनमोकळेपणा आणि प्रेमभाव असलेल्या अन् संतांचे मन जिंकणार्‍या सौ. वृंदा मराठे !

कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया (१७.११.२०२०) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या सौ. वृंदा मराठे यांचा ५० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचे पती श्री. वीरेंद्र मराठे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. वृंदा मराठे

१. मनमोकळेपणा

‘सौ. वृंदा हिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे ती जेथे जाते, तेथील लोकांना तिच्याविषयी जवळीक वाटते आणि ते लोक त्यांच्या कामात तिला सहभागी करून घेतात. आमच्या मूळ घरी माझे सर्वांत लहान काका आणि त्यांचे कुटुंबीय रहातात. आम्ही श्री गणेशचतुर्थीला त्यांच्याकडे जातो. वर्षातून एकदाच त्यांच्याकडे जात असूनही काकांच्या कुटुंबियांना ‘वृंदाने काही दिवस त्यांच्याकडे थांबावे’, असे प्रत्येक वर्षी वाटते. काकांच्या नातवालाही (वय १० वर्षे) ती तेथे काही दिवस थांबलेली हवी असते. वर्षभरात मूळ घरी होणार्‍या काही कुलाचारांच्या वेळीही माझे काका किंवा काकू तिला आवर्जून बोलावतात. ती क्वचित् प्रसंगीच त्यांनी बोलावल्यावर गेली आहे, तरीही ते तिला अजूनही बोलावतात. चुलत भावाची पत्नी किंवा माझी काकू घरी काही नवीन घडले असेल किंवा अन्य कुटुंबियांविषयी काही गोष्टी असतील, तर तिला मोकळेपणाने सांगतात.

श्री. वीरेंद्र मराठे

२. पुढाकार घेऊन कृती करणे

श्री गणेशचतुर्थीच्या वेळी मूळ घरी गेल्यावर ती त्वरित ‘स्वयंपाकासाठी साहाय्य करणे, पंगती वाढण्याची सिद्धता करणे’ आदी कामांत त्यांना साहाय्य करते. त्याचप्रमाणे त्यांनी काही नवीन केले असेल, नवीन गाय आणली असेल किंवा लागवड केली असेल, तर ती पहायला जाणे, असे करते. माझ्या बहिणीच्या घरी किंवा पर्वरीला माझ्या मोठ्या भावाच्या घरी आम्ही कधी गेल्यावर त्यांना स्वयंपाकात किंवा आवरण्यास ती मोकळेपणाने साहाय्य करते. ‘आपण त्यांच्याकडे पुष्कळ दिवसांत गेलो नाही, तर एकदम स्वयंपाकघरात कसे जाणार ?’, असा तिला संकोच नसतो.

३. विश्‍वासार्हता

आश्रमातही तिच्याकडे अनेक सेवा सोपवल्या जातात. ती जन्मापासून फोंडा येथीलच असल्याने तिला येथील माहिती आहे. त्यामुळे विदेशातून आलेले साधक किंवा परराज्यांतील साधक यांना सराफाकडे काही काम असल्यास, कपडे खरेदी करायचे असल्यास, काही वस्तू घ्यावयाची असल्यास त्या साधकांना आश्रमातील उत्तरदायी साधक सौ. वृंदाशीच जोडून देतात.

एकदा नेहमीच्या सराफाकडे ती गेली असता तिने ‘तिच्याकडे असलेल्या दागिन्याच्या बदल्यात दुसरा दागिना घ्यायचा असल्यास किती अधिक रक्कम द्यावी लागेल ?’, याची चौकशी केली. सराफाने तिला दागिना घेऊन येऊन बदल्यात दुसरा नेण्यास सांगितले; पण तिच्याकडे पैशांची कमतरता असल्याने तिने ‘नंतर करून नेते’, असे सांगितले. त्यावर तो सराफ म्हणाला, ‘‘तुझ्यासाठीच आहे ना ! घेऊन जा. पैशांचे नंतर पाहूया. पैसे कुठे जाणार ?’’

४. पाककलेतील कौशल्य आणि गती

वृंदाकडे पाककलेचे कौशल्य आहे. ‘श्री अन्नपूर्णादेवीची तिच्यावर कृपाच आहे’, असे म्हणता येईल. कोणताही पदार्थ असो, ‘तो वृंदाने केला आहे’, असे म्हटल्यावर ‘चांगलाच झाला असणार’, असा आश्रमातील साधकांनाही विश्‍वास असतो. यामुळे फोंडा येथील सुखसागर सेवाकेंद्रात श्री हनुुमत्कवच याग झाले, तेव्हापासून आतापर्यंत यागातील ब्राह्मणांसाठी किंवा बाहेरून संत आल्यास त्यांच्यासाठी जेवण बनवणार्‍या साधिकांच्या गटात तिचा सहभाग असतो. अल्पाहाराची सेवा करतांनाही २ साधकांची सेवा ती एकटीच करते. मुख्य अल्पाहार बनवता बनवताच मधेच ‘छोटी भांडी घासून घेणे, पथ्याचा अल्पाहार किंवा भाजी बनवणे’, या गोष्टी ती सहजतेने करते. त्यामुळे अल्पाहारही लवकर सिद्ध होतो, तसेच नंतर अधिकचे काही आवरायचे रहात नाही.

५. मनाचा त्याग

मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मोठी मुलगी (पूर्वाश्रमीची कु. शायरी आणि आताची सौ. समृद्धी राऊत) पाचवीत होती, तर मुलगा कु. शौनक पहिलीत होता. आमचे स्वतःचे घर होते आणि मला नोकरी सोडल्यानंतर मिळणारा प्रॉव्हिडंट फंड अन् इतर रक्कम जेमतेम होती. तिच्या व्याजावर संसार चालवणे कठीणच होते, तरीही तिने केवळ माझी इच्छा म्हणून मला नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्यास अनुमती दिली. आर्थिक अडचण आल्यास शिकवण्या घेऊन किंवा अन्य काहीतरी घरगुती व्यवसाय करून संसार चालवण्याची मनाची सिद्धता तिने केली होती. ‘तिच्या सर्व इच्छा वयाच्या २८ व्या वर्षीच तिने मारून टाकल्या होत्या’, असे मला वाटते. त्या वेळी मला असे काही वाटले नाही; पण आज त्याचा विचार केला असता ‘तिने केलेला मनाचा त्याग पुष्कळ मोठा आहे’, असे मला वाटते.

६. पतीवर निरपेक्षपणे प्रेम करणे

मला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. ‘या त्रासातून मी लवकर बाहेर पडावे’, अशी तिची इच्छा असते. मी आश्रमातून कधीतरी ती आणि मुलगा रहात असलेल्या बाहेरील निवासस्थानात त्यांच्या समवेत रहायला जातो. त्या वेळी ती मला वेगळे पदार्थ करून ते खायला देते. त्या वेळी ती माझ्या नामजपादी उपायांविषयी विचारपूस करते. ‘मला तातडीच्या सेवा असतांना कपडे धुवायला वेळ मिळतो का ? मला कधी बरे वाटत नसल्यास त्वरित आधुनिक वैद्यांना दाखवले का ?’, असे ती विचारते. मी स्वतःकडे दुर्लक्ष केल्यास तीच आधुनिक वैद्यांना माझी स्थिती सांगते.

मी कधी त्रासांमुळे नकारात्मक स्थितीत गेलो किंवा बोललो, तर ती मला भावाच्या स्तरावर प्रयत्न करायला सांगते आणि ‘मी सकारात्मकतेकडे कसा वळेन ?’, असे पहाते. माझा नामजप करायचा राहिला असेल, मला तातडीच्या सेवा असतील, तर ती नामजप आणि सेवा यांनाच प्राधान्य द्यायला सांगून मला बाहेरील निवासस्थानात रहायला न येण्याविषयी सांगते. यातून माझ्याकडून तिला कोणत्याही अपेक्षा नाहीत, तर ‘मी साधना करून झटपट प्रगती करावी, मला होणार्‍या त्रासांतून मी बाहेर पडावे, सेवेलाच प्राधान्य द्यावे’, अशीच तिची इच्छा असते. माझ्यावर अशा प्रकारे ती निरपेक्षपणे प्रेम करते.

७. संतांचे मन जिंकणे

तिचा मनमोकळा आणि उत्साही स्वभाव पाहून गेल्या वर्षीच दिवाळीच्या कालावधीत सद्गुरु राजेंद्रदादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) गोव्यात आले असता त्यांनी ‘सौ. वृंदा मराठे यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली आहे का ?’, असे एका साधिकेला विचारले होते.

ती कधी आश्रमात दिसली नाही, तर प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. लक्ष्मी (माई) नाईक हेही नेहमी तिच्याविषयी माझ्याकडे विचारपूस करतात. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ जेव्हा दौर्‍यावरून आश्रमात येतात, तेव्हा आवर्जून वृंदाची विचारपूस करतात आणि तिच्याशी बोलण्यासाठी तिला खोलीत बोलावून घेतात. साधनेविषयीच्या मार्गदर्शनाच्या समवेत त्यांच्यात अनौपचारिक चर्चाही होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनाही काही वैयक्तिक साहित्य मागवायचे असेल, तर त्या वृंदालाच विश्‍वासाने सांगतात.

८. कृतज्ञता

वृंदाविषयी लिहिण्यासारखे पुष्कळ आहे आणि ते मला लिहायचेही आहे. तिच्यासारखी गुणी, त्यागी, प्रेमळ, भोळा भाव आदी गुण असलेली पत्नी दिल्याविषयी परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञता म्हणून तिच्या वाढदिवसानिमित्त काही गुणवैशिष्ट्येच येथे दिली आहेत. ‘तिची जलद गतीने आध्यात्मिक प्रगती होऊ दे’, अशी मी परात्पर गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी प्रार्थना करतो. वर्ष २००२ मध्ये एकदा परात्पर गुरुदेवांनी तिला सूक्ष्मातून काही गोष्टी समजल्याचे पाहून मला उद्देशून ‘ती तुमच्यापेक्षा पुढे आहे’, असे सांगितले होते. ‘ती माझ्यापेक्षा आणखी पुष्कळ पुढे जाऊ दे, तिची ईश्‍वरप्राप्तीची तळमळ वाढू दे, तिची भाववृद्धी होऊ दे आणि तिला गुरुदेवांच्या चरणांशी लवकर जाता येऊ दे’, हीच तिच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना !’

– श्री. वीरेंद्र मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.११.२०२०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक