कोल्हापूर महापालिका प्रशासक पद स्वीकारल्यानंतर आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पहिल्याच दिवशी लावली सर्वांना शिस्त !

कोल्हापूर – कोल्हापूर महापालिका प्रशासक पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी काम आणि शिस्त यांचा धडाका चालू केला. विलंबाने कामावर आलेल्या कर्मचार्‍यांना कारवाईच्या नोटिसा दिल्या, तर विना‘मास्क’ कामावर आलेल्यांकडून ३ सहस्र २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिका चौकातील वाहनतळात लावण्यात आलेली वाहने बाहेर काढण्यात आली. यामध्ये २ माजी नगरसेवकांच्या वाहनांचा समावेश होता. यापुढे महापालिकेचे ओळखपत्र पाहून वाहन चौकात घेतले जाणार आहे.

महापालिकेच्या पदाधिकार्‍यांच्या कार्यालयातील लिपिक, शिपाई यांना वसुलीची कामे देण्यात येणार आहेत. तशा त्यांच्या नेमणुका तातडीने करा, असे आदेश देण्यात आले. आयुक्तांनी महापालिकेच्या विविध विभागांना सकाळीच भेट देणे चालू केले आहे. विना‘मास्क’ कर्मचारी, विलंबाने येणारे अधिकारी आणि कर्मचारी यांची माहिती घेतली. महापालिकेमध्ये येणारे मोर्चे, तसेच आंदोलनकर्ते यांच्याकडून निवेदन देण्यासाठी महापालिकेत येतांना केवळ ५ जणांना प्रवेश दिला जाईल, असे त्यांनी घोषित केले आहे. (प्रशासकीय पदाचा कार्यभार हाती घेतल्यावर केवळ ४ दिवसातच जर आयुक्त इतकी कामे करू शकत असतील, तर ८१ नगरसेवक आणि त्यांच्यावर होणार्‍या व्ययाची आवश्यकता आहे का ?, असे नागरिकांना वाटल्यास नवल ते काय ! – संपादक)