सोलापूर येथे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने ‘अॅमेझॉन’ आस्थापनाच्या लोगोची होळी
सोलापूर, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘अॅमेझॉन’ आस्थापनाने ॐ चिन्ह असलेले पायपोस आणि देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्रे यांची विक्री अमेरिकेसह अन्य देशांत चालू केली आहेत. प्रसिद्धीसाठी हिंदूंच्या भावना दुखावून हिंदु देवतांचा अपमान केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. या आस्थापनावर बहिष्कार टाकून खर्या अर्थाने निषेध व्यक्त करावा, असे आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले. ‘अॅमेझॉन’ या आस्थापनावर महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात बंदी घालण्याच्या मागणीचे निवेदन संगणकीय पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पाठवण्यात आले. या वेळी ‘अॅमेझॉन’ आस्थापनाच्या लोगोची होळी करून भाविकांनी निषेध व्यक्त केला.
या वेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे, जिल्हा अध्यक्ष जोतिराम चांगभले, तसेच जगन्नाथ सुतार, बजरंग डांगे, कृष्णदेव बेलेराव, तुकाराम जांभळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.