ऑक्टोबर २०२० मध्ये टाटाचा ब्रँड असलेल्या तनिष्क ज्वेलरीने एक विज्ञापन प्रदर्शित केले. त्यामध्ये एक हिंदु महिला पारंपरिक वेशभूषेसह एका अल्पसंख्यांक कुटुंबामध्ये सूनेच्या भूमिकेमध्ये दाखवलेली होती. घरामध्ये सजावटीचे, उत्सवाचे, उत्साहाचे वातावरण दाखवत डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केल्याचा देखावा उभा केला होता. ‘एकत्व’ या नावाने प्रदर्शित झालेल्या या विज्ञापनामध्ये गोडगुलाबी प्रसंगाची पखरण पुरेपूर केलेली होती; मात्र विरोधाभास असा की, ज्या दिवशी विज्ञापन प्रदर्शित झाले, त्याच दिवशी १८ वर्षीय राहुल राजपूत नामक युवकाची त्याचे ज्या अन्य धर्मीय मुलीवर प्रेम होते तिच्या घरच्यांनी हत्या केली !
कॅमेरासमोर दाखवत असलेल्या मधुर ‘एकत्व’ कथा प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अत्यंत कठीण आणि भयावह आहेत. प्रिया नामक महिलेची तिच्या लहान मुलीसह हत्या करून त्यांना रहात्या घरात पुरले जाणे किंवा निमिषाने लग्न केल्यानंतर तिचे नामकरण ‘फातिमा’ असे होऊन तिला थेट अफगाणिस्तानात पाठवून पुढे ती ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याची पत्नी म्हणून प्रसिद्धीला येणे, असे प्रसंग सातत्याने दिसत आहेत. स्वाभाविकपणे विशेषतः नेटीझन्सने तनिष्कच्या विज्ञापनाविषयी तीव्र नापसंती दर्शवली. यानंतर लोकभावनांचा आदर करत ‘तनिष्क’ने विनाशर्त माफी मागून ते विज्ञापन मागे घेणे अपेक्षित होते; मात्र तसे न घडता त्यांनी ‘आपण हे विज्ञापन आपल्याशी संबंधित असलेले कर्मचारी आणि त्यांचे परिवार यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मागे घेत आहोत’, असे तनिष्कने घोषित केले.
हिंदु सहिष्णू असतांनाही ‘तनिष्क’कडून मल्लिनाथी !
विज्ञापनामुळे पोळलेला आणि दुखावलेला सामान्य हिंदू हा तनिष्कच्या कर्मचार्यांवर आक्रमण करणार होता का ? हिंदूंनी आजवर त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, तरी सनदशीर मार्गाने विरोध केल्याची उदाहरणे इतिहासामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. अगदी एम्.एफ्. हुसेनने हिंदु देवतांची नग्न चित्रे रेखाटल्यावरही हिंदु संघटनांनी सनदशीर मार्गच अवलंबला. फ्रान्समधील ‘चार्ली हेब्दो’सारखे प्रकरण त्या वेळेस भारतामध्ये घडले नाही. हीच हिंदूंची सहिष्णुता आहे. किंबहुना याकरताच जी मल्लिनाथी ‘तनिष्क’ने केली, ती करणे त्यांना सहज शक्य झाले !
‘तनिष्क’च्या विज्ञापनाच्या वेळी दुःख व्यक्त करणारे पुरोगामी लव्ह जिहाद प्रकरणी मूग गिळून गप्प !
तनिष्कने विज्ञापन मागे घेतल्याविषयी देशातील ‘जमात ए पुरोगामी’ दुःख व्यक्त करण्यात व्यस्त होती, तर दुसरीकडे त्याच वेळेला एका भयानक हत्येने देशवासीय हादरून गेले. फरीदाबादमधील निकिता तोमर नामक युवतीची एकतर्फी प्रेमातून तौसिफ नामक तरुणाने भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या केल्याचे अंगावर काटा आणणारे दृश्य संपूर्ण देशाने पाहिले. या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता उघड झालेल्या गोष्टी अधिक हादरवून टाकणार्या आहेत. तौसिफ उर्फ साजिद हा निकितावर एकतर्फी प्रेम करत तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी बळजोरी करत होता. केवळ तोच नव्हे, तर त्याच्या आईनेदेखील निकिताशी याविषयी संपर्क साधून तिच्यावर दबाव टाकल्याचे आता समोर येत आहे. यातच भरीस भर म्हणजे एक सुप्रसिद्ध वेब सिरीज बघून त्याच्या प्रभावाखाली येत निकितावर गोळ्या झाडल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने नुकतेच दिले.
ही सगळी गुंतागुंत पहात असता, आजवर ‘लव्ह जिहाद’ नामक ज्या समस्येला सातत्याने नाकारण्याचे प्रकार देशातील ‘जमात ए पुरोगामी’ लोकांनी केले, त्याच समस्येने किती मोठे अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे, हे देशासमोर सप्रमाण उभे राहिले. प्रेमाला जात-पात, पंथ इत्यादी बंधने नसतात, हे जरी सत्य असले, तरी ते खरोखरच निखळ, निर्व्याज, निःस्वार्थ आहे कि त्यामागे धर्मांतराचा डाव आहे ? याची खात्री करणेदेखील अत्यावश्यक झाले आहे.
केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री व्ही.एस.अच्युतानंदन यांनी थेट विधानसभेमध्ये ‘लव्ह जिहाद ही समस्या खरोखरच अस्तित्वात असून ती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे’, असे मत मांडले होते; मात्र याविषयी कुणीही चर्चा करू लागल्यावर पंथनिरपेक्षतेचे दाखले देत विषय भलतीकडेच न्यायचा, हा खेळ गेली कित्येक वर्षे आपल्या देशातील तथाकथित ‘सेक्युलर’ (निधर्मी) लोक सातत्याने करतांना दिसून येतात. ‘तनिष्क’ने विज्ञापन मागे घेतल्यावर त्याविषयी गळे काढणारे निकिता तोमरच्या हत्येविषयी मात्र मूग गिळून गप्प होते, हे वेगळे सांगायला नकोच.
पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा !
याच संपूर्ण कालावधीमध्ये जगाला हादरवून टाकणार्या काही घडामोडीदेखील घडल्या. फ्रान्समध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या एका व्यंगचित्रामुळे अप्रसन्न झाल्याने धर्मांध व्यक्तीकडून एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. यावरून तीव्र पडसाद उमटत असतांनाच तेथील राष्ट्राध्यक्षांनी आतंकवादाच्या विरोधात कणखर भूमिका मांडली. त्यावर त्यांनादेखील जगभरातील ‘जमात ए पुरोगामी’कडून प्रचंड मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आले. ‘तनिष्क’च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण करणारे आपल्याकडील तथाकथित बुद्धीवादीदेखील यात मागे नव्हते. पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा असतो तो हाच ! ते सर्वत्र एकच नियम लावून त्यानुसार कधीच काम करू शकत नाहीत.
आतंकवादाचा तात्काळ बिमोड आवश्यक !
फ्रान्समधील घटनेच्या पाठोपाठच ऑस्ट्रिया येथे इस्लामिक स्टेटच्या समर्थकांनी केलेल्या आतंकवादी आक्रमणाने जगाला हादरून सोडले. या घटनांच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक महत्त्वपूर्ण नेत्यांनी सूचक विधाने आजवर केली आहेत. याचे सार पाहिल्यास लक्षात येईल की, धडधडीतपणे समोर उभ्या असलेल्या समस्येला सातत्याने नाकारत रहाणे आणि असत्याचा मुलामा देत तिची पाठराखण करणे, हीच खरी समस्या असल्याचे सगळेच मान्य करत असल्याचे चित्र आहे. येथून पुढे शहामृगी पवित्रा न ठेवता समस्येला तोंड देत तिचा योग्य तो बंदोबस्त करणे, हाच पर्याय शेष आहे. आतंकवाद मग तो कोणत्याही प्रकारचा असला, तरी त्याचा तातडीने बिमोड करणे अत्यावश्यक असते. अन्यथा वरवर दिसत असलेली एक पुळीदेखील दुर्लक्षित राहिल्यास भगंदर (Fistula) बनू शकते !
– वैद्य परीक्षित शेवडे, डोंबिवली (संदर्भ : दैनिक ‘तरुण भारत’, ८.११.२०२०)