मुंबई – पोलिसांच्या घरात मुले-पत्नी, आई-वडील आहेत. अशा परिस्थितीत आपण त्यांच्यावर किती ताण टाकायचा याचा विचार करायला हवा. काही भागांत लोक रस्त्यांवर विनाकारण गर्दी करत आहेत, पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. सध्याच्या घडीला आपण सर्वांनी मिळून पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २७ मार्च या दिवशी प्रसारमाध्यमांच्या द्वारे जनतेला संबोधित करतांना त्यांनी वरील प्रतिपादन केले. या वेळी अत्यावश्यक सेवा पुरवणारे आणि पोलीस कर्मचारी यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
पुढे ते म्हणाले, ‘‘पोलीस केवळ चोर आणि दरोडेखोर यांच्यापासून आपले रक्षण करत नाहीत, तर कोरोनासारख्या लपून बसलेल्या शत्रूशीही ते लढत आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याला घरात रहाणे आवश्यक आहे. डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी सध्याच्या घडीला जे काम करत आहेत, त्याला खरेच तोड नाही. खासगी डॉक्टरांना कोरोनाची लक्षणे असणारा एखादा रुग्ण आढळला, तर त्यांनी त्या रुग्णाला शासकीय रुग्णालयात पडताळणीसाठी पाठवावे. खासगी डॉक्टरांनी दवाखाना बंद केल्यास व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी शासन सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे येत्या काळात या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात शासनाला यश येईल.’’