शुभ आणि अशुभ स्वप्ने अन् त्यांची फलप्राप्ती !

‘शास्त्र’ सदर : प्राचीन शास्त्र, सोप्या भाषेत

‘आपल्यापैकी बहुतेकांना रात्रीच्या वेळी स्वप्ने पडत असतात. ‘आपल्याला रात्रीच्या निद्राकाळात जी स्वप्ने पडतात, त्यांचा साधारण अर्थ काय असू शकतो ?’, हे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.शास्त्रकारांनी स्वप्नांचे २ मुख्य प्रकार सांगितले आहेत – 

१. शुभ स्वप्न आणि २. अशुभ स्वप्न.

यांपैकी ‘शुभ स्वप्ने आणि त्यांची फलप्राप्ती’ पुढे दिली आहे.


१. शुभ स्वप्ने आणि त्यांची फलप्राप्ती 

१ अ. ‘नदी किंवा समुद्र यांत पोहणे, आकाशात उडणे, आकाशातील ग्रह, नक्षत्र, तारे, सूर्यमंडल आणि चंद्रमंडल यांचे दर्शन, देवालय अथवा राजवाडा यांच्या शिखरावर चढणे’, इत्यादी स्वप्नात दिसणे शुभ आहे.

१ आ. हाती घेतलेले कार्य पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचा संकेत देणारी स्वप्ने : ‘मद्यपान आणि मांसादी भक्षण, कीटक किंवा विष्ठा अंगास लागणे, रक्ताने स्नान करणे, दही-भात खाणे, पांढरी वस्त्रे, रत्ने, अलंकार स्वप्नात दिसणे’, हा ‘आपण हाती घेतलेले कार्य पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे’, याचा संकेत असू शकतो.

१ इ. द्रव्य मिळणे किंवा आजार दूर होणे : ‘देवता, ब्राह्मण, राजा, उत्तम प्रकारचे अलंकार आणि वस्त्रे धारण केलेल्या स्त्रिया, बैल, पर्वत, औदुंबर वृक्ष, फलयुक्त वृक्ष यांचे दर्शन होणे, स्वतःला वृक्षावर चढतांना बघणे, तसेच आरसा-मांस-पुष्पे यांची प्राप्ती होणे, श्वेत वस्त्रे आणि श्वेत अलंकार धारण केलेली व्यक्ती दिसणे’, हे स्वप्नात पहाणार्‍याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने द्रव्य (पैसे) मिळू शकते अथवा त्याचा आजार दूर होऊ शकतो.

१ ई. शुभवार्ता मिळणे : जो मनुष्य स्वप्नामध्ये राजा, हत्ती, अश्व, सुवर्ण, बैल आणि गाय बघतो, त्याच्या घरात लवकरच विवाह सुनिश्चित होऊ शकतो किंवा घरातील स्त्री गर्भवती राहिल्याची वार्ता मिळू शकते.

१ उ. द्रव्यप्राप्ती 

श्री. अमर जोशी

१. मनुष्याला तो स्वप्नात बैलावर बसलेला अथवा वृक्षावर चढलेला दिसला असेल आणि तसे वर असतांना तो स्वप्नातून जागा झाला, तर त्याला द्रव्यप्राप्ती होण्याची विपुल संभावना असते.

२. पांढर्‍या रंगाच्या नागाने आपल्या उजव्या हाताला दंश केल्याचे स्वप्न बघणार्‍याला १० दिवसांनी भरपूर धनसंपत्ती मिळू शकते.

३. आसन, बिछाना, पालखी अथवा गाडी इत्यादी वाहन, शरीर अथवा घर यांना आग लागलेली पाहून जागा होणार्‍याला चिरकाल लक्ष्मी प्राप्त होते.

४. स्वप्नात जो बैल जुंपलेल्या रथावर आरूढ असेल अथवा ज्याला छत्री, पादुका किंवा तलवार यांचा लाभ होईल, त्याला धनप्राप्ती होऊ शकते.

१ ऊ. पुत्र, विजय आणि धन यांचा लाभ : ज्या मनुष्याला स्वप्नात तो स्वतः पाण्यात असतांना त्याच्या अंगावर बरेच विंचू किंवा साप आलेले दिसतील, त्याला पुत्र, विजय आणि धन यांचा लाभ होतो.

१ ए. पुत्र आणि धनप्राप्ती : जो स्वप्नात स्वतःला साखळदंडांनी बांधलेला बघतो, त्याला पुत्र आणि धन यांची प्राप्ती होते.

१ ऐ. राज्यप्राप्ती : तलावाच्या मध्यभागी कमळाच्या पानांवर बसून खीर आणि तुपाचे जेवण करत असल्याचे स्वप्न पडले, तर राज्यप्राप्तीचे फळ मिळते.

२. स्वप्नात पांढरे पदार्थ दिसणे चांगले, तर काळे पदार्थ दिसणे वाईट असणे

साधारणपणे स्वप्नात कापूस, भस्म, ताक, भात, असे पांढरे पदार्थ दिसणे चांगले आणि काळी गाय, काळ्या रंगाची देवता अन् काळा हत्ती यांच्या व्यतिरिक्त काळे पदार्थ दिसणे वाईट असते.

३. स्वप्नाचे फळ मिळण्याचा कालावधी 

सूर्यास्तापासून सूर्याेदयापर्यंत ४ प्रहरांचा काळ असतो. साधारण ३ घंट्यांचा एक प्रहर होतो. अशा पहिल्या प्रहरातील स्वप्नाचे फळ एक वर्षाने मिळते. दुसर्‍या प्रहरातील स्वप्नाचे फळ ८ मासांनी, तिसर्‍या प्रहरातील स्वप्नाचे फळ ३ मासांनी, चौथ्या प्रहरातील स्वप्नाचे फळ एका मासात, तसेच सूर्याेदयाच्या जरा आधीच्या स्वप्नाचे १० दिवसांत आणि सूर्याेदयाच्या वेळी पडलेल्या स्वप्नाचे फळ तात्काळ मिळते.

यातून आपल्याला नक्कीच स्पष्ट होते, ‘पहाटे पडलेली स्वप्ने खरी होतात’, हे तितकेसे खरे नाही. जे स्वप्नात दिसते, ते आहे तसे खरे होत नाही. आपल्याला स्वप्नात दिसतो, तो संकेत असतो. त्या संकेताप्रमाणे घडणारी घटना वेगळी असते.’

अशुभ स्वप्नांविषयीची माहिती आपण पुढील लेखातून जाणून घेणार आहोत.’ (संदर्भ : धर्मसिंधु)

(क्रमशः)

– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा

‘वरील लिखाण आमच्या अल्पमतीनुसार आहे. यामध्ये विद्वानांना काही पालट सुचवायचे असल्यास अथवा अधिक माहिती उपलब्ध करून द्यायची असल्यास सनातन वेदपाठशाळेच्या ८१८०९६८६६० या क्रमांकावर संपर्क करावा’, ही नम्र विनंती !’

– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा (२१.५.२०२६)