सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३८ वर्षे) साधकांच्या व्यष्टी साधनेचा घेत असलेला आढावा, म्हणजे साधकांना अंतर्मुखतेकडे नेणारा जणू भावसत्संग !

‘सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३८ वर्षे) माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत असत. तेव्हा मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. 

सौ. स्‍वाती शिंदे

१. स्थिर राहून आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणे

‘सौ. स्वातीताई प्रत्येक प्रसंगात स्थिर राहून समोरच्या साधकाला दिशा देतात. साधक व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सूत्रे सांगत असतांना स्वातीताई प्रथम ती सूत्रे पूर्णपणे समजून घेतात आणि नंतर त्या साधकाला आध्यात्मिक स्तरावर दिशा देतात. त्यामुळे तो साधक लगेच कृतीप्रवण होतो आणि अनुभूतीही घेतो.

२. आध्यात्मिक स्तरावर आणि वस्तूनिष्ठ मार्गदर्शन मिळाल्यामुळे साधकाचे मन स्थिर होणे 

श्री. गौतमेश तोरस्कर

मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असतांना माझ्या कौटुंबिक अडचणी पुष्कळ वाढल्या होत्या. त्यामुळे माझी अस्थिरता एवढी वाढली की, ‘प्रक्रियेकडे माझे लक्षच लागत नव्हते.’ मी स्वातीताईंना माझी सर्व स्थिती मनमोकळेपणाने सांगितली. त्यांनी मला याविषयी प्रत्येक टप्प्याला आध्यात्मिक स्तरावर आणि वस्तूनिष्ठ दिशा दिली. त्यामुळे माझे मन स्थिर झाले आणि मला लगेचच पुन्हा प्रक्रिया राबवण्याकडे लक्ष देता आले.

३. तत्त्वनिष्ठता

ताई साधकांच्या साधनेविषयी सतर्क आणि तत्त्वनिष्ठ असतात. त्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात साधकाला गांभीर्याने जाणीव करून देतात आणि साधकांना ‘फलकावर ५ टप्प्यांत चुका लिहायला सांगणे, प्रायश्चित घेण्यास सांगणे’ असे प्रयत्न करायला सांगतात. त्या साधकांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावाही घेतात.

४. साधकांना अंतर्मुख करून भावस्थितीत नेणे 

मी ३ मास स्वातीताई साधकांच्या घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढावा गटात होतो. त्या एका लयीत आणि नम्रतेने बोलतात. ‘आढाव्याच्या वेळी साधक बोलत असतांना त्याच्या मनःस्थितीचा अचूक अभ्यास करणे, त्याच्या मनाच्या स्थितीशी एकरूप होणे अन् त्याला अंतर्मुख करून वस्तूनिष्ठ उपाययोजना सांगून भावस्थितीकडे घेऊन जाणे’ असे ताई करतात. त्यांच्यातील या दैवी गुणांमुळे ‘स्वातीताई घेत असलेला साधनेचा आढावा, हा आढावा नसून अंतर्मुखतेकडे नेणारा जणू भावसत्संगच वाटतो’, असे माझ्या समवेत असलेल्या बर्‍याच साधकांना जाणवले.

५. साधकांना साधनेत पुढे जाण्यास साहाय्य होणे

ताईंनी प्रत्येक प्रसंगात अचूक विचारप्रक्रिया, वस्तूनिष्ठ उपाययोजना अन् आध्यात्मिक, तसेच भावाच्या स्तरावर करायचे प्रयत्न सांगितल्याने साधकांना प्रसंग, स्वभावदोष आणि अहं यांवर मात करण्यास सोपे जाते अन् साधकाला साधनेत पुढे जाता येते.’

– श्री. गौतमेश अनिल तोरस्कर, कोल्हापूर (१८.१२.२०२५)