(म्हणे) ‘रा.स्व. संघाच्या बेळगावमधील संचलनाला अनुमती देऊ नका !’ – भीम आर्मी

कर्नाटकात क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या साजर्‍या होणार्‍या कार्यक्रमाविषयी चकार शब्दही न काढणार्‍या ‘भीम आर्मी’ संघटनेची मागणी 

बेळगाव (कर्नाटक) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने १०, ११ आणि १२ जुलै या दिवशी बेळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे संचालन, तसेच विविध कार्यक्रम यांना अनुमती देऊ नये, अशी मागणी ‘भीम आर्मी’ या संघटनेने जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यांच्याकडे केली आहे. ‘भीम आर्मी’च्या बेळगाव जिल्हा शाखेने निवेदनात म्हटले आहे की, राज्यात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था, तसेच सामाजिक सलोखा राखणे, हे सरकारचे मुख्य दायित्व आहे. संघाच्या कार्यक्रमांची सखोल पडताळणी करावी आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास त्यावर आवश्यक निर्बंध घालावेत, अशी मागणी या संघटनेने केली आहे. (राष्ट्रप्रेम, समाजसाहाय्य इत्यादी उद्देश समोर ठेवून कार्यरत असलेल्या संघाच्या संचलनात कधी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याचे ऐकिवात नाही ! – संपादक)

या निवेदनात पुढे म्हटले आहे की,

१. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी सेवा नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर  नियमानुसार कारवाई करावी.

२. कार्यक्रमाच्या वेळी कुठल्याही प्रकारचे द्वेषपूर्ण भाषण, प्रक्षोभक विधाने किंवा अवैध  कृत्ये घडल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करावी.

संपादकीय भूमिका

रा.स्व. संघाच्या द्वेषाने भारलेल्या ‘भीम आर्मी’ने स्वत:च्या आक्रमकतेचे आत्मपरीक्षण करावे !