‘ग्रामसुरक्षा’ यंत्रणेला कुलूप !

सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थांसाठी आपत्कालीन सूचना, आपत्ती व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध, शासकीय योजनांची माहिती आणि ग्रामपंचायतीच्या विविध संदेशांचे वहन करण्यासाठी ‘ग्रामसुरक्षा यंत्रणा’ प्रभावी माध्यम ठरले होते. जिल्हा परिषद आणि सातारा पोलीस दल यांनी संयुक्तपणे ऑगस्ट २०२३ मध्ये चालू केलेल्या या अभिनव उपक्रमाला आर्थिक पाठबळ न मिळाल्याने ३० जूनपासून ही यंत्रणा पूर्णपणे बंद झाली आहे.

जिल्ह्यातील १ सहस्र २३६ ग्रामपंचायतींमधील अनुमाने ९ लाख ४५ सहस्र ग्रामस्थ ‘ग्रामसुरक्षा’ यंत्रणेशी थेट जोडले गेले होते. ग्रामसभा, पाणीपुरवठा, करभरणा, पूर, आग, भूकंप, वणवा, वन्यप्राण्यांचा धोका, तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना एका क्षणात सतर्क करण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरली होती. या यंत्रणेचा मुख्य आधार असलेल्या ‘टोल फ्री’ क्रमांकावरून दिलेला संदेश काही सेकंदात संपूर्ण गावातील ग्रामस्थांच्या भ्रमणभाषवर पोचत होता. संकटाच्या वेळी गावकर्‍यांना एकत्र बोलावणे, सावध करणे किंवा प्रशासनाशी संपर्क साधणे यामुळे अधिक सुलभ होत होते. गेल्या ३ वर्षांच्या कालावधीत ग्रामसुरक्षा यंत्रणेचा १८ सहस्र ४५० हून अधिक वेळा उपयोग करण्यात आला. या यंत्रणेच्या माध्यमातून चोरीचे प्रयत्न हाणून पाडणे, हरवलेली व्यक्ती शोधणे, वणवे नियंत्रणात आणणे, पूरग्रस्तांना वाचवणे, गुन्हेगारांना पकडणे, वनक्षेत्र आणि शेती यांची मोठी हानी टाळणे, अशा अनेक घटनांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त झाले आहे अन् यात या यंत्रणेची भूमिका महत्त्वाची ठरली. जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय विभागांनीही ग्रामस्थांपर्यंत महत्त्वाच्या सूचना तात्काळ पोचवण्यासाठी या यंत्रणेचा प्रभावी उपयोग केला. यामुळे ग्रामस्थांनाही विविध लाभ झाला.

असे असतांनाही ‘ग्रामसुरक्षा’ यंत्रणा चालू ठेवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याविषयी वारंवार पाठपुरावा करण्यात आला; मात्र ग्रामपंचायतींकडून आवश्यक आर्थिक प्रावधान न झाल्यामुळे, तसेच सरकारकडून निधी प्राप्त न झाल्याने ग्रामसुरक्षा यंत्रणा बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला. यामुळे सातारा जिल्ह्यातील ९ लाख ४५ सहस्र ग्रामीण नागरिकांना संकटसमयी साहाय्याचा आधार ठरणारी एक प्रभावी व्यवस्था बंद पडली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये ४ कॅबिनेट मंत्री आणि एक उपमुख्यमंत्री अशी ५ पदे आहेत; मात्र जिल्ह्यातील ‘ग्रामसुरक्षा’ यंत्रणेला कुलूप लावण्याची वेळ आली आहे. सध्या मुंबई येथे पावसाळी अधिवेशन चालू असून जिल्ह्यातील मंत्र्यांनी ‘ग्रामसुरक्षा’ यंत्रणेसाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊन ती पूर्ववत् चालू ठेवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा