वादळ आणि पाऊस यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६७ गावांमधील वीजपुरवठा खंडित

युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे चालू ! - महावितरण

वीजवाहिन्यांवर कोसळलेली झाडे

सिंधुदुर्गनगरी, ७ जुलै (जि.मा.का.) – जिल्ह्यात पडत असलेला पाऊस आणि वादळी वारे यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था बाधित झालेली आहे. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या आणि वीज खांब यांची हानी झाली आहे.

६७ गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे चालू करण्यात आली असून शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा पूर्ववत् करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिली आहे.

वादळ आणि पाऊस यांमुळे विजेचे उच्चदाबाचे ७३ खांब आणि लघुदाबाचे १४३ खांब कोसळल्याने अथवा हानीग्रस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणने ४२ पथकांच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पावसाचा जोर, चिखल, दरड (डोंगराची उंच आणि उभी कडा) कोसळण्याचा धोका आणि दुर्गम भागातील प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत महावितरणचे कर्मचारी अन् तांत्रिक पथके अखंडपणे कार्यरत आहेत.

अनेक ठिकाणी वीज खांब उभारणे, तुटलेल्या वीजवाहिन्या दुरुस्त करणे, झाडांच्या फांद्या हटवणे आणि सुरक्षिततेची खात्री करून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा चालू करणे आदी कामे चालू आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक ती सर्व दक्षता घेऊनच वीजपुरवठा पूर्ववत् करण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा. तुटलेल्या वीजवाहिन्या अथवा विजेची हानीग्रस्त उपकरणे यांच्या जवळ जाणे टाळावे आणि अशा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ महावितरणच्या स्थानिक कार्यालयाला अथवा संबंधित अधिकार्‍यांना माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी केले आहे.