अवे, खोतीगाव येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानाच्या नूतनीकरणाचे अहिंदूच्या नावाने दिलेले कंत्राट रहित

  • ‘गोमंतक मंदिर महासंघा’ने आक्षेप घेतल्यानंतर पर्यटन महामंडळाचा निर्णय

  • मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून नव्याने निविदा काढावी ! - श्री मल्लिकार्जुन देवस्थान समितीची मागणी

काणकोण, ७ जुलै (वार्ता.) – अवे, खोतीगाव, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्याच्या कामाचे कंत्राट गोवा पर्यटन विकास महामंडळाने ३ जुलै या दिवशी अल्लाबक्ष मुल्ला या मुसलमान व्यक्तीला दिले होते. मंदिराचे काम एका अन्य धर्मीय कंत्राटदाराला दिल्याच्या प्रकरणाला ‘गोमंतक मंदिर महासंघा’ने, तसेच सामाजिक माध्यमातून अनेक भाविकांनी आक्षेप नोंदवला होता. या आक्षेपाची त्वरित नोंद घेत गोवा पर्यटन विकास महामंडळाने ६ जुलै या दिवशी ही निविदा रहित केली आहे. या घटनेनंतर खोतीगाव, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर समितीने ७ जुलै या दिवशी काणकोण येथे एक पत्रकार परिषद घेऊन ‘मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून मंदिराचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्यासाठी नव्याने फेरनिविदा लवकरात लवकर काढावी’, अशी मागणी केली आहे.

खोतीगाव, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराचे अध्यक्ष श्री. साहिल देसाई पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘‘मंदिराचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण कामाचे कंत्राट अहिंदु व्यक्तीला मिळाल्याने याला काहींनी आक्षेप घेतला होता; मात्र या कामाचे कंत्राटदार अल्लाबक्ष मुल्ला हा केवळ परवानाधारक होता आणि त्याने कामाचे उपकंत्राट जगदीश भट या हिंदु व्यक्तीला दिले होते. जगदीश भट हे मंदिराचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्याचे काम करत असतात. गोवा पर्यटन विकास महामंडळाने आता हे कंत्राट रहित केले आहे. सरकारने मंदिर आणि येथील परिसराची सध्याची स्थिती पाहून त्वरित मंदिराचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्याचे काम हाती घ्यावे अन् यासाठी नव्याने फेरनिविदा काढावी. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घालावे.’’ गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी यांनी सरकारने तातडीने आक्षेपाची नोंद घेऊन अहिंदु व्यक्तीच्या नावाने काढलेली निविदा रहित केल्याच्या प्रकरणी सरकारचे अभिनंदन केले आहे.