रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना साधकाला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

१. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्यापूर्वी मनाची स्थिती

‘८.९.२०२५ ते १६.१२.२०२५ या कालावधीत गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली. प्रक्रियेला जाण्यापूर्वी अनुमाने ६ मासांपासून ‘माझ्या कौटुंबिक अडचणी, व्यष्टी साधना न करणे आणि सेवेत वारंवार चुका होणे’ यांमुळे माझ्या मनाची अस्थिरता पुष्कळ वाढली होती. ‘प्रक्रिया राबवणे, म्हणजे नेमके काय असते ?’, हे ठाऊक नसल्यामुळे मला त्याची उत्सुकता होती, तसेच माझ्या मनात थोडी भीतीही होती; मात्र ‘मला स्वतःला पालटायचे आहे आणि गुरुदेवांचे मन जिंकायचे आहे’, हे ध्येय ठेवून प्रक्रियेला जाऊया’, असा मी निश्चय केला.

२. रामनाथी आश्रमात जाण्यापूर्वी स्थानिक साधकांचे साधनेसाठी साहाय्य घेणे 

मी रामनाथी आश्रमात जाण्यापूर्वी ज्या साधकांच्या समवेत ४ वर्षे सेवा केली, त्यांना विचारले, ‘‘मी प्राधान्याने कोणते स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ? तुम्हाला लक्षात आलेल्या माझ्या चुका आणि प्रसंग सांगून मला साहाय्य करावे.’’ साधकांनी ‘साधनेच्या दृष्टीने घातक असलेले माझे स्वभावदोष आणि अहंचे पैलू, त्यावरील योग्य दृष्टीकोन, भावाच्या स्तरावर करायचे प्रयत्न’ यांविषयी सांगून मला पुष्कळ साहाय्य केले.

३. रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

श्री. गौतमेश अनिल तोरस्कर

३ अ. ‘वैयक्तिक जीवन, व्यष्टी साधना, कौटुंबिक स्थिती, सेवा, साधक’ यांच्या संदर्भात मागील ६ मासांत झालेले प्रसंग’ आणि त्यावर योग्य दृष्टीकोन लिहीत असतांना ‘गुरुदेवांच्या कृपेने मन हलके आणि निर्मळ होत आहे’, असे जाणवणे : मी रामनाथी आश्रमात प्रक्रिया राबवायला आल्यानंतर सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३८ वर्षे) यांनी मला ‘वैयक्तिक जीवन, व्यष्टी साधना, कौटुंबिक स्थिती, सेवा, साधक यांच्या संदर्भात मागील ६ मासांत झालेले प्रसंग’ यांविषयी लिहायला सांगून त्यावर ‘योग्य दृष्टीकोन, विचार आणि भावजागृतीचे प्रयत्न’ यांविषयी लिहायला सांगितले. ते सर्व लिहित असतांना ‘गुरुदेवांच्या कृपेने माझे मन हलके आणि निर्मळ होत आहे’, असे मला जाणवू लागले.

३ आ. आरंभी सारणी लिखाण करतांना मला केवळ स्वभावदोषांच्या संबंधित प्रसंग लक्षात येत होते; पण अहंचे पैलू लक्षात येत नव्हते. तेव्हा ‘माझ्यात प्रेमभाव आणि इतर गुणही असल्याने माझ्यात अहं न्यून आहे’, असा मला भ्रम झाला होता.

३ इ. आढावासेवकांनी स्वभावदोषांविषयी चिंतन करायला सांगितल्यावर ‘स्वतःत तीव्र अहं आहे’, याची जाणीव होणे : माझ्या समवेत खोलीत रहाणारे साधक मला लहान सहान प्रसंगांतील माझ्या चुका सांगत असतांना ‘त्यांचे बोलणे पूर्ण ऐकून न घेता मध्येच बोलणे, स्पष्टीकरण देणे, स्वतःचे समर्थन करणे, इतरांचे स्वभावदोष पहाणे, स्वीकारण्याची वृत्ती नसणे, वाईट वाटणे इत्यादी’ स्वभावदोषांविषयी मी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितले. त्यानंतर सौ. स्वातीताईंनी मला त्याविषयी चिंतन करायला सांगितले. तेव्हा माझ्यातील स्वभावदोषांची तीव्रता माझ्या लक्षात आली. असे प्रसंग अनुमाने १ मास सतत घडत असल्याने माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष झाला.‘माझ्यात तीव्र अहं आहे’, याची मला जाणीव झाली.

३ ई. नियोजनात पालट होत असतांना परिस्थिती लगेच स्वीकारता न येणे : प्रक्रियेला येण्यापूर्वी ‘आश्रमात सर्व नियोजन ठरलेले असणार, म्हणजे आश्रमात जाण्या-येण्याच्या वेळा, तसेच इतर सत्संग आणि आढावे इत्यादींच्या वेळा. त्यामुळे तेथे व्यष्टी साधनेचे प्रयत्न पूर्ण होतील’, असा विचार माझ्या मनात दृढ होता. अन्नपूर्णाकक्षात साधकसंख्या अल्प असल्यामुळे मला कधीतरी पहाटे तेथे सेवेसाठी जावे लागत होते. आढाव्याच्या वेळा सातत्याने पालटत होत्या. माझ्या नियोजनात सातत्याने पालट होत होते. त्यामुळे काही वेळा माझ्या मनाचा संघर्ष होऊन मी परिस्थितीला दोष देत असे. मला परिस्थिती लगेच स्वीकारता आली नाही.

३ उ. आढावासेवकांना प्रसंगांविषयी सांगून त्यांचे मार्गदर्शन घेतल्यावर ‘देवाच्या नियोजनावर नेहमीच विश्वास ठेवायला हवा आणि त्या त्या वेळी उत्तरदायी साधकांशी मनमोकळेपणाने बोलून त्यांचे साहाय्य घेतल्याने साधना होईल’, असे लक्षात येणे : ‘भावसत्संग आणि व्यष्टी साधनेचा आढावा’ या वेळी सातत्याने प्रसंग सांगून, त्यावर दिशा घेऊन माझ्या लक्षात आले, ‘देवाच्या नियोजनावर नेहमीच विश्वास ठेवायला हवा; कारण त्यातूनच साधना होणार आहे. स्वतः केलेल्या व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या नियोजनात परिस्थितीमुळे पालट झाल्यास ती परिस्थिती प्रथम स्वीकारायला हवी. त्या त्या वेळी उत्तरदायी साधकांशी मनमोकळेपणाने बोलून त्यांचे साहाय्य घेतल्याने साधना होईल.’ काही प्रमाणात त्या अनुषंगाने माझे प्रयत्न होऊ लागले.

३ ऊ. स्वयंपाकघरात सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

३ ऊ १. आरंभी शिकण्याची स्थिती असल्याने विविध सेवा करणे आणि साधकांनी कौतुक करणे : आरंभी स्वयंपाकघरात सेवा करतांना तेथील बर्‍याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. ‘तेथे प्रत्येक सेवा ही सेवेतील बारकावे जाणून घेऊन, इतरांचा विचार करून आणि महत्त्वाचे म्हणजे सात्त्विकता टिकवून केली जाते’, हे मला शिकायला मिळाले. प्रथम काही दिवस माझी शिकण्याची स्थिती असल्याने स्वयंपाकघरातील सेवा ‘नवीन सेवा, महत्त्वाच्या सेवा आणि यंत्र वापरून करण्याच्या सेवा’, यांविषयी मला शिकायला मिळाले. काही साधकांनी माझे कौतुकही केले.

३ ऊ २. स्वच्छतेच्या सेवा मिळाल्यावर ‘क्षमतेनुसार सेवा मिळायला हवी’, असे वाटणे आणि ‘सेवेत आवड-नावड न ठेवता मिळालेली सेवा, म्हणजे गुरुदेवांचा प्रसाद आहे’, असा दृष्टीकोन मिळाल्यावर त्या दृष्टीने चिंतन होणे : काही दिवसांनंतर मला केर काढणे, लादी पुसणे, अशा स्वच्छतेच्या सेवा मिळू लागल्या. तेव्हा ‘माझ्या क्षमतेनुसार सेवा मिळायला हवी. मला महत्त्व मिळावे’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले. त्यावर भावजागृती सत्संगात आणि व्यष्टी साधनेच्या आढाव्यात गुरुकृपेने मला योग्य दिशा मिळाली. ‘सेवेत आवड-नावड न ठेवता मिळालेली सेवा, म्हणजे गुरुदेवांचा प्रसाद आहे’, असा भाव ठेवून कृतज्ञताभावात राहून स्वतःचा उद्धार करून घेऊया’, असा दृष्टीकोन मिळाल्यामुळे ‘जिल्ह्यात माझे असे कुठे कुठे होते ?’, याविषयी चिंतन होऊ लागले.

३ ऊ ३. संतांनी स्वभावदोषांची जाणीव करून दिल्यानंतर ते सर्व स्वीकारतांना मनाचा पुष्कळ संघर्ष होणे : माझ्यामधील ‘सेवेला वेळेत न जाणे, सेवा हळूहळू करणे, नियोजनातील पालट न स्वीकारणे, विचारून न घेता मनानेच सेवा करणे’ या तीव्र स्वभावदोषांमुळे माझ्याकडून अनेक चुका होत होत्या. तेव्हा प्रत्येक वेळी पू. रेखा काणकोणकर (सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत, वय ४८ वर्षे) मला सर्वांसमोर चुकांची जाणीव करून देत असत. आरंभी ते सर्व स्वीकारतांना माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष झाला. ‘मी योग्य कसा आहे ? मला इतरांनी समजून घ्यायला हवे’, असे माझ्यामधील अहंचे पैलू उफाळून येऊ लागले.

४. भावजागृती सत्संगामुळे मनाचे चिंतन होण्यास आणि भावावस्था अनुभवण्यास साहाय्य होणे

माझ्याकडून गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना झाली, ‘हे गुरुदेवा, माझ्यामधील सर्व स्वभावदोष आणि अहंचे पैलू प्रक्रियारूपी यज्ञकुंडात भस्म होऊ दे. माझा देह, मन आणि बुद्धी श्री चरणी समर्पित होऊ दे.’ आरंभी भावसत्संगात भावजागृतीचा प्रयोग सांगत असत. त्याचा आढावा, तसेच ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या दृष्टीने कसे प्रयत्न चालू आहेत ?’, याचा आढावा विचारत असत. त्यातून मनाचे चिंतन होण्यास आणि भावावस्था अनुभवण्यास मला पुष्कळ साहाय्य झाले. ‘आरंभी मला ग्लानी येणे, आकलन न होणे आणि झोप येणे’, इत्यादी त्रास होत होते. नंतर गुरुदेवांच्या कृपेनेच माझ्याकडून त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न झाले. भावसत्संग घेणार्‍या साधिकेचा प्रत्येक शब्द माझ्या अंतर्मनात जात होता. ‘तिचे बोलणे ध्वनीमुद्रित (रेकॉर्डिंग) करावे’, असे मला वाटत होते. भावसत्संगात जे ध्येय दिले जायचे, त्या संदर्भात केलेले प्रयत्न सांगतांना मला वेगळाच आनंद मिळत होता. कधी कधी ध्येयपूर्ती करायला मी अल्प पडत होतो. तेव्हा इतर साधक ते करत असलेल्या प्रयत्नांविषयी सांगत असतांना मला त्यातून शिकता येत होते आणि दिशा मिळत होती.

‘हे श्रीमन्नारायणा, मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो, ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ही केवळ काही कालावधीसाठी करायची नसून ती ईश्वरप्राप्तीपर्यंत करायची आहे’, ही जाणीव तूच माझ्या मनाला करून दे. त्याप्रमाणे माझ्याकडून कृतीच्या स्तरावर आणि साधनेच्या स्तरावर प्रयत्न करून घे. मला लवकर तुझ्या चरणांशी येता येऊन, खर्‍या अर्थाने तुझ्या श्री चरणी कृतज्ञता व्यक्त करता येऊ दे.’

– श्री. गौतमेश अनिल तोरस्कर, कोल्हापूर (१८.१२.२०२५)


कृतज्ञ आहोत गुरुदेवा, दिली तुम्ही आम्हा साधकांना संधी गुरुचरणी घेऊन जाणार्‍या प्रक्रियेची ।

व्यष्टी साधनेच्या आढाव्यात स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करूनी । भावसत्संगातून भाव वाढवूनी ।
पू. रेखाताईंच्या सहवासात प्रत्येक सेवेतून मनोलय करूनी ।
बहिर्मुखता त्यागून सतत अंतर्मुख करूनी ।
कृतज्ञ आहोत गुरुदेवा, दिली तुम्ही आम्हा साधकांना संधी ।
गुरुचरणी घेऊन जाणार्‍या प्रक्रियेची (टीप) ।। १ ।।

साधनेच्या प्रयत्नांची अल्पसंतुष्टता घालवूनी ।
सतर्क राहून स्वतःचे आत्मनिरीक्षण करूनी ।
मायेचा त्याग करून ईश्वरप्राप्तीचा ध्यास लावूनी ।
या अपात्र जिवांना गुरुचरणांचे फूल बनवूनी ।
कृतज्ञ आहोत गुरुदेवा, दिली तुम्ही आम्हा साधकांना संधी ।
गुरुचरणी घेऊन जाणार्‍या प्रक्रियेची ।। २ ।।

टीप : प्रक्रिया – स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया

– श्री. गौतमेश अनिल तोरस्कर, कोल्हापूर (१८.१२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक