‘संतांना ‘जगण्याचा कंटाळा आला आहे’, असे जे वाटते, ती त्यांची स्वेच्छा आहे कि ईश्वरेच्छा आहे ?’, हे ओळखण्यासाठीची लक्षणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘संतांना जगण्याचा कंटाळा आला आहे’, असे जे वाटते, ती स्वेच्छा आहे कि ईश्वरेच्छा आहे’, हे कसे ओळखायचे ?

श्री. राम होनप :

१. कालमाहात्म्य

१ अ. प्रतिकूल काळाचा प्रभाव : जेव्हा ‘वाईट शक्तींची सूक्ष्मातील आक्रमणे आणि काळाची प्रतिकूलता’ यांचा परिणाम संतांवर अधिक असतो, तेव्हा संतांना जगण्याचा कंटाळा येतो.

२. ‘जगण्याचा कंटाळा आला आहे’, यात स्वेच्छा असण्याची लक्षणे

श्री. राम होनप

२ अ. देहयातना असह्य होणे : संत आनंदावस्थेत असतात; मात्र त्यांना कधीकधी काही कारणास्तव शारीरिक त्रास किंवा यातना होत असतात. त्यामुळे अशा संतांना जीवन नकोसे वाटते. संतांना देहाची मर्यादा असते. काही संतांना ‘हे माझे देहप्रारब्ध आहे’, याची जाणीव असते; मात्र ते भोगण्याची त्यांची तयारी नसते. तेव्हा त्यांना जगण्याचा कंटाळा येतो.

२ आ. समाजाच्या कल्याणाचा विचार न्यून होणे : जेव्हा संतांना अत्युच्च आनंद मिळत असतो, तेव्हा त्यांना काहीतरी कार्य करण्याची इच्छा रहात नाही. सतत कार्य करावे लागले, तर त्या संतांना जीवनाचा कंटाळा येतो.

२ इ. कार्यात यश न मिळणे : काही संत राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात, तसेच आध्यात्मिक कार्य करत असतात. या कार्यात अपेक्षित असे यश न मिळाल्यास त्यांना जीवनाचा कंटाळा येतो.

३. ‘जगण्याचा कंटाळा आला आहे’, यात ईश्वरेच्छा असण्याची लक्षणे

३ अ. संतांना अंतर्ज्ञानाने ‘ईश्वर आणि मायेचे कार्य’ यांविषयी समजलेले असणे : संतांना अंतर्ज्ञानाने ‘ईश्वर आणि मायेचे कार्य’ यांविषयी समजलेले असते. त्यामुळे त्यांना पृथ्वीवर जाणून घेण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे काही शेष रहात नाही. तेव्हा त्यांना जीवनाचा कंटाळा येतो.

३ आ. आनंदमय अवस्थेत वाढ होणे : संतांच्या साधनेमुळे त्यांच्या आनंदमय अवस्थेत वाढ होते. त्या स्थितीत त्यांना ‘अन्य सर्व गोष्टी माया आहे’, याचे ज्ञान होत असते. अशा संतांना मायेपासून अलिप्तता येते. त्यामुळे त्यांना या संसारी जीवनाचा कंटाळा येतो.

३ इ. अहंशून्य अवस्था प्राप्त होणे : संतांनी साधनेने अहंशून्य अवस्था प्राप्त केलेली असते. त्यांना ‘सर्वकाही ईश्वरी नियोजनाने आणि ईश्वरेच्छेने घडत आहे’, याचे ज्ञान असते. त्यामुळे त्यांना ‘आता मला करण्याजोगे काहीच नाही’, असे वाटते.

३ ई. जगण्याचा कंटाळा येणे : संतांना परेमश्वराच्या मीलनाची, म्हणजेच मोक्षाची ओढ लागलेली असते. त्याचा परिणाम म्हणून त्यांना जगण्याचा कंटाळा येतो.

३ उ. वैराग्य अवस्थेकडे वाटचाल होत असणे : संत सतत भगवंताच्या अनुसंधानात असतात. त्यामुळे ते ‘मायेतील विचार आणि कार्य’ यांपासून दूर गेलेले असतात. त्यांची ही स्थिती वाढत गेल्यावर संतांना वैराग्य अवस्था प्राप्त होते. त्याला ‘निवृत्ती परायण अवस्था’, असेही म्हणतात.

ऊ. ईश्वरी संकेत असणे : उच्च आध्यात्मिक पातळीच्या संतांना ‘कार्यपूर्ती आणि देहत्याग करणे’ यांचे संकेत ईश्वराकडून प्राप्त होत असतात. त्यामुळे त्यांना जीवनाचा कंटाळा येतो.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ११.२.२०२६, वेळ : सकाळी १०.३५ आणि कालावधी : १० सेकंद)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.