Badrinath Temple Donation Theft : मंदिर समितीच्या अध्यक्षांचे खासगी सचिव प्रमोद नौटियाल निलंबित

  • बद्रीनाथ धाममधील दान चोरीचे प्रकरण

  • मंदिर समितीने स्थापन केलेल्या चौकशी पथकाला दान चोरी झाल्याचे मिळाले पुरावे !

प्रमोद नौटियाल

देहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडामधील प्रसिद्ध बद्रीनाथ धाममध्ये दान चोरीचा आरोपांच्या प्रकरणात बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या अध्यक्षांचे खासगी सचिव प्रमोद नौटियाल यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारनेही गढवाल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यांची एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे.

१.  बद्रीनाथ धाममध्ये दानाचे पैसे मोजतांना गैरव्यवहार झाल्याचे दावे सामाजिक माध्यमांवर होऊ लागल्यावर ‘भैरव सेना’ नावाच्या संघटनेने पोलिसात तक्रार प्रविष्ट  करून प्रकरणाची चौकशी आणि गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.

२. या आरोपांनंतर मंदिर समितीने ४ सदस्यांचे एक चौकशी पथक स्थापन केले. चौकशी पथक सीसीटीव्हीचे चित्रीकरण, कर्मचार्‍यांचे जबाब आणि जुन्या नोंदींची पडताळणी करीत आहे.

३. या पथकाच्या प्राथमिक चौकशीत दान चोरीचे आरोप खरे असल्याचे आढळून आले. यानंतर मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी खासगी सचिव प्रमोद नौटियाल यांना निलंबित केले. त्यांना अनुमतीविना समितीचे मुख्यालय न सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे.

४. या चोरीच्या संदर्भात राज्य सरकारच्या पर्यटन विभागाचे सचिव धीराज सिंह गर्ब्याल यांच्या आदेशानुसार ३ सदस्यीय शासकीय समिती स्थापन करण्यात आली असून त्याचे अध्यक्ष गढवाल आयुक्त असतील. या समितीला १५ दिवसांच्या आत चौकशी अहवाल आणि शिफारसी सरकारला सादर कराव्या लागणार आहेत.

५. मंदिर समितीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे की, भ्रष्टाचाराविषयी त्यांचे धोरण ‘शून्य सहनशीलते’चे आहे आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

मंदिराच्या दानाच्या चोर्‍यांची प्रकरण पुढे येत असल्याने आता देशातील सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे आणि अन्य मंदिरेही केवळ आणि केवळ भक्तांच्याच नियंत्रण आणण्याला पर्याय नाही, हे स्पष्ट होते ! सरकारकडून हे कार्य होणार नसल्याचे हिंदूंनी यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक झाले आहे !