पू. श्रीमती सुमन नाईक (सनातनच्या ६२ व्या संत, वय ७७ वर्षे) यांनी साधकांना केलेले भावपूर्ण मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. साधकाच्या समवेत सेवा करतांना ठेवायचा भाव

‘एखाद्या साधकाच्या समवेत सेवा करायची असतांना ‘माझी आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आणि माझ्या मनात त्या साधकाबद्दल असलेला पूर्वग्रह दूर होण्यासाठी’, मला ही संधी मिळाली आहे. मला मिळालेली सेवा ही ईश्वरसेवा आहे’, असा भाव ठेवून सेवा केल्यास साधक स्वतःच्या स्वभावदोषांवर मात करून पुढे जाऊ शकतात.

पू. (श्रीमती) सुमन नाईक

२. सेवा करतांना ‘गुरुदेवच सर्वकाही सुचवणार आहेत आणि तेच सेवा करून घेणार आहेत’, असा भाव ठेवल्यास कर्तेपणावर मात करता येऊन शरणागतभाव निर्माण होण्यास साहाय्य होते !

एका साधिकेला सतत सेवेचा ध्यास असतो; पण ‘आपले मन कधी मायेतील विचारांत भरकटत जाते’, हे तिच्या लक्षातही येत नाही. ‘ही सगळी कर्तेपणाची लक्षणे आहेत’, असे लक्षात येते. सेवा करतांना ‘गुरुदेवच सर्वकाही सुचवणार आहेत आणि तेच सेवा करून घेणार आहेत’, असा भाव ठेवून सेवा केल्यास कर्तेपणावर मात करून शरणागतभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.

३. भावाच्या स्तरावर सेवा केल्यास सेवेतून आनंद मिळतो !

साधकांना अधिक सेवा दिल्यास ताण येतो. साधकांना ताण येण्यामागचे कारण ‘त्यांच्यामधील कर्तेपणा’ हे आहे. साधकांनी स्वतःमध्ये असलेल्या स्वभावदोषांवर मात करायला हवी. ‘गुरुदेवांनी मला साधनेत पुढे जाण्यासाठी ही सेवा दिली आहे आणि गुरुदेवच मला पुढे घेऊन जाणार आहेत’, असा भाव ठेवून सेवा केल्यास साधकाला त्या सेवेतून आनंद मिळणार आहे.

४. आपले गुरु सगळ्या साधकांना प्रेमाने जवळ करतात. ते कुणालाच दुखावत नाहीत. हा गुण साधकांनी अंगी बाणवायला हवा.

५. सहसाधकांच्या स्वभावदोषांकडे पाहून स्वतःवर परिणाम करून घेण्यापेक्षा ‘त्यांच्यामधील चांगले गुण अंगी बाणवून आपला आनंद कसा वाढेल’, यासाठी प्रयत्न करूया !

६. सद्गुरूंच्या सत्संगातून शिकायला मिळत असलेली सूत्रे कृतीत आणूया !’

– (पू.) श्रीमती सुमन नाईक (सनातनच्या ६२ व्या संत, वय ७७ वर्षे), कपिलेश्वरी, फोंडा, गोवा. (२१.३.२०२६)