MP Waqf Board : इतिहासात प्रथमच ‘वक्फ बोर्डा’त २ हिंदु सदस्यांची नियुक्ती !

मध्यप्रदेश सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

अनिमेश भार्गव आणि मनोज मालपाणी

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशमधील भाजप सरकारने ‘वक्फ बोर्डा’ची पुनर्रचना करत १० सदस्यीय नवनियुक्त बोर्डाची स्थापना केली. यामध्ये  २ हिंदु सदस्यांचाही समावेश आहे. इतिहासात प्रथमच वक्फ बोर्डावर हिंदु सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या संदर्भातील अधिकृत अधिसूचना मध्यप्रदेशाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मनोज मालपाणी (रहाणार इंदूर) आणि अनिमेश भार्गव (रहाणार राघोगढ, गुणा) अशी या दोघा नवनियुक्त हिंदूंची नावे आहेत. ‘वक्फ बोर्डा’च्या अध्यक्षपदी सनवर पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने वक्फ कायद्यात केलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांनंतर मध्यप्रदेश सरकारने हे पाऊल उचलले आहे. ‘वक्फ कायदा, १९९५ (सुधारित-२०२५)’ च्या कलम १३ (१) अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून सरकारने कलम १४ मधील प्रावधानांनुसार या बोर्डाची स्थापना केली आहे. नवीन नियमांची तातडीने आणि प्रभावी कार्यवाही (अंमलबजावणी) व्हावी, हा या पुनर्रचनेमागील मुख्य उद्देश आहे.

संपादकीय भूमिका

आता तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याची ओरड करायला आरंभ केल्यास आश्चर्य वाटू नये !