‘सोमनाथ स्वाभिमान पर्वा’निमित्त त्र्यंबकेश्वर येथे भक्ती, संस्कृती आणि परंपरा यांचा दिव्य आविष्कार !

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त ६ जुलैला सकाळी १० वाजता नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, अध्यात्म आणि परंपरा यांचा गौरव जनमानसापर्यंत पोचवणे, तसेच सांस्कृतिक मूल्यांविषयी जनजागृती करणे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचे विशेष सादरीकरण होणार आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता मंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य असून या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविक, कला रसिक आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.