
तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा विस्तार मानवी जीवनाला सुकर करत असला, तरी त्याचे अतीअवलंबित्व आणि अंधानुकरण मानवी अस्तित्वासमोर नवीन आव्हाने उभी करत आहे. अलीकडच्या काळात ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ (एआय – आर्टिफिशल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञानाचा उदोउदो जगभरात चालू आहे. ‘मानवी मेंदूची जागा आता संगणकीय प्रणाली घेणार’, अशा थाटात अनेक जागतिक आस्थापनांनी मानवी मनुष्यबळाला डावलून ‘एआय’वर अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली; परंतु काही काळातच या तंत्रज्ञानाच्या मर्यादा, धोके आणि त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात ‘एआय’च्या गैरवापरावर ओढलेले ताशेरे आणि अमेरिकेतील सुप्रसिद्ध ‘फोर्ड’ आस्थापनाने पुन्हा एकदा मानवी अभियंत्यांना कामावर घेण्याचा घेतलेला निर्णय, या दोन्ही घटना ‘एआय’च्या मर्यादा आणि त्यातून निर्माण होणार्या भीषण संकटांची प्रकर्षाने जाणीव करून देणार्या आहेत.
विवेक आणि गुणवत्ता यांचा अभाव
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एस्. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपिठाने ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल’चा एक निर्णय रहित करतांना अत्यंत मार्मिक टिपणी केली. सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले, ‘एआयद्वारे सिद्ध केलेल्या बनावट किंवा काल्पनिक कायदेशीर उदाहरणांचा वापर करणे, हे भोपाळ गॅस दुर्घटनेतील विषारी वायूगळती इतकेच धोकादायक आहे.’ एआय केवळ त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या डेटाच्या (माहितीच्या) आधारे काम करते. त्याला स्वतःचा ‘विवेक’ किंवा ‘नैतिकता’ नसते. जर चुकीचा डेटा किंवा खोटी माहिती ‘एआय’ला पुरवली, तर ते हुबेहूब खरी वाटणारी; पण पूर्णपणे अस्तित्वात नसलेली, काल्पनिक कायदेशीर उदाहरणे आणि निकाल सिद्ध करू शकते. असे खोटे संदर्भ न्यायालयात सादर करणे, म्हणजे न्यायव्यवस्थेची दिशाभूल करणे आणि पर्यायाने न्यायाचा गळा घोटण्यासारखे आहे. ‘फोर्ड’सारख्या जगविख्यात आस्थापनाने शेकडो अनुभवी ‘मानवी’ अभियंत्यांना पुन्हा कामावर घेतले. याचे कारण असे की, उत्पादनातील ज्या गुंतागुंतीच्या आणि गुणवत्तेशी संबंधित समस्यांचे निवारण मानवी मेंदू सहज करू शकत होता, तिथे ‘एआय’ आधारित स्वयंचलित प्रणाली पूर्णपणे अपयशी ठरल्या. ‘कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया’ आणि ‘आय.बी.एम्.’ यांसारख्या दिग्गजांनाही शेवटी कळून चुकले आहे की, ग्राहकांचे समाधान, भावना समजून घेणे आणि संकटसमयी त्वरित योग्य निर्णय घेणे, ही मानवी क्षमता ‘एआय’मध्ये कधीच येऊ शकत नाही.

लाभ आणि हानी यांतील द्वंद्व
निश्चितच ‘एआय’चे काही लाभ आहेत. पुनरावृत्ती होणारी कामे जलद गतीने करणे, मोठ्या प्रमाणावरील डेटाचे वर्गीकरण करणे, वैद्यकीय संशोधनात साहाय्य करणे किंवा मानवी श्रमाची बचत करणे, यांसाठी ‘एआय’ लाभदायी ठरते; परंतु जेव्हा या लाभांचे रूपांतर अंधानुकरणात होते, तेव्हा मोठी हानी चालू होते. मानवी बुद्धीचा वापर न्यून झाल्यामुळे समाजातील सर्जनशीलता आणि सखोल विचार करण्याची क्षमता नष्ट होत आहे. ‘एआय’च्या साहाय्याने हुबेहूब आवाज पालटणे, खोटे व्हिडिओ बनवणे आणि सायबर फसवणूक करणे अत्यंत सोपे झाले आहे. यामुळे सामाजिक शांतता आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आली आहे. कर्मचार्यांना कामावरून काढून ‘एआय’ आणल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे, ज्याचा फटका मध्यमवर्गीय कुटुंबांना बसत आहे. ‘एआय’मध्ये मानवी भावना, दया, करुणा आणि धर्मनिष्ठा नसते. केवळ लाभ आणि गणित यांवर चालणारे हे तंत्रज्ञान मानवी मूल्यांचा संकोच करत आहे.
अनियंत्रित तंत्रज्ञान आणि छुप्या युद्धाचे साधन
आज जगासमोर सर्वांत मोठे आव्हान हे आहे की, ‘एआय’वर नियंत्रण ठेवणारी कोणतीही जागतिक आचारसंहिता किंवा कठोर कायदेशीर चौकट अजूनपर्यंत पूर्णपणे सिद्ध झालेली नाही. तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जात आहे, त्या वेगाने कायदे बनत नाहीत. याचा गैरफायदा घेऊन आतंकवादी संघटना, देशविरोधी शक्ती आणि गुन्हेगार ‘एआय’चा वापर करून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला खिंडार पाडू शकतात. माहितीचे युद्ध आणि खोटा प्रसार करणे, हे लोकशाहीसमोरील मोठे आव्हान बनले आहे. या भीषण समस्येवर मात करण्यासाठी समाज, आस्थापने आणि सरकार या तिन्ही स्तरांवर व्यापक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
काय केले पाहिजे ?
सामाजिक माध्यमांवर किंवा इंटरनेटवर येणारी कोणतीही माहिती, व्हिडिओ किंवा ऑडिओ खराच आहे कि ‘एआय’ निर्मित आहे ?, याची निश्चिती केल्याविना त्यावर विश्वास ठेवू नका आणि ती पुढे प्रसारित करू नका. केवळ ‘एआय’वर किंवा ‘गूगल’वर विसंबून न रहाता स्वतःचे वाचन, मनन आणि विवेक जागृत ठेवा. ‘एआय’ केवळ ‘माहिती’ देऊ शकते, ‘ज्ञान’ नव्हे, हे लक्षात ठेवा. बुद्धी स्थिर आणि सात्त्विक ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर करा. मन आणि बुद्धी यांच्या शुद्धीसाठी अध्यात्म अन् साधना अत्यंत आवश्यक आहे, जी कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. आस्थापनांनी कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाचे किंवा गुणवत्तेचे नियंत्रण पूर्णपणे ‘एआय’वर सोपवू नये. ‘एआय’ने दिलेला अहवाल अंतिम न मानता त्यावर मानवी देखरेख अनिवार्य असावी. कर्मचार्यांना कामावरून काढण्याऐवजी त्यांना ‘एआय’चा योग्य वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. ‘एआय’ हे कर्मचार्यांऐवजी पर्याय नसून त्याचे साधन बनले पाहिजे. न्यायालयाची दिशाभूल करणार्या किंवा ‘एआय’च्या माध्यमातून बनावट पुरावे सादर करणार्या व्यक्ती किंवा अधिवक्ते यांवर कठोर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. ‘एआय सॉफ्टवेअर’ आस्थापनांनी वापरलेल्या माहितीचा स्रोत उघड करणे बंधनकारक केले पाहिजे, जेणेकरून चोरीच्या किंवा खोट्या माहितीवर बंदी घालता येईल.
विज्ञान आणि तंत्रज्ञान हे मानवाच्या कल्याणासाठी निर्माण झाले आहेत, मानव तंत्रज्ञानाचा गुलाम होण्यासाठी नाही. सर्वोच्च न्यायालयाने भोपाळ गॅस दुर्घटनेशी केलेली तुलना अतिशयोक्ती नाही, तर एक धोक्याची घंटा आहे. जर वेळीच ‘एआय’च्या वापरावर ‘मानवी विवेक’ आणि ‘कायद्याचे नियंत्रण’ ठेवले गेले नाही, तर हे तंत्रज्ञान मानवी सभ्यतेचा विनाश करण्यास कारणीभूत ठरेल. शेवटी यंत्राला कितीही शिकवले, तरी ते ‘यंत्र’च रहाते; त्याला ‘आत्मा’ आणि ‘विवेक’ नसतो. म्हणूनच ‘एआय’चा वापर मर्यादित ठेवून मानवी श्रेष्ठत्व टिकवून ठेवण्यातच संपूर्ण मानवजातीचे हित आहे !
संपादकीय : ‘एनर्जी ड्रिंक’विषयी धोरण हवे !
संपादकीय : भ्रष्टाचार निर्मूलनाचा आदर्श !
संपादकीय : भारतावरील टीकेचे वास्तव
कायदेशीर प्रकरणांत एआयचा वापर मानव देखरेखीखालीच हवा ! – Supreme Court
संपादकीय : ‘विजयाबाई’ पर्वाचा अस्त !
नद्यांचे प्रदूषण रोखण्यात प्रशासन अपयशी ! – सुराज्य अभियान