भारतात राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि एकूणच सरकारी कामकाजात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे प्रमाण अधिक आहे. याचा प्रत्यय राजकारणी, सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानी घातलेल्या धाडींच्या वेळी उघड होणार्या रकमेतून लक्षात येतो. पाण्यातील मासा कधी पाणी पितो, हे जसे सांगता येणे कठीण असते, तसे सरकारी कार्यालयात काम करणारी व्यक्ती कधी भ्रष्टाचार करत असेल, याचे काही सांगता येत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती सापडते, तेव्हाच तिच्या चौकशीतून ती केव्हापासून भ्रष्टाचार करत आहे ? तसेच व्यक्तीच्या निवासस्थानांवर घातलेल्या धाडींतून लक्षात येते. तिने किती माया जमवली आहे ? याचा उलगडा होतो. मुख्य म्हणजे संबंधित सरकारी अधिकारी-कर्मचार्यांचे वेतन त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांनाही ठाऊक असते. असे असूनही त्याच्याकडून घरात अधिक पैसे, भेटवस्तू आणल्या जात असतांना कुटुंबीय गप्प असतात. काही विचारत नाहीत किंवा त्याचे ‘कर्तृत्व’ म्हणून स्वीकारतात, म्हणजे या भ्रष्टाचारात खरेतर कुटुंबियांचाही तेवढाच सहभाग असतो; मात्र ते मूकसंमतीदार बनतात आणि पापाचे वाटेकरी बनतात. कुटुंबियांचाही संबंधिताला अशा प्रकारे पाठिंबा मिळाल्यामुळे अधिकाधिक भ्रष्टाचार करण्यास बळ मिळते आणि तो कोणत्या स्तरापर्यंत नागरिकांची पिळवणूक करील, याविषयी काहीच सांगता येत नाही.
मुलीचा भ्रष्टाचार उघड
या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथील जिल्हा पुरवठा अधिकारी असलेल्या मुलीचा भ्रष्टाचार उघड करणारी तिची आई मुनेश रानी यांना आदर्श मानावे लागेल. उच्चपदस्थ अधिकारी असलेली मुलगी ‘काळी कमाई’ करते, त्यासाठी तिने ५-६ जणांची टोळीच सिद्ध केली असून ते लुबाडणूक करतात, अशी तक्रारच पोलीस उपमहानिरीक्षकांकडे केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. मुनेश रानी यांच्या खात्यात त्यांना न विचारता १५ लाख रुपये जमा केले होते. ‘मुलगी भ्रष्टाचाराचे पैसे माझ्या खात्यात जमा करत होती’, असा आरोप त्यांनी केला असून ‘मला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत’, असेही तक्रारीत नमूद केले आहे. भारतात जिथे लाखो लोक भ्रष्टाचार करतात आणि कोट्यवधी लोक अशा पापांच्या पैशांवर जगतात, तिथे हे उदाहरण विरळाच आहे. समाजातील माणुसकी जशी संपत चालली आहे, तशी भारतियांमधील नीतीमत्ताही रसातळाला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुनेश रानी यांनी मुलीच्या भ्रष्टाचाराचा गुन्हा उघड करणे, ही किती मोठी गोष्ट आहे, हे लक्षात येईल. अशी आई असल्यास घरातील मुले निश्चितच वठणीवर येतील. घराघरातील कुटुंबीय त्यांच्या घरात येणारे पैसे, वस्तू यांच्याविषयी सतर्क राहिल्यास ‘भ्रष्टाचार’ नावाचा कर्करोग आटोक्यात येण्यास वेळ का नाही लागणार ? मुख्य म्हणजे प्रत्येक आई-वडिलांनी स्वत:च्या पाल्यांवर नीतीमत्तेचे आणि आचरण शुद्ध ठेवण्याचे संस्कार घरातच केल्यास मुलगा मोठा झाला, चांगले शिक्षण घेतले, चांगली नाेकरी लागली आणि नंतर मात्र मोठा भ्रष्टाचारी निघाला, असे व्हायला नको.
भ्रष्ट अधिकार्यांवर धाडी
आता तेलंगाणाचे उदाहरण घ्या ! तेथे उच्चपदस्थ पोलीस अधिकारी संकीरेड्डी भीम रेड्डी यांच्या घरासह १६ ठिकाणी पोलिसांनी धाड घातली. त्यांनी अनुमाने २०० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती भ्रष्टाचार आणि अन्य अवैध मार्गांनी गोळा केल्याचे निष्पन्न झाले. राजस्थानमध्ये एका मोठ्या प्रशासकीय अधिकार्याला मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणी त्याच्या निवृत्तीच्या काही दिवस आधीच अटक करण्यात आली. सामान्य सरकारी कर्मचार्यापासून वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांपर्यंत सर्वांना सध्या चांगले वेतन, निवृत्तीवेतन, शासकीय सुविधा अशा अनेक गोष्टी मिळत असतात. अधिकार्याचा दर्जा जेवढा वरचा, तेवढे त्यांना वेतनही अधिक असते. असे असूनही असे वरिष्ठ अधिकारीच भ्रष्टाचारात लिप्त असतात. वरचा अधिकारीच भ्रष्टाचार करत असल्यामुळे वरपासून खालच्या कर्मचार्यापर्यंत भ्रष्टाचाराची मोठी साखळीच निर्माण झालेली असते. त्यामुळे कुणावरही कारवाई झाल्यास त्याला संरक्षण मिळते, कारवाई फार फार तर निलंबनाची होते आणि पुन्हा ६ महिने ते १ वर्ष या कालावधीनंतर तो पुन्हा पदावर रूजू होतोही. महाराष्ट्रातील कल्याण-डोंबिवली महापालिका भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध आहे. तेथे अभियंत्यापासून ते प्रशासनातील अधिकारी यांना लाचेच्या प्रकरणात अटक होते, निलंबन होते आणि निलंबनाचा कालावधी संपल्यावर पुन्हा त्यांची नियुक्ती त्याच पदावर होते. अशाने भ्रष्टाचार कसा संपणार ? संबंधित अधिकार्याने गोळा केलेल्या अवैध संपत्तीचे पुढे काय झाले ? ज्यांना लुबाडून संपत्ती मिळवली होती, ती त्यांना परत केली का ? ही माहिती पुढे येत नाही. याच्या उलट आपण जर पाश्चात्त्य देश, आखाती देश आणि चीनसारख्या साम्यवादी देशाचा विचार केला, तर तेथे माजी ते आजी राष्ट्रीय नेते, लोकप्रतिनिधी, प्रमुख या सर्वांवर भ्रष्टाचार प्रकरणी खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा केली जाते. तेथे भ्रष्टाचाराविषयी एवढी संवेदनशीलता आहे आणि तसे कठोर कायदेही आहेत, शिक्षेची कार्यवाही तात्काळ आहे.
कुटुंबियांनी सावध व्हावे !
भारतातही रामायणातील उदाहरण आदर्श आहे. जंगलात येणार्या-जाणार्यांना मारून त्यांची लुबाडणूक करणार्या वाल्या कोळ्याला जेव्हा नारदमुनींनी विचारले की, तुझ्या कुटुंबियांना विचारून ये की, तुम्ही या पापात वाटेकरी होणार का ? तेव्हा कुटुंबियांनी त्याला नकार दिला होता. हे उत्तर मिळाल्यावर वाल्या कोळ्याचे डोळे उघडले आणि त्याला नारदमुनींनी ‘राम’नाम जपण्यास सांगितल्यावर त्याचे वाल्मीकिऋषींमध्ये रूपांतर झाले. जोपर्यंत वाल्या कोळी गैरमार्गाने स्वत:च्या कुटुंबियांचे पोट भरत होता आणि कुटुंबीय त्याने लुबाडून आणलेले धन अन् वस्तू यांचा उपभोग घेत होते, तोपर्यंत त्याला प्रश्न नव्हता; मात्र कुटुंबियांनी नकार दिल्यावर तो सावध झाला आणि त्याने गैरमार्ग सोडला. जे भ्रष्टाचार करतात, ते स्वत:च्या कुटुंबियांसाठी आणि चैनीत रहाण्यासाठी करतात. जेव्हा भ्रष्टाचार करणार्याच्या कुटुंबियांनाही प्रशासन भ्रष्टाचार करणार्याएवढेच भ्रष्ट म्हणून दंड देईल, तेव्हा कुटुंबीय जागृत होऊन ते भ्रष्ट कुटुंबप्रमुखास उघडे पाडू शकतात. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात ‘छी थू’ होईल, अशी शिक्षा केल्याविना त्यांच्यासह इतरांना जरब बसणार नाही. कुटुंबातील भ्रष्ट व्यक्तीला उघडे पाडणे, हेसुद्धा राष्ट्रकार्य आणि देशसेवा आहे, हे जेव्हा कुटुंबियांवर बिंबेल, तसेच कुटुंबियांना जेव्हा संरक्षण दिले जाईल, तेव्हा असे छुपे भ्रष्टाचारी उघड होण्यास वेळ लागणार नाही. एकूणच उत्तरप्रदेशातील महिला अधिकार्याच्या आईकडून मुलीचा भ्रष्टाचार उघड करण्याचा पवित्रा अभिनंदनास पात्र आणि अनुकरणीय आहे !


संपादकीय : ‘एनर्जी ड्रिंक’विषयी धोरण हवे !
संपादकीय : कृत्रिम बुद्धीमत्तेची मर्यादा !
FIR Against PCS Officer : जिल्हा पुरवठा अधिकारी असलेली मुलगी ‘काळी कमाई’ करत असल्याची स्वतः आईचीच तक्रार !
नाशिक कुंभपर्वाच्या निधीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आमदार अनिल परब यांचा आरोप
संपादकीय : भारतावरील टीकेचे वास्तव
Telangana DSP Corruption : तेलंगाणामध्ये पोलीस उपअधीक्षकाची २०० कोटी रुपयांची अवैध संपत्ती