
वर्ष १९६० ते १९९० हा मराठी साहित्य, रंगभूमी, संगीत आणि महाराष्ट्राच्या कलाविश्वातील सर्वच कला यांचा सुवर्णकाळ होता, असेच म्हणावे लागते. हा काळ ज्या मराठी रसिक प्रेक्षक आणि कलाप्रेमी यांनी अनुभवला, त्या पिढ्याही आता खरे तर सरत चालल्या आहेत; परंतु ‘जेन झी’ (वर्ष १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेली पिढी) आणि त्याच्या पुढच्या पिढीला मराठी कलाकारांनी जगलेल्या अन् जगवलेल्या या संमोहन काळातील हिर्या-माणक्यांची ओळख व्हावी, ही अपेक्षा ! मराठी रंगभूमीलाच मुळात मोठा सशक्त इतिहास आहे; परंतु ज्या काळात तिने कात टाकली, त्या काळाचे प्रतिनिधित्व करणार्यांमध्ये विजयाबाई मेहता यांचा मोठा वाटा होता. बाईंनी मराठी रंगभूमीवरील अनेक प्रस्थापित चौकटी मोडल्या आणि नवनवीन प्रयोग केले. ‘बाईं’चे वैशिष्ट्य म्हणजे हे प्रयोग केवळ आधुनिकतेसाठी आणि काही तरी वेगळे करण्याच्या नावाखाली कृत्रिम करण्याचे नव्हते, तर या संस्कृतीला, मातीला अन् तिच्या मुळांना घट्ट धरून असणारी ती सृजनशीलता होती आणि म्हणूनच कलेचे जाणकार, संवेदनशील प्रेक्षक, कलासक्त रसिक आणि वैचारिक प्रगल्भता असणार्या ४ पिढ्यांना बाईंची कलाकृती भावत आली. ३० जून या दिवशी वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि मराठी रंगभूमीला सुवर्णकाळ अनुभवू देणार्या एका पर्वाचा अस्त झाला.
देहलीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’सह त्या काळात इंग्लंडला जाऊन विजयाबाई मेहता प्रशिक्षित होऊन आल्या होत्या आणि त्यांच्या स्वतःच्या काळात भारतीय रंगभूमी परदेशात कशी पोचेल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जर्मनीचे आंतरराष्ट्रीय नाटककार ‘बर्टोल्ट ब्रेख्त’ यांच्या नाट्यशैलीचे, म्हणजे ‘नाटक केवळ भावनेच्या स्तरावर न रहाता वास्तव समाजासमोर मांडणे’, हा प्रयोग त्यांनी मराठी रंगभूमीत केला. परिपूर्ण अभ्यास हे तर त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होतेच; पण शिकलेले, जाणवलेले प्रत्यक्षात कसे उभे करायचे, साकारायचे, हे मोठे कौशल्य त्यांच्याजवळ होते. इब्राहिम अल्काझी आणि अदि मर्झबान या दोन्ही पारशी कलाशिक्षकांच्या हाताखाली त्या घडल्या होत्या; पण ‘प्रत्येक नाटकात किंवा भूमिकेत प्राण ओतून तिला जिवंत कसे करायचे ?’, हे त्यांचे वैशिष्ट्य होते आणि तेच पुढे नामवंत झालेल्या अनेक कलाकारांना त्यांनी शिकवले. प्रायोगिक रंगभूमीसाठी प्रसिद्ध असणार्या ‘राष्ट्रीय संगीत नृत्य-नाट्य केंद्र’ (एन्.सी.पी.ए.) या मुंबईतील प्रसिद्ध संस्थेच्या संचालकपदी त्या १७ वर्षे होत्या. त्यांच्या काळात प्रशासकीय कौशल्य आणि कलात्मक दृष्टी यांमुळे ही संस्था ‘आशियातील एक अग्रगण्य कला संस्था’ म्हणून प्रसिद्ध झाली. त्यांनी प्रायोगिक रंगभूमीला तांत्रिक सुविधा मिळवून दिल्या आणि प्रायोगिक कलाकारांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ दिले. दिग्गज भारतीय संगीत कलाकारांच्या ध्वनीफिती जतन करण्याचे मोठे काम त्यांनी या काळात केले. मुद्राराक्षस, शाकुंतल, हयवदन, नागमंडल ही भारतीय संस्कृतीतील प्रसिद्ध नाटके त्यांनी जर्मन रंगभूमीवर नेली.
कलाभिमुखता आणि समाजाभिमुखता
नाटककार विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे यांच्यासमवेत त्यांनी ‘रंगायन’ ही संस्था वर्ष १९६० मध्ये चालू केली खरी; परंतु तेंडुलकरांसारख्या पुरोगामी, प्रचारकी, एकांगी लेखकाने त्यांची साथ वैचारिक मतभेदांमुळे नंतर सोडली. विजयाबाईही आधुनिक किंवा स्त्रीवादी विचारांच्या नक्कीच होत्या; परंतु त्यांच्या कलाकृतींतून त्यांनी ना कधी पुरोगामित्वाचा विद्वेष पसरवला, ना धर्मावर आघात करणारे काही सादरीकरण केले. तेंडुलकरांसारख्यांनी ‘घाशीराम कोतवाल’मध्ये एका समाजाच्या बांधणीवर आघात करून समाजाचे श्रद्धाभंजन करण्याचेच ध्येय ठेवले होते; विजयाबाईंमध्ये अशी धर्मविरोधी कट्टरता नव्हती. त्यांनी केशवपनाचा विषय मांडला; परंतु केवळ त्यातील संवेदनशीलता कलेच्या विविध पैलूंच्या माध्यमातून प्रचंड ताकदीने समाजापर्यंत पोचवून त्याचे समाजाभिमुख सादरीकरण केले. त्यातील धार्मिक गोष्टींवर भाष्य न करण्याची प्रगल्भता त्यांनी दाखवली. विद्वेषी प्रचारकी थाट त्यांनी कधी केला नाही किंवा कुठल्याही एका वर्गावर शिंतोडे उडवले नाहीत. त्यांनी सामाजिक भान सोडले नाही, तर कलाभिमुखतेलाच प्राधान्य देऊन समाजाला विचार करायला भाग पाडले. मराठी कला-साहित्यात आधुनिक विचारप्रवाहाचा शिरकाव झालेल्या त्यांच्या काळात हा त्यांच्यातील विशेष पैलू म्हणावा लागेल. ‘बॅरिस्टर’, ‘हमिदाबाईची कोठी’ किंवा ‘महासागर’ या तिन्ही नाटकांतील वेश्येची पात्रे ही कुठेही मर्यादेचे उल्लंघन करणारी (लाऊड) नव्हती, हा त्यांच्या दिग्दर्शनाचा अभिजात दर्जा होता. त्यामुळेच एक माणूस म्हणून त्यांच्यातील जी संवेदनशीलता समाजापर्यंत पोचवायची होती, ती त्या पोचवू शकल्या. ‘बाई’ नाटकच पालटतात’; म्हणून लेखक त्यांच्या हातात नाटक द्यायला कचरायचे. नाटककार जयवंत दळवी यांनी त्यांना ती मुभा दिली आणि त्यामुळे मराठी रंगभूमीवरच्या मैलाचा दगड ठरणार्या कलाकृतींची निर्मिती झाली. ‘लाईफ लाईन’ ही त्यांची दूरचित्रवाहिनीवरील मालिका पुष्कळ गाजली होती. कलेशी संबंधित १८ पुरस्कार त्यांना मिळाले होते. त्या भूमिकेला काय किंवा नाटकाला काय त्या त्यांची स्वतःची ‘ट्रिटमेंट’ (दिशा) देत. ‘कलाकाराने पात्राची मानसिकता जगली पाहिजे’, हा त्यांच्या शिकवणुकीचा गाभा होता. अतिशय आशयगर्भ, सक्षम कलाकृती दिग्दर्शित करून आणि तेवढ्याच ताकदीच्या भूमिका करून त्यांनी मराठी रंगभूमीसह मराठी समाजावर मोठी छाप पाडली. प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केले, हीच त्यांची कला समाजाभिमुख झाल्याची मोठी पावती होती.
आजही शिकवणार्या ‘बाई’ हव्यात !
पदरमोड करून, केवळ कलेसाठी, हौसेसाठी, काही न खाता-पिताही नाटकात काम करण्याचा, पूर्ण झोकून देऊन केवळ नाटकासाठी नाटक करणार्यांचा तो काळ होता. विजयाबाईंनी घडवलेले मराठी दिग्गज कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीत गेले आणि त्यांनी तिथेही मोठा प्रभाव पाडला. ‘बाई’ नावाच्या विद्यापिठातून बाहेर पडून नावलौकिकास आलेले कलाकार घडवल्यामुळे हे शक्य झाले. भक्ती बर्वे, श्रीराम लागू, रिमा लागू यांच्या मागील पिढीपासून विक्रम गोखले, रवींद्र मंकणी, वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, नाना पाटेकर यांच्या पिढीपर्यंत आणि सुकन्या कुलकर्णी अन् रेणुका शहाणे या मधल्या पिढीपर्यंत अनेक नावे ऐकल्यावर ‘बाईं’चे महत्त्व लक्षात येते. दिग्दर्शक हा सर्वगुणसंपन्न असावा लागतो आणि तशा असणार्या बाईंनी केवळ नाटकच नाही, तर कलाकारांच्या ३ पिढ्या घडवल्या. पैसा, प्रसिद्धी, वलय, व्हिडिओ, रिल हा तो काळ नव्हता. केवळ नाटकासाठी नाटक, प्रायोगिक आणि समांतर रंगभूमीवरील शेकडो प्रयोग अन् त्याला दाद देणारे मराठी रसिक प्रेक्षक असा तो काळ होता. विजया बाईंसारख्या व्यक्तीमत्त्वामुळे आणि कलाकारांच्या निरपेक्ष योगदानामुळे मराठी रंगभूमीने एक सुवर्णकाळ अनुभवला अन् पुढील पिढीला समृद्ध वारसा दिला. अशा समृद्ध कलाकार हव्यात !

संपादकीय : भारतावरील टीकेचे वास्तव
संपादकीय : पाकिस्तानची चहूबाजूंनी कोंडी !
संपादकीय : उष्णतेचा कहर !
संपादकीय : पश्चिम घाटाचे रक्षण करा !
संपादकीय : श्रीरामावरील आघात !
संपादकीय : अवघ्या पावणे दोन मासांत शिक्षा !