कामगार विमा रुग्णालयांत आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न ! – प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री

मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये (ई.एस्.आय.) आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ३ जुलै या दिवशी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या घंट्यात सांगितले.

सदस्या प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला, तर सदस्य भाई जगताप, प्रसाद लाड, राजीव पोतदार यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देतांना ते बोलत होते.

मंत्री आबिटकर म्हणाले की, कामगार विमा रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून कामगारांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी शासन कटिबद्ध आहे. एक्स-रे यंत्रासह आवश्यक वैद्यकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कामगार विमा रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली, तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध आधुनिक वैद्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.