पंढरपूर महाआराखड्यासाठी वास्तूविशारदाची तातडीने नियुक्ती करा ! – जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर

अंतिम सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर होणार !

बैठकीमध्ये बोलतांना डावीकडून जिल्हाधिकारी एस्. कार्तिकेयन, पालकमंत्री जयकुमार गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

सोलापूर – येथील नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुलाच्या ३ सहस्र ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या महाआराखड्याच्या कार्यवाहीसाठी वास्तूविशारदाची तातडीने नियुक्ती करून पुढील ४ दिवसांत स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवावी, अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

या बैठकीत मंत्री गोरे म्हणाले की, शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने वास्तूविशारदाची नियुक्ती करून आराखडा सिद्ध करावा. जिल्हास्तरीय समितीसमोर आराखड्याचे सादरीकरण करावे. समितीची मान्यता मिळाल्यानंतर अंतिम सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात येऊन पुढील कार्यवाही केली जाईल. कार्यकारी अभियंता अमित निमकर यांनी शासकीय नियमानुसार वास्तूविशारदाची नियुक्ती आणि शुल्क यांविषयी माहिती दिली.