२९.४.२०२६ या दिवसापासून साधिकेला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !

‘३.५.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आज (२९.४.२०२६) वातावरणात नेहमीपेक्षा आनंद जास्त प्रमाणात आहे. माझी शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही, तो माझ्या मनालाही जाणवत आहे. याचा अर्थ सूक्ष्म-स्तरावर रामराज्य स्थापनेचे कार्य आता व्यवस्थित चालू आहे.

साधकांनो, तुम्हालाही आजपासून कार्याच्या दृष्टीकोनातून सूक्ष्माच्या स्तरावर मनाला काही पालट जाणवल्यास ते लिहून पाठवा. लिखाण पाठवतांना आजपासून मनाला काय चांगले जाणवते आणि पूर्वी त्यासंदर्भात मनाला कसे जाणवत होते ?, अशी तुलनात्मक सूत्रे लिहून पाठवा’, अशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट प्रसिद्ध झाली होती. त्या संदर्भात मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सुश्री (कु.) नलिनी राऊत

१. ‘यापूर्वी सायंकाळ झाल्यावर माझ्या मनाला एक प्रकारची मरगळ आणि थकवा जाणवायचा. मला सेवा करण्यास उत्साह वाटत नसे. आता सायंकाळी ‘ढगांचा रंग केशरी, लालसर झाला आहे’, असे मला जाणवते. सूर्याचे किरण केशरी, पिवळे आणि पांढर्‍या रंगांचे झालेले दिसतात. त्या वेळी ‘संपूर्ण वातावरणातही तसेच रंग पसरले आहेत आणि ‘वातावरण पुष्कळ चैतन्यमय झाले आहे’, असे मला जाणवते. माझ्या मनाला एक प्रकारचा उत्साह जाणवतो.

२. मला देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरात मुंगुस, खार हे प्राणी आणि भारद्वाज हा पक्षी दिसतो. मला सकाळ-सायंकाळ कोकिळेचे कूजन ऐकू येत असते. असे शुभ संकेत देणारे पशूपक्षी सभोवताली वावरत असतात. त्या वेळी ‘आपण ऋषिमुनींच्या आश्रमात आहोत’, असे जाणवून मला पुष्कळ आनंद होतो.

३. याआधी सहसाधकांनी सेवेत अपेक्षित साहाय्य केले नाही, तर माझ्याकडून तीव्र अपेक्षा केल्या जायच्या. त्यामुळे त्यांच्या विषयी माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. आता मी साधकांच्या अडचणी समजून घेते. माझे मन सकारात्मक असते. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता मला सहसाधकांना समजून घेता येते.

४. मी सेवेतील अडचणी शांत आणि स्थिर राहून सोडवण्याचा प्रयत्न करते. माझ्याकडून भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतात.

५. माझी देवावरील श्रद्धा वाढली आहे. माझ्या मनात ‘देव साहाय्य करणारच आहे’, असा विचार असतो आणि सेवा करतांना मला तशा अनुभूतीही येतात.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला हे सर्व अनुभवता आले,’ त्याबद्दल मी त्यांच्या चरणी शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.