
विषारी दारू प्यायल्यामुळे पिंपरी-चिंचवड भागातील १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. अर्थात् विषारी दारूमुळे नागरिकांचा मृत्यू होण्याची ही काही पहिली घटना नव्हती. याआधी वर्ष २०११ मध्ये बंगालमधील संग्रामपूर भागात विषारी दारू प्यायल्याने १५० जण, वर्ष २०१३ मध्ये आझमगढमध्ये (उत्तरप्रदेश) बनावट दारू प्यायल्याने ४२ जण, वर्ष २०१५ मध्ये मुंबईतील मालवणीमध्ये १०६ जणांचा मृत्यू झाला. दारूमधील मिथेनॉलचा अतीप्रमाणात वापर केल्यामुळे या प्रकरणात काही जणांना दृष्टीही गमवावी लागली होती. वर्ष २०२० मध्ये पंजाबमधील १०० हून अधिक जण, वर्ष २०२२ मध्ये दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारूने २६ जण, दारूबंदी असलेल्या गुजरातमधील बोटाद जिल्ह्यातही विषारी दारू प्यायल्याने ३१ जण, तर तमिळनाडूमधील कल्लाकुरुचीमध्ये ६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. याखेरीज प्रतिदिन दारू प्यायल्यामुळे किंवा दारूच्या आहारी गेल्यामुळे प्रतिवर्षी सहस्रो जण मृत्यूमुखी पडतात, सहस्रो संसार रस्त्यावर येतात. दारूमुळे होणारी हानी लक्षात घेता संपूर्ण भारतात दारूबंदी करण्याची आवश्यकता असतांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र खेड्यापाड्यांत दारू बनवण्यासाठी पेटवल्या जाणार्या हातभट्ट्या अधिकृत करून त्यातून महसूल कमवण्याचा सल्ला सरकारला दिल्याचे वृत्त नुकतेच वाचनात आले. ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यावर लोकांचे प्राणही वाचतील’, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘हातभट्ट्या अधिकृत करून लोकांचे प्राण कसे वाचतील ?’, हा प्रश्न वरील सल्ला वाचल्यावर अनेकांना पडला.

दारूच्या व्यसनाने आजतागायत अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत, अनेकांना कर्जबाजारी केले, तर अनेकांना भिकेला लावले. व्यसनाच्या अधीन झालेल्यांना पत्नी-लेकरे तुच्छ मानायला लावणारी दारू सुखी संसारात विष पेरण्याचे कार्य करते. दारूड्यांचा त्रास त्यांच्या शेजारपाजारी रहाणार्यांनाही सहन करावा लागतो. प्रतिवर्षी मद्यविक्रीतून राज्यांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याने कोणतेही राज्य सरकार त्यांच्या राज्यात दारूबंदी करण्यास अनुकूल नसते. बिहार, गुजरात, मिझोराम, नागालँड, मणीपूर आदी राज्यांत, तर काही राज्यांतील गावांत आणि तालुक्यांत संपूर्ण दारूबंदी करण्यात आली आहे. वर्ष २०२५-२६ मध्ये विक्रमी ४८ सहस्र कोटी रुपये इतका महसूल मिळाला. २० सहस्र ५६७ हॉटेल किंवा बार यांना विदेशी दारू विकण्याची अनुमती आहे. महाराष्ट्रात केवळ १०० रुपये घेऊन सरकार दारुड्यांना वर्षभर दारू ढोसण्याची अनुमती देते, तर १००० रुपयांत जीवनभर दारू पिण्याची अनुमती मिळते. दारूकडे महसूल मिळवून देणारे साधन म्हणून पहाणारे शासनकर्ते असतील, तर दारूबंदी कशी होणार ? यासाठी जनतेचा प्राधान्याने विचार करणारे हिंदु राष्ट्र्रच हवे !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !