निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याचे नगराध्यक्षांचे निर्देश

राजापूरगढीचे सुशोभीकरण केलेले बांधकाम पहिल्याच पावसात खचले !

राजापूर, २ जुलै (वार्ता.) – पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजापूर शहरात चालू असलेल्या राजापूरगढीचे (प्राचीन ब्रिटीशकालीन वखारीचे )
बांधकामाचा काही भाग पहिल्याच पावसात खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अधिवक्त्या हुस्नबानू खलीफे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी केली. या पहाणीच्या वेळी चालू असलेल्या कामाचा काही भाग खचल्याचे आणि कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे उघड झाले. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत नगराध्यक्षांनी, ‘संबंधितांकडून झालेल्या निष्काळजीपणाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी’, असे निर्देश नगर परिषद प्रशासनाला दिले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी आणि पर्यटन संचालनालय विभागाकडे तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

राजापूर शहराच्या मध्यवर्ती विभागामध्ये प्राचीन ब्रिटीशकालीन वखारीचे सुशोभीकरण करून जतन आणि संवर्धन करण्याची अनेक वर्षांपासून मागणी आहे. अलिकडे पर्यटन संचालनालयाच्या वतीने येथील सुशोभीकरण आणि रंगरंगोटीचे काम चालू असून शासनाकडून त्याच्यासाठी १ कोटी रुपये अनुदान संमत झालेले आहे.; मात्र चालू असलेले बांधकाम खचल्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या पहाणी दौर्‍याच्या वेळी नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, अभियंता स्वप्निल पड्यार, आरोग्य निरीक्षक अमित पोवार, मुकादम राजन जाधव, संदेश जाधव यांच्यासह नगर परिषदेचे अन्य आधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.