वाशिम येथे ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा !

  • वर्ष २०११ मध्ये पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

  • निष्पाप तरुणाला गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप

  • १५ वर्षांनंतर लागला निकाल

वाशिम – येथील जिल्हा सत्र न्यायालयाने ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एक तरुण वर्ष २०११ मध्ये पोलीस कोठडीत असतांना पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणी १५ वर्षे १ महिना आणि २३ दिवसानंतर वाशिमचे जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला.

१. ९ मे २०११ या दिवशी रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे याच्यासह ८ पोलीस कर्मचार्‍यांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी वस्तीवर धाड घातली होती. यात बेग्या पवार या तरुणाला एका चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. गुन्हा मान्य करण्यासाठी पोलिसांनी त्याला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

२. या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) ३४ दिवस अन्वेषण करून हत्येच्या गुन्ह्यासह विशेष ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांर्गत दोषी पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. यानंतर १५ वर्षांनी निर्णय देण्यात आला.

३. बेग्या पवार याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नव्हता. तो केवळ पारधी असल्याने पोलिसांनी त्याला अडकवले होते.

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या पोलिसांची नावे !

रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह पोलीस कर्मचारी मदन पवार, शिवाजी खिल्लारी, पंजाब पाटकर, रमेश पवार, प्रकाश तारम, नागोराव खांडके, अशोक वैद्य आणि वसंत जाधव अशी जन्मठेप झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

संपादकीय भूमिका

वाशिमच्या घटनेप्रमाणे अन्य प्रकरणांतही निष्पाप लोकांना विनाकारण कारागृहात डांबणार्‍या आणि त्यांच्यावर अत्याचार करणार्‍या पोलिसांना अशीच कठोर शिक्षा व्हायला हवी !