श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक सनातन प्रभात, मुंबई
मुंबई, २ जुलै (वार्ता.) – सध्याचा काळ माहिती-तंत्रज्ञानाचा आहे. याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने एप्रिल २०२६ पासून ‘माहिती आणि तंत्रज्ञान’ या स्वतंत्र विभागाची स्थापना केली; परंतु अनेक वर्षे झाली, तरी माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक इंग्रजी शब्दांसाठी पर्यायी मराठी परिभाषा कोश अस्तित्वात नाही. परिणामी आजही सरकारच्या दैनंदिन कामकाजात माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित ‘डाऊनलोड’, ‘अपलोड’, ‘फोल्डर’, ‘सायबर’, असे शेकडो इंग्रजी शब्द सर्रास वापरले जात आहेत. या परिभाषा कोशाची निर्मिती झाल्यास माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील परकीय शब्दांसाठी मराठी भाषेतील दर्जेदार शब्द वापरता येऊ शकतील. यातून मराठी भाषा अधिक समृद्ध होईल. त्यामुळे या परिभाषा कोशाच्या निर्मितीला मराठी भाषा विभाग अर्थात् महाराष्ट्र सरकारने प्राधान्य देणे अपेक्षित आहे.
Sanatan Prabhat Exclusive | Maharashtra Has No Marathi IT Glossary!
Despite extensive use of information technology in government administration, Maharashtra has no standardised Marathi glossary for IT-related English terms.
Chhatrapati Shivaji Maharaj created the Rajyabhasha… pic.twitter.com/rPpTq3xeCc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 2, 2026
आधुनिकतेमुळे मागील काही वर्षांत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक उपकरणे आणि सेवा यांची निर्मिती झाली. ही निर्मिती युरोपीय देशांत झाली असल्यामुळे त्यांची नावे इंग्रजीत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर भारतामध्येही होऊ लागल्यावर प्रत्येक राज्याने त्यासाठी आपापाल्या भाषेतील पर्यायी शब्दांची निर्मिती करणे आवश्यक आहे, तसे महाराष्ट्रातही त्याची मराठीत निर्मिती होणे आवश्यक आहे. या शब्दांना एकतर पर्यायी मराठी शब्द अस्तित्वातच नाहीत किंवा जे पर्यायी मराठी शब्द वापरले जातात, ते प्रचलित नाहीत. राज्यशासनाने अशा शब्दांचा परिभाषा कोश सिद्ध केल्यास त्या शब्दांना राज्यमान्यता प्राप्त होईल आणि शासनाच्या कामकाजात अन् कालांतराने समाजामध्येही हे मराठी शब्द प्रचलित होतील.

आतापर्यंत ३८ परिभाषा कोशांची निर्मिती !
विविध क्षेत्रांतील शब्दांची सूची करून ‘मराठी परिभाषा कोशा’ची निर्मिती करण्याचे महत्त्वाचे काम भाषा संचालनालयाकडून केले जाते. मराठी भाषा विभागाचा हा अत्यंत महत्त्वाचा; परंतु दुर्लक्षित विभाग आहे. भारताच्या राज्यघटनेपासून ते विधीमंडळातील कायदे, विधेयके, राज्यपालांचे भाषण आदी महत्त्वाच्या शासकीय इंग्रजी लिखाणाचे सोप्या आणि सुलभ मराठी भाषेत भाषांतर करण्याचे काम भाषा संचालनालयाकडून केले जाते. आतापर्यंत या विभागाने कृषीशास्त्र, रसायनशास्त्र, संख्याशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, धातूशास्त्र, गणितशास्त्र, शिक्षणशास्त्र आदी विविध क्षेत्रांतील ३८ परिभाषा कोशांची निर्मिती केली आहे.
सरकारी कामकाजात माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित इंग्रजी शब्दांचा सर्रास वापर !
हार्डवेअर, हार्डडिस्क, मदरबोर्ड, कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, ब्राऊझर, डोमेन, वाय-फाय, हॉटस्पॉट, डाऊनलोड, अपलोड, राऊटर, अँटीव्हायरस, सायबर, फोल्डर, प्रॉम्प्ट, ईमेल, व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉन्फरन्स, क्यू.आर्.कोड, असे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शेकडो शब्द शासकीय कामकाजात वापरले जात आहेत.
परिभाषा कोश निर्मितीचे महत्त्व !हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्यावर मराठी भाषेवरील परकीय भाषांचा प्रभाव न्यून करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘राज्यभाषा कोशा’ची निर्मिती केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही परकीय शब्दांसाठी अनेक मराठी शब्दांची निर्मिती केली. त्यांतील महापौर, मुख्याध्यापक, पाणबुडी, विधीज्ञ, प्राध्यापक, बोलपट, अधोरेखित, मूल्य, कोषाध्यक्ष, अनुपस्थित, शोध, धन्यवाद, सोंगाड्या, पारितोषिक, अर्थसंकल्प, भत्ता, पटांगण आदी अनेक शब्द आपण आजही वापरतो. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, त्या वेळी मराठीवर इंग्रजी भाषेचा प्रभाव होता. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन प्रथम शासकीय पदांसाठी मराठी शब्दांची निर्मिती करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर भाषा संचालनालयाने ‘पदनाम’ या परिभाषा कोशाची निर्मिती केली. आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित शब्दांसाठी स्वकीय शब्दांची निर्मिती वेळीच केली नाही, तर येणार्या पिढीवर परकीय शब्दांचाच प्रभाव राहील. त्यांच्यावर स्वकीय भाषेचा संस्कार करण्यासाठी काही वर्षे जातील. त्यामुळे वरील थोर व्यक्तींनी स्वकीय शब्दांच्या निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांचा आदर्श समोर ठेवून राज्य सरकारने आधुनिक शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्दांच्या निर्मितीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. |

मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार