बळीप्रथेला विरोध करणारे आणि कर्मकांडापेक्षा मन:शुद्धीस महत्त्व देणारे संत कबीर !

‘समाजनिर्मिती ही संत कबीर यांच्या सार्‍या धडपडीमागचे ध्येय होते. संत कबीर अंधश्रद्धामुक्त माणसांचे स्वराज्य निर्माण करू इच्छित होते. याच विचारांनी संत कबीर यांनी ‘माळ घेऊन जप करणे’, यांसारख्या कर्मकांडाचाही विरोध केला होता. त्यांच्या मते असे बाह्य उपचार करून प्रदर्शन करण्यापेक्षा अंतर्शुद्धीस अधिक महत्त्व द्यायचे. ते रामजपातील ‘र’कार आणि ‘म’कार यांपेक्षा मनःशुद्धीस श्रेष्ठ मानत असत.

कर्मकांडापेक्षा मन:शुद्धीस महत्त्व देणारे संत कबीर !

१. मन शुद्ध आणि पवित्र असावे !

‘मन चंगा तो कठौती में गंगा’, म्हणजे तुमचे मन शुद्ध आणि पवित्र असेल, तर तुम्हाला कोणत्याही तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही; कारण मन पवित्र करण्यासाठीच तीर्थयात्रा करायच्या असतात. जर तुमचे मन आधीच पवित्र असेल, तर तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकताच नसते. या म्हणीची उत्पत्ती संत मीराबाईचे गुरु संत रविदास (रैदास) यांच्याशी जोडलेली आहे. संत रविदास हे व्यवसायाने चांभार होते. ते जनावरांचे चामडे धुण्यासाठी लाकडी पसरट भांडे (कठौती) वापरत. जनावराचे चामडे धुतलेले त्यातील पाणी अस्वच्छ असले, तरीसुद्धा ते पवित्र गंगेसारखे झाले होते. संत रविदास यांच्या मनाचा खरेपणा आणि निर्मळ भक्ती यांमुळे असा चमत्कार होऊ शकतो, हे त्यांच्या निर्मळ भक्तीने दाखवून दिले.

२. माळ घेऊन नामस्मरण करण्यापेक्षा अंतर्शुद्धी महत्त्वाची !

‘प्रकट नामस्मरणापेक्षा अंतर्शुद्धी महत्त्वाची कशी ?’, अशा विचारांवर त्यांची अढळ श्रद्धा होती. हे समजावतांना ते सांगतात,

माला तो कर में फिरै, जीभी फिरै मुख माहिं ।
मनुवा तो चहुँ दिसि फिरै, यह तो सुमिरन नाहिं ।।

अर्थ : ज्याच्या हातात जपमाळ फिरत आहे आणि मुखातील जीभ ईश्वराचे नाम घेत आहे (कीर्तन किंवा भजन चालले आहे.); परंतु त्याचे मन ईश्वराच्या नामावर स्थिर न रहाता चारही दिशांना भटकत असेल, तर ही ईश्वराची खरी स्मरणभक्ती नाही, हा केवळ एक दिखाऊपणा आहे.

३. ‘देव देवळात, चित्त खेटरात’, अशी विसंगती नसावी !

‘देव देवळात, चित्त खेटरात’, अशी अंतर्बाह्य विसंगत धर्मपद्धती ‘ही केवळ अंधश्रद्धेची परिणती’, यावर कबीर ठाम होते. ते धर्माच्या नावावर निष्पाप प्राण्यांचा बळी देण्यामागील धर्मपंडितांचा (कथित) स्वार्थ ओळखून होते; म्हणून त्यांनी अशा बळीप्रथेचा प्राणपणाने विरोध केला. ‘सांई के सब जीव है, कीरी कुंजर दोयः ।’ म्हणजे सर्व जीव ईश्वरानेच निर्माण केले आहेत. मग ती लहानशी मुंगी असो किंवा विशालकाय हत्ती (कुंजर) असो, ही सर्व त्या एकाच परमेश्वराची रचना आहे. त्यामुळे आपल्या मनात त्या सर्वांप्रती दया आणि प्रेम असायला हवे.

४. धर्माच्या नावावर पशूहत्या नको !

अशी धारणा असलेले कबीर पशू, पक्षी, कीटक सर्वांठायी ईश्वर मानणारे संत होते. त्यांनी धर्माच्या नावावर पशुहत्या जोपासणार्‍या मनुष्यास ‘बेभरवशाचा प्राणी’ मानले होते, ते यामुळेच !

‘बकरी पाती खात है, ताकी काढी खाल ।
जो नर बकरी खात हैं, तिनकौ कौन हवाल ।।’

अर्थ : केवळ झाडाची पाने आणि गवत खाणार्‍या निष्पाप, शाकाहारी बकरीला ठार मारून मांसाहारी मनुष्य तिचे मांस आनंदाने खातात. अशा पापी, क्रूर मनुष्यांचे भविष्यातील जीवन आणि ईश्वरी दंड किती भयानक असेल, याची कल्पना करा.

हे ही वाचा → संत कबीर यांच्या उलटबांसिया !

(उलटबांसिया म्हणजे संत कबीर यांनी वापरलेली एक काव्यशैली)

५. धर्माचरणाच्या नावाखाली अंधानुकरण नको !

‘गवत खाऊन जगणार्‍या शाकाहारी शेळीचा शुद्ध आचार’ या पार्श्वभूमीवर ‘धर्माच्या नावाखाली निष्पाप प्राण्यांचा बळी देण्याचा मनुष्याचा अघोरी व्यवहार’, संत कबीर कसे मान्य करतील ? अशा प्रकारे कबीर अनेक धर्माचार्‍यांचा विरोध करतात; कारण त्यांच्या मुळाशी असलेली अंधश्रद्धेची, अंधानुकरणाची प्रवृत्ती.

(साभार : ‘संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन’)