भारताची ‘सांस्कृतिक स्वातंत्र्य रणनीती’: सैन्यदलाच्या ‘ड्रेस कोड’ (वस्त्रसंहिता) पालटातून उलगडणारे धडे !

भारतीय सैन्य दलाने वर्ष २०२६ मध्ये ब्रिटीशकालीन औपनिवेशिक (परकीय देशाने आपल्या देशावर सत्ता, नियंत्रण किंवा शासन प्रस्थापित केलेले, म्हणजेच वसाहतवादी) ‘ड्रेस कोड’ रहित करून नूतन ‘आर्मी युनिफॉर्म्स, २०२६’ लागू केले. यात बंदी जॅकेट, पारंपरिक ‘पाऊच बेल्ट’ (कंबरेला गुंडाळायचा, कप्पे असलेला पट्टा) हटवणे, तसेच आधुनिक ‘विंटर जॅकेट’चा समावेश आहे. हा पालट केवळ वेशभूषेचा नाही, तर भारताच्या सांस्कृतिक स्वातंत्र्याची रणनीती स्पष्ट करणारा आहे. ब्रिटिशांनी दिलेल्या गणवेशाचे पालन आजपर्यंत चालू होते. नूतन गणवेश हा भारतीय भौगोलिक आवश्यकता, हवामान आणि कार्यक्षमता यांना अनुरूप आहे. यात विशेष, म्हणजे सैन्यदल, नौदल आणि वायूदल यांमध्ये एक समान व्यावहारिक गणवेश प्रणाली लागू होत आहे.

१. भारताची रणनीती

वसाहतवादाच्या काळातील परंपरांपासून पुढे जात भारतीय सैन्याच्या गणवेशामध्ये करण्यात येणारे पालट हे केवळ पोशाखातील पालट नसून सांस्कृतिक स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय ओळख यांचे प्रतीक आहेत. भारतीय संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीय मूल्ये यांना महत्त्व देत सैन्याची ओळख अधिक भारतीय स्वरूपात विकसित केली जात आहे. नवीन गणवेशामध्ये सैनिकांच्या कार्यक्षमतेला प्राधान्य देण्यात आले असून हवामान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार तो अधिक व्यावहारिक बनवण्यात आला आहे. ‘विंटर जॅकेट’सारख्या सुविधांचा समावेश केल्यामुळे सैनिकांचे आरोग्य, आराम आणि प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची क्षमता वाढण्यास साहाय्य होते. स्वातंत्र्यानंतरचा हा एक महत्त्वाचा पालट मानला जात आहे. ‘आत्मनिर्भर भारता’च्या संकल्पनेनुसार परदेशी पद्धतींवर अवलंबून न रहाता भारतीय गरजा, हवामान आणि सुरक्षा आव्हाने लक्षात घेऊन स्वदेशी पद्धतीने गणवेश अन् उपकरणे विकसित करण्यावर आता भर दिला जात आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

२. सांस्कृतिक स्वातंत्र्याचे महत्त्व

सांस्कृतिक स्वातंत्र्य, म्हणजे केवळ बाह्य पालट नव्हे, तर मानसिक आणि राष्ट्रीय ओळख यांतील परिवर्तन होय. वसाहतवादाच्या काळातील गणवेश आणि परंपरा सैनिकांना ब्रिटीश वारशाची सतत आठवण करून देत होत्या. नवीन गणवेशामुळे भारतीय संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीय मूल्ये यांच्याशी अधिक जवळीक निर्माण होत आहे. त्यामुळे सैनिकांमध्ये ‘ब्रिटीश परंपरेचा वारसा’ ही भावना न्यून होऊन ‘भारतीय सैन्य’ म्हणून अभिमान आणि आत्मविश्वासाची भावना अधिक दृढ होत आहे.

३. आधुनिक कार्यक्षमता

नवीन गणवेश पद्धतीमध्ये सैनिकांच्या प्रत्यक्ष गरजांना प्राधान्य देण्यात आले आहे. ‘फील्ड’ (ठिकाण) आणि ‘स्टेशन’ (नियुक्त करण्यात आलेले स्थान) यांच्या परिस्थितीनुसार हवामान, भौगोलिक स्थिती आणि कामाचे स्वरूप लक्षात घेऊन योग्य गणवेश उपलब्ध करून दिला जातो. गणवेशातील पालट हा भारताच्या व्यापक सांस्कृतिक पुनरुत्थानाचा एक भाग मानला जातो. भारत आता निर्णय घेतांना स्वतःचा इतिहास, संस्कृती आणि गरजा यांवर आधारित दृष्टीकोन स्वीकारत आहे. सैन्याची ओळख भारतीय संस्कृतीशी जोडल्यामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि अभिमान यांविषयीची भावना अधिक कणखर होत आहे.

(चित्रावर क्लिक करा)

४. संस्कृतीतून जागतिक ओळख

गणवेशातील पालटामध्ये मानसिक आणि सांस्कृतिक स्वावलंबनाचा संदेश दिसून येतो. सैनिकांना भारतीय ओळखीतून कार्य करण्याचा अभिमान मिळत असून भारत आर्थिक आणि सैनिकी क्षेत्रांसह सांस्कृतिक क्षेत्रातही स्वतंत्र अन् आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करत आहे. भारतामध्ये भाषा, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्ये यांना पुन्हा महत्त्व दिले जात आहे. हिंदी, तसेच विविध प्रादेशिक भाषांचा वापर आणि महत्त्व वाढत आहे. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात भारतीय इतिहास, ज्ञानपरंपरा अन् संस्कृती यांवर आधारित अभ्यासाला प्रोत्साहन दिले जात आहे. या सर्व प्रक्रियेमुळे भारत संस्कृतीवर आधारित जागतिक ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पुढे जात आहे.

भारतीय सैन्य दलाचा गणवेश पालट हा केवळ वेशभूषेचा पालट नाही, तर देशाच्या सांस्कृतिक स्वातंत्र्याची रणनीती स्पष्ट करणारा आहे. हा पालट दर्शवतो की, भारत आता वसाहतवादाच्या वारशातून मुक्त होऊन स्वतःच्या राष्ट्रीय ओळखीवर आधारित आहे. भारत आता सांस्कृतिकरित्या ‘भारतीय’ बनत आहे, ‘आत्मनिर्भर, आत्मविश्वासी आणि स्वतःच्या परंपरेवर आधारित !’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (२२.६.२०२६)

संपादकीय भूमिका

भारतियांमधील हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन मूर्तसमवेत अमूर्त संवेदनांमध्येही झाल्यास भारत खर्‍या अर्थी ‘आत्मनिर्भर’ बनेल !