कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

मुंबई – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील आगामी कुंभपर्वाच्या अनुषंगाने कुंभमेळा प्राधिकरण आणि विभागीय आयुक्त यांच्या बनावट स्वाक्षरीचा अन् ‘डिजिटल स्पूफिंग’ (खोटी ओळख वापरून फसवणे) तंत्रज्ञानाचा वापर करून अनुमाने ७० कोटी रुपयांच्या कामांचे बनावट कार्यादेश (वर्क ऑर्डर) सिद्ध करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी २ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात दिली. या संदर्भात सदस्यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न विचारला होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, यापुढे अशी फसवणूक टाळण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून निर्गमित करण्यात येणार्‍या सर्व आदेशांवर ‘युनिफॉर्म क्यू.आर्. कोड’ (सामाईक डिजिटल संकेतांक) असणारी प्रणाली विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हा क्यू.आर्. कोड ‘स्कॅन’ केल्यावर संबंधित आदेशाची पडताळणी करणे शक्य होणार आहे, तसेच हे आदेश सार्वजनिक पोर्टलवर प्रसिद्ध करून मूळ आदेशाची ‘लिंक’ संलग्न केली जाईल, त्यामुळे प्रमाणीकरण सुलभ होईल.