संत कबीर यांच्या उलटबांसिया !

(उलटबांसिया म्हणजे संत कबीर यांनी वापरलेली एक काव्यशैली)

आज संत कबीर यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…

१. संत कबीर यांची शिकवण : स्वरूपज्ञान हेच खरे !

एक साधक म्हणून संत कबीर यांची शिकवण वाचतांना एक गोष्ट मनात प्रारंभीलाच जेवढी स्पष्ट असेल तेवढे चांगले. ती म्हणजे संत कबीर ‘स्वरूपज्ञान हेच एकमेव जीवनध्येय’, असे कशाशीही तडजोड न करता सांगतात. ते सांगतात, ‘सामान्यांनी व्यावहारिक जीवनात फसून न जाता आध्यात्मिक जीवनाकडे येत साधक बनावे आणि साधकाने स्वरूपज्ञान हेच एकमेव ध्येय ठेवून साधना करावी.’

२. भक्ती आंदोलनातील संत कबीर यांचे योगदान

उत्तर भारतीय समाजावर इस्लामचे आक्रमण होत असतांना ज्या भक्ती आंदोलनाने त्याला बोथट केले आणि या भूमीतील सनातन संस्कृती उत्तम प्रकारे राखली, त्यात संत कबीर यांनी सिंचित केलेल्या निर्गुण भक्तीचा मोठा वाटा आहे. त्यांनी या भक्तीच्या आधारे सामान्यांना त्यांचा आंतरिक परिचय करून देत आत्मबल वाढवल्याने जणू बाह्य आक्रमणापासून रक्षण करणारी तटबंदीच सामान्यांच्या भोवती सिद्ध झाली. संत कबीर यांच्या कार्यात त्यांच्या काव्यरचनांचा पुष्कळ मोठा वाटा आहे. आजही साधक असलेले आणि नसलेले यांना संत कबीर यांची एखादी ओळ तरी ठाऊक असते, यांतच सर्व काही आले. यादृष्टीने त्यांच्या रचनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. पुढे संत कबीर यांच्या काही काव्यपंक्ती, त्यांचा शब्दार्थ आणि नंतर भावार्थ दिला आहे. वाचतांना प्रत्येक टप्प्याला आपल्या मनाची स्थिती कशी असते, ते पहावे.

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

३. दिलेल्या काव्यपंक्तींची वैशिष्ट्ये

३ अ. ‘खिचडी’ भाषा : संत कबीर यांनी स्वतःचे विचार मांडण्यासाठी सर्वसामान्यांची भाषा निवडली. ज्यामध्ये अवधी, ब्रज, भोजपुरी, पंजाबी आणि फारसी शब्दांचे मिश्रण होते.

३ आ. धक्कादायक शब्दार्थ : शब्दार्थ पाहिल्यास नित्य अनुभव, अपेक्षा, समजूती यांना धाब्यावर बसवत अनाकलनीय, विचित्र, कल्पनेच्याही बाहेरचे, असे काही सांगितल्याचे लक्षात येते.

३ इ. गहन भावार्थ : शब्दार्थाचा भावार्थ पाहिल्यास अनपेक्षित गहन सत्य समोर येते. ते विचार करायला लावते. अमूर्त आणि थोडे अस्पष्ट असे वाटले, तरी ते मनाची पकड घेत ‘जे म्हटले ते योग्य आहे’, हे स्वीकारायला भाग पाडते. अशा प्रकारच्या रचनांना उलटबांसिया, म्हणजेच ‘उलटीवाणी’ असे म्हणतात. येथे सर्वसामान्य अनुभवाच्या पूर्ण विरोधी आणि विचित्र असे सूत्र मांडले असूनही त्यातील गहन सत्यापायी ते पूर्ण स्वीकारावे लागते.

४. उलटबांसियांचा प्रभाव

उलटबांिसया हे संत कबीर यांच्या रचनांचे एक विशेष वैशिष्ट्य आहे. गेल्या ५० वर्षांत संत कबीर यांच्या रचनांकडे ‘एक मोठा ठेवा’, असे पहात देशविदेशात संशोधन झालेले आहे. गेली अनेक शतके या उलटबांसिया सामान्यांना नित्य जीवनातून आध्यात्मिक जीवनाकडे जाण्यासाठी आणि साधकांना साधनेसाठी प्रेरणा देत आहेत. संत रचित वचने असल्यामुळे त्यात आध्यात्मिक सामर्थ्य आहेच.

५. उलटबांसियांचा शास्त्रीय अभ्यास

अलीकडील काळात त्यांचा भाषाशास्त्र, मानसशास्त्र आदींच्या आधारे अभ्यास केला जात आहे. मानसशास्त्र आणि भाषाविज्ञान यांच्या दृष्टीने इत्यादी प्रकारे या उलटबांसियांचा वेध घेतला असता त्या परिणामकारक का ठरतात, याचे काही बुद्धीगम्य उत्तर आपल्याला मिळते. यातून साधकांना साधनेच्या दृष्टीने या उलटबांसियांचा लाभ घेणे अधिक सहज बनेल. त्यासाठी आपण मुख्यत्वे त्या वाचतांना होणारा तत्कालीन परिणाम आणि त्यांचे वारंवार आवर्तन करण्याचे परिणाम पाहू.

६. उलटबांसिया वाचतांना होणारी प्रक्रिया

उलटबांसिया वाचतांना जिज्ञासूचे मन पुढील अवस्थांमधून जाते.

६ अ. धक्का आणि अस्वस्थता : या वचनांचा शब्दार्थ कसा धक्कादायक असतो, त्याची उदाहरणे आपण पाहिली. मानवी मेंदू हा नेहमी ‘पॅटर्न’ (प्रथा किंवा नियम) शोधत असतो. जेव्हा संत कबीर म्हणतात, ‘आधी मुलाचा जन्म झाला आणि नंतर आई जन्माला आली !’, तेव्हा मेंदूच्या स्थापित समजूतीला धक्का बसतो. संघर्ष निर्माण होतो. ‘हे असे कसे असू शकते ?’, हे समजल्याविना मन स्वस्थ होत नाही.

६ आ. शोधप्रक्रियेतून तर्कापलीकडील उत्तर : मग मन उत्तर शोधायला उत्सुक होऊन उर्वरित विचार क्षणभर आपोआप थांबतात आणि ते एकाग्र बनते. मनातील संघर्ष माणसाला नेहमीच्या सामान्य विचारस्तरावरील स्थितीतून बाहेर काढतो आणि सजग करतो. मग जेव्हा उलटबांसियांचा गूढ अर्थ (उदा. सिंह – अहंकार, गाय – इंद्रिये) समजतो, तेव्हा तो नेहमीच्या तर्काला ओलांडून जिथे तर्क नसतो, तेथे नेऊन ठेवतो.

६ इ. नवी अंतर्दृष्टी : हे होतांना जुन्या विचारांची एक चौकट मोडली गेलेली असते. मन पूर्णपणे रिकामे बनते. मेंदू अमूर्त पातळीवर जाऊन प्रतिकांचा अर्थ लावतो. हे होतांना उजव्या मेंदूमध्ये चेतापेशींची तीव्र हालचाल होते. या क्षणी मेंदूमध्ये ‘डोपामाइन’ या रसायनाची निर्मिती होते, ज्यामुळे साधकाला एक वेगळाच बौद्धिक आणि आध्यात्मिक आनंद मिळतो. ही ‘अंतर्दृष्टी’.

थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचे, तर संत कबीर यांची ‘उलटबांसी’ हे मनाला ‘रिबूट (मेंदूरूपी संगणक बंद करून परत चालू करणे)’ करण्याचे एक शक्तीशाली साधन आहे. संत कबीर यांच्या प्रबोधनातील मूळ उद्देशच हा आहे की, माणसाने यंत्रवत् आयुष्य जगणे थांबवून क्षणभर तरी पूर्णपणे सजग व्हावे.

७. उलटबांसियांचे वारंवार आवर्तन करण्याचे परिणाम

संत कबीर यांची भजने अनेक जण गात असतात आणि अनेक शतके गात आलेले आहेत. विविध प्रकारच्या संप्रदायांमध्येही ही भजने गायली जात आहेत. थोडक्यात या माध्यमांतून उलयबांसियांचे आवर्तन येनकेनप्रकारेण अनेक शतके होत आले आहे. असे होण्यात उलटबांसियांचे स्वत:चेच योगदान कसे, हे पाहूया.

८. वारंवार आवर्तनातील सुलभता

एखादे सत्य सरळ मांडले जाणे, त्यापेक्षा ते ‘उलटबांसिया’ पद्धतीने मांडलेले असल्यास त्याचे मनात वारंवार आवर्तन होण्याची प्रक्रिया अतिशय सहज, नैसर्गिक आणि दीर्घकालीन होते. असे का, ते पाहू.

८ अ. सरळ वाक्याचे आवर्तन होण्यातील समस्या : ज्या गोष्टी सरळ, स्पष्ट आणि आधीच ठाऊक आहेत, त्याकडे मेंदू दुर्लक्ष करतो. याला मानसशास्त्रात ‘सवय’ म्हणतात. सरळ विचारामध्ये कोणतेही रहस्य नसते, त्यामुळे मनाला त्यात रस वाटत नाही. उदाहरणार्थ जर सरळ सांगितले, ‘अहंकार सोडून इंद्रियांवर ताबा मिळवा’, तर मन नकळत म्हणते, ‘हे मला ठाऊक आहे’ आणि तो विचार तिथेच थांबतो. तरीही तो विचार पुन्हा करायचे असल्यास प्रयत्न करावे लागतात.

८ आ. कुतूहल जागृतीमुळे आवर्तन सुलभता : जेव्हा उलटबांसिया सांगते, ‘सिंह गायीला चरवत आहे’, तेव्हा मेंदू कोलाहलात पडतो. मानवी मेंदूला अपूर्ण किंवा न सुटलेली कोडी अर्धवट सोडणे आवडत नाही. उलटबांसिया माणसाच्या उपजत कुतूहलाला जागृत करते. अर्थ लागेपर्यंत मेंदूत जाणीव न होता तो विचार सतत फिरत रहातो.

८ इ. आनंदप्राप्तीमुळे आवर्तन सुलभता : या ना त्या कारणाने जेव्हा त्या उलटबांसियांचा आध्यात्मिक अर्थ अचानक उलगडतो, तेव्हा होणार्‍या आनंदाची पुरावृत्ती करण्यासाठी मेंदू त्या उलटबांसिचे आणि त्यातून मिळालेल्या सत्याचे पुन्हा पुन्हा आवर्तन करण्याला प्रवृत्त होतो. मग ते सूत्र आपोआप कुठेतरी खोलवर रुजणे चालू होते. थोडक्यात ‘सरळ विचार हा मेंदूसाठी ‘सिद्ध अन्ना’सारखे (‘इन्स्टंट फूड’सारखे) आहे, म्हणजे मेंदू खातो आणि विसरून जातो; परंतु उलटबांसिया ही ‘धान्या’सारखी आहे, ज्याचा अर्थ शोधण्यासाठी आणि अधिक आकलन होण्यासाठी मेंदूला ते वारंवार दळावे लागते (चिंतन करावे लागते).

८ ई. व्यावहारिक जीवनातील सहज स्मरणामुळे आवर्तन सुलभता : उलटबांसियामध्ये वापरण्यात आलेले सिंह, गाय यांसारखे सामान्य प्रतीक जेव्हा जेव्हा साधक प्रत्यक्ष आयुष्यात पाहील, तेव्हा त्याला संत कबीर यांची उलटबांसिया आणि त्यामागचे सत्य आपोआप (सहजतेने) आठवेल, म्हणजेच बाह्य जगच त्या विचाराच्या आवर्तनासाठी ‘ट्रिगर’चे (प्रेरणेचे) काम करते. सरळ विचारांविषयी असे होत नाही. याचे कारण सरळ विचार हा बाहेरून आत दिलेला उपदेश आहे. त्याचे शब्द अमूर्तता सांगत असतात. अमूर्तता थेट शब्दांतून ग्रहण करणे कठीण असते. तो विचार सामान्य माहिती म्हणून साठवला जातो, तसेच उलटबांसिया हे स्थूल प्रतीकाच्या आधारे जिज्ञासूने स्वतः शोधून काढलेले सत्य असल्याने ते मेंदूला स्वतःचे वाटते. चेताशास्त्रानुसार अशा प्रक्रियेतून निर्माण झालेले चेतापेशींचे परस्परांशी संबंध मजबूत असतात.

९. आध्यात्मिक लाभ

इंद्रीयगोचर नसलेल्या, सामान्य मन-बुद्धी यांच्या अवाक्यातही कधी येऊ न शकणार्‍या पारमार्थिक सत्यापर्यंत पोचणे, ही साधनेची दिशा असते. हे सत्य अतर्क्य, अमूर्त असते. उलटबांसिया या प्रक्रियेत साहाय्यक ठरतात. कसे ते पाहूया.

९ अ. अमूर्ताच्या आकलन क्षमतेचा विकास : आपल्या मेंदूला एकाच पद्धतीचे विचार करण्याची सवय असते, ज्याला आपण ‘रूटीन थिंकिंग (सामान्य चिंतन)’ म्हणतो. जेव्हा आपण एखाद्या अमूर्त संकल्पनेवर (उदा. आत्मा, माया, चित्त) सामान्य भाषेत विचार करतो, तेव्हा मेंदू जुनेच रस्ते वापरतो किंवा जुन्या समजूतींच्या मार्गाने जातो. मग अमूर्त संकल्पना फारशी आकलन होत नाही. याउलट उलटबांसियाचे विरोधाभासी कोडे (उदा. ‘आधी मुलाचा जन्म झाला आणि नंतर आई जन्माला आली !’) मेंदूला जुन्या रस्त्यांवरून जाऊच देत नाही. मग साधकाने त्या वाक्यांचे भावार्थ समजून घेत चिंतन केल्यास मेंदूमध्ये संपूर्णपणे नवीन रस्ते सिद्ध होतात. त्यामुळे अमूर्त गोष्टी समजण्याची मेंदूची क्षमता कायमची पालटून जाते.

९ आ. जुनाट बोधबंधनांतून मुक्ती : मानवी मन हे संस्कारांनी बद्ध असते. यामुळे वेगळ्या विशेष करून आपल्याला अमूर्त गोष्टी अनुभवण्यात अडचण येते. उलटबांसिया वैचारिक चौकटी मोडते आणि तर्काचा पराभव करते. साधकाचा जगाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटत जातो. तो जुन्या संकुचित मानसिकतेत जाणे न्यून होत जाते. त्याचे परिवर्तन जाणीवेच्या पलीकडील दीर्घकालीन स्मृतीमध्ये होऊन नंतर प्रज्ञेत होते. त्यामुळे उलटबांसियातून मिळालेले ज्ञान तो विसरत नाही.

१०. अन्य संतांच्या उलटबांसिया

पारमार्थिक सत्य सांगण्यासाठी उलट्या वाणीचा उपयोग ही पुष्कळ जुनी परंपरा आहे. उदाहरणार्थ गीतेमध्येही ‘(संसार म्हणजे) वर मुळे खाली शाखा असलेला अश्वत्थ वृक्ष’, असे म्हटले आहे. उलटवाणीचा उपयोग जवळपास प्रत्येक थोर संतांच्या रचनेत आहे. त्यांची अगदी मोजकी उदाहरणे देत आहे.

१० अ. संत ज्ञानेश्वर : काट्याच्या अणीवर वसले तीन गांव । दोन ओसाड एक वसेचिना ॥

१० आ. संत एकनाथ : सासरा माझा गावी गेला । तेथेच खपवी त्याला ॥

१० इ. संत भक्तराज : जेवायासी ताट बसायासी पाट । काय वर्णू थाट आज उपवास ।।

श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०२६)

संत कबीर यांच्या काव्यपंक्ती

१. मच्छ शिकारी रमे जंगल में, सिंह समुद्रही झूला । 

शब्दार्थ : मासा जंगलात फिरत आहे, (त्याच्या भीतीपायी) सिंह समुद्रात जाऊन बसला आहे.

भावार्थ : माया शिकारी बनून संसारवनात शिकार करत आहे. त्यामुळे जीव (सिंह) भ्रमरूपी समुद्रात जाऊन बसलेला आहे (कारण त्याला स्वरूपज्ञान नाही).

२. खसमहि छाडि ससुर संग गौनी, सो किन लेहु बिचारी ।

शब्दार्थ : एक स्त्री आपल्या पतीला सोडून सासर्‍यासमवेत पळून गेली.

भावार्थ : माया-मनोवृत्ती आत्मविचाराला (आत्मा म्हणजे पती) सोडून अहंकाररूपी सासर्‍यासह पळून जाते.

३. पानिं माहिं तलफी गई भूंभरी, धुरि हिलोरा देई । 

शब्दार्थ : पाण्यात तप्त वाळू तळमळत होती, त्यातून धुराची तरंगे येऊ लागली.

भावार्थ : शीतल तृप्त आत्म्याच्या सान्निध्यात असूनही मनोवृत्ती चिंताग्नीत सतत जळत रहाते आणि मग त्यातून विविध इच्छा-कल्पना यांच्या लहरी निघत रहातात.

४. एक अचंभा देखा रे भाई, ठाढ़ा सिंह चरावै गाई । 

शब्दार्थ : मी एक मोठा चमत्कार पाहिला, एक सिंह उभा राहून गायींना (शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे) चरायला नेत आहे.

भावार्थ : साधना जेव्हा गती पकडते, तेव्हा माणसाचा हिंस्र अहंकार नियंत्रणात येऊन तोच अहंकार आणि तीच ऊर्जा आता ज्ञानेंद्रियांना योग्य मार्गावर चालवण्यासाठी (चरावण्यासाठी) रक्षक बनते.

५. पहिले पूत पिछे भई माई । 

शब्दार्थ : आधी मुलाचा जन्म झाला आणि नंतर आई जन्माला आली !

भावार्थ : जोपर्यंत ज्ञान (मुलगा) जन्माला येत नाही, तोपर्यंत या सृष्टीला चालवणारी माया (आई) कोण आहे, हे समजतच नाही.

६.  बैल बियाय गाय भइ बंझा, बछरू दुहिये तिन तिन संज्ञा ।

शब्दार्थ : बैल व्याले, त्यांना बछडे झाले, गाय वांझ झाली. बछड्यांचे ३ वेळा दूध काढले जात आहे.

भावार्थ : (बैल) अविवेकाकडून षड्रिपूंचे (बछडे) प्रजनन होत आहे; परंतु सद्बुद्धी (गाय) वांझ बनली आहे. षडरिपूंनिर्मित सृष्टीचे रसपान सतत होत आहे.

७. कहहि कबीरा बुढिया आनन्द गाय, पूत, भतारहिं बैठी खाय । 

शब्दार्थ : कबीर म्हणतो, म्हातार्‍या आनंद गायीने सर्व मनुष्यांना खाऊन टाकले आहे.

भावार्थ : गाय म्हणजे माया.