प्रादेशिक अस्मिता किती ताणायची ?

‘गोव्याच्या मराठी पाठ्यपुस्तकांत गोमंतकीय मराठी लेखक नाहीत’, याची खंत गोव्यातील वर्तमानपत्रांना झाली, हे बरे वाटले; पण मराठी भाषा विषय म्हणून शिकतांना स्थानिक अस्मितेला किती रेटायचे, याचा विचार होणेही तितकेच आवश्यक आहे.

१. लेखक कोणते आणि किती, यांपेक्षा भाषेचे सर्व कंगोरे अभ्यासक्रमात येणे महत्त्वाचे !

भाषा हा विषय शिकवतांना आणि शिकतांना त्या भाषेतील साहित्याचे प्रवाह विद्यार्थ्याला समजतील, अशी रचना असणे अपेक्षित आहे. तिथे लेखक कुठला आहे आणि स्थानिक लेखकांना स्थान आहे कि नाही ?, हा प्रश्नच उद्भवत नाही. ‘गोव्यात मराठी साहित्यिक नाहीत किंवा त्यांच्यात लिहिण्याची क्षमता आणि वैविध्य नाही’, असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. गोव्याचे लेखक किती आणि गोव्याबाहेरील लेखक किती, याची गणिती आकडेमोड करण्यापेक्षा एक विषय म्हणून भाषेचे सर्व कंगोरे अभ्यासक्रमात येतात कि नाही ?, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.

२. गोमंतकीय अस्मितेशी जोडणे कितपत योग्य ?

श्री. प्रसन्न शिवराम बर्वे

मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे या लेखकांची निवड करतांना ४०-६० असे प्रमाण सहसा असते. ४० टक्के गोमंतकीय आणि ६० टक्के अन्य. मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे ही विभागणी आहे कि नाही ?, हा खरेतर महत्त्वाचा प्रश्न आहे; पण त्याला गोमंतकीय अस्मितेशी जोडून केलेली मांडणी अन् वार्तांकन अत्यंत हिणकस आहे. कुठल्या तरी गोमंतकीय साहित्यिकाचा समावेश न झाल्याने ‘जय महाराष्ट्रा’ची काडी पेटवून दिल्याची शक्यताही नाकारता येत नाही. मुळात गोव्यातील लोकांना पात्र असूनही नोकरी नाकारली जाते, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. तिथे ‘जय गोमंतक’ करणे अपेक्षित आहे. त्याऐवजी विषय म्हणून शिकवली जाणारी भाषा गोमंतकीय अस्मितेशी जोडणे कितपत योग्य आहे ?

३. भाषेच्या निमित्ताने खोटे कथानक (नॅरेटिव्ह) जोडण्याचा प्रयत्न

दुसरे महत्त्वाचे म्हणजे यातून ‘मराठी महाराष्ट्राची किंवा गोव्याबाहेरची’, हे चिन्हित करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना ? सध्या प्रादेशिक अस्मिता नको तितक्या ताणण्याचा ‘ट्रेंड’ (एक पद्धत) चालू आहे. त्या धर्तीवर ‘महाराष्ट्रधार्जिणे’, ‘महाराष्ट्रवादी’ किंवा त्याही पुढे जाऊन मराठीवादी, म्हणजे महाराष्ट्रवादी, ‘मागील दाराने गोवा महाराष्ट्रात ढकलू पहाणारे’, वगैरे विमर्ष (नॅरेटिव्ह) पुढे सरकवले जाऊ शकतात. ज्याप्रमाणे महाराष्ट्र्रामध्ये सगळे संत, राष्ट्रपुरुष आणि अगदी देवही जातीत ढकलले जातात, तसेच मराठी भाषेला ब्राह्मण (नंतर बामण) जातीशी जोडण्याचा प्रयत्न नुकताच झाला. त्याचीच पुढची पायरी म्हणजे मराठीला महाराष्ट्र्राशी जोडून गोव्यापासून तोडण्याचा हा प्रयत्न आहे. ‘गोंयान रावचे आसा जाल्यार कोकणी उलवचे पडटलें’ (गोव्यात रहायचे असेल, तर कोकणी बोलावे लागेल), हे वाक्यही महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात ऐकू येणे फार दूर नाही.

सनसनाटी विरुद्ध वस्तूस्थिती आणि भाषेचा बळी !

‘बातमी देतांना त्यात हेतू घुसडू नये’, हा संकेत आहे; पण तसे होत नाही. बातमीत सत्यतेपेक्षा ती अधिकाधिक पाहिली जावी, याकडे लक्ष देण्याकडे वृत्तपत्रांचा कल वाढला आहे. त्यामुळे मथळा इतका सनसनाटी केला जातो की, त्यात सत्य हरवते; पण या सगळ्याचा परिणाम काय होतो, याचा विचार कुणीही करत नाही. खप वाढला, इंटरनेटवर बातमी (केवळ मथळा आणि पहिला परिच्छेद फार तर वाचला जातो) किती वेळा पाहिली गेली ?, याचे विज्ञापने मिळवण्याच्या दृष्टीकोनातून हिशोब मांडले जातात. ‘अल्प संख्येने वाचले जाते’, यामुळे संपादकीय अग्रलेखच काढले जातात.

१. चुकीचा ‘नॅरेटिव्ह’ पेरण्याचा प्रयत्न होत नाही ना ?

सनसनाटी निर्माण करण्याच्या नादात पाठ्यपुस्तकांत किती टक्केवारी गोमंतकियांची आहे आणि किती अन्य लेखकांची आहे ?, याची व्यवस्थित पडताळणी झाली नाही. ज्या ज्या साहित्यिकांनी प्रतिक्रिया दिल्या, त्यांनी तरी याची पडताळणी करण्याचे कष्ट घेतले का ? प्रत्येक ठिकाणी अस्मिता जोडून शिक्षण होणार नाही. गोव्यातील वैज्ञानिक, इंग्रजी साहित्यिक नाही, तर पाठ्यपुस्तक चुकीचे ठरवू लागलो, तर विषयच बंद करावे लागतील. या सनसनाटीपायी वृथा गैरसमज आणि चुकीचा ‘नॅरेटिव्ह’ पेरण्याचा प्रयत्न होत आहे का ?

२. मराठी आणि कोकणी पाठ्यपुस्तकांत दर्जेदार साहित्य आहे कि नाही ?, हे पडताळणे महत्त्वाचे !

मुळात लेखक कुठले, हे सूत्रच असू शकत नाही. जे साहित्य घेतले आहे, ते दर्जेदार आहे कि नाही ? त्यातून भाषा या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना काही सकस अन् पोषक वाचायला आणि अभ्यासायला मिळते कि नाही ?, हे योग्य सूत्र आहे. मराठी आणि कोकणी दोन्ही भाषांसाठी केवळ हाच निकष ठेवून विचार होणे आवश्यक आहे. टोकाच्या अस्मिता पेटवून आणि त्यांची चूड (फसवणे) नको तिथे लावून केवळ रस्त्यावर उतरून तोडफोड करणारे धटिंगण निर्माण होतील. आम्हाला पुढच्या पिढीच्या हाती लेखणी द्यायची आहे कि दगड ?, याचे चिंतन व्हावे हीच इच्छा आहे.

या निमित्ताने विषय निघालाच आहे, तर मराठी आणि कोकणी पाठ्यपुस्तकांत दर्जेदार साहित्य आहे कि नाही ?, याचाही धांडोळा घेतला जावा. पुरस्कारासाठी होते तसे ‘लॉबिंग’ (प्रभाव टाकणे) पाठ्यपुस्तकात धडा आणि कविता घ्यावी, यासाठी होते का ? याचीही पडताळणी व्हावी.
– श्री. प्रसन्न बर्वे

४. प्रादेशिक अस्मितेच्या शृंखलांमध्ये भाषेला जखडून ठेवायचे का ?

टोकाची अस्मिता असणे, हे अस्मिता नसण्यापेक्षा अधिक घातक असते. कुठलीही गोेष्ट स्वत:त परिपूर्ण नसते आणि ती जोडली जाते, तेव्हा समृद्ध होत जाते. त्यासाठी अधिकार असण्याऐवजी पूरक असणे महत्त्वाचे आहे. आज जिथे कुठल्याही लेखकाचे जगात कुठेही वाचले जाण्याची सोय उपलब्ध असतांना प्रादेशिक अस्मितेच्या शृंखलांमध्ये भाषेला किती जखडून ठेवायचे, याचा तारतम्याने विचार करणे योग्य ठरेल.

– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा. (२७.६.२०२६)