समान नागरी कायदा अस्तित्वात येणे, ही काळाची आवश्यकता ! – मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी

पुणे येथे ‘हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन देवदर्शन पदयात्रे’चे आयोजन !

श्री. मिलिंद एकबोटे

पुणे, ३० जून (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला; म्हणूनच आज आपण या देशात स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन साजरा करू शकत आहोत. अन्यथा हिंदूंचे अस्तित्वच धोक्यात आले असते. आज भारतात हिंदूंची घटती लोकसंख्या आणि अन्य धर्मियांची वेगाने वाढणारी लोकसंख्या, हे भीषण वास्तव आहे. या संकटावर एकमेव उपाय म्हणजे देशात तातडीने ‘समान नागरी कायदा’ लागू करणे. यासाठी समस्त हिंदु समाजाने एकमुखाने सरकारकडे मागणी लावून धरली पाहिजे, असे आवाहन ‘समस्त हिंदु आघाडी’चे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांनी केले आहे. शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधून येथे ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हडपसर’च्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन देवदर्शन पदयात्रा’ २७ जून या दिवशी उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात काढण्यात आली. माळवाडी येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहापासून प्रारंभ झालेल्या या पदयात्रेची सांगता ससाणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी झाली. पदयात्रेत हडपसर विभागातील अनेक धारकरी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाला ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे जिल्हा संयोजक सर्वश्री सचिन घुले, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शशांक सोनवणे, रवींद्र घुले, कु. गौरीश रोडगे यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे स्थानिक पदाधिकारी आणि धारकरी उपस्थित होते.

प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक सोहळा पहात असल्याची धारकर्‍यांना अनुभूती !

पदयात्रेच्या सांगताप्रसंगी प्रमुख वक्ते श्री. ऋत्विक कुलकर्णी म्हणाले, छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक, त्यातील धार्मिक विधी यांचा उल्लेख विविध बखरींमध्ये आढळतो. हिंदवी स्वराज्याचे सार्वभौमत्व आणि हिंदु अस्मितेचे रक्षण यांसाठी राज्याभिषेक किती अनिवार्य होता, हे आपण समजून घेतले पाहिजे.

श्री. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामुळे सर्व धारकरी एवढे एकाग्र झाले होते की, ‘आपण प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवत आहोत’, असेच सर्वांना जाणवले.