कल्याण येथे नालेसफाईसाठी बालकामगाराचा वापर; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंद

ठाणे – कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात नालेसफाईच्या कामासाठी बालकामगाराचा वापर केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ठेकेदाराविरुद्ध कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची गंभीर नोंद घेत संबंधित ठेकेदारावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर कल्याण येथील साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारी कस्तुरी राजेश महात्मे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता, तसेच बाल आणि किशोर कामगार (प्रतिबंध आणि नियमन) कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (अल्पवयीन मुलांना शिक्षण घेण्याच्या वयात काम कारायला लावणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)

मे. सेक्युअर वन सिक्युरिटी सर्व्हिसेसचे ठेकेदार वैभव मोरे यांनी दुर्गामाता मंदिर परिसरातील नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलाकडून काम करून घेतल्याचे चित्रीकरण सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले होते.