सातारा येथे व्यावसायिक लाभासाठी महामार्गावरील रस्ते दुभाजक फोडले

‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’चे दुर्लक्ष !

सातारा – पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव परिसरात काही व्यावसायिकांनी व्यावसायिक लाभासाठी महामार्गावरील दुभाजक जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृतपणे फोडले. २२ जूनच्या मध्यरात्री हा प्रकार स्थानिकांनी पाहिला; मात्र या प्रकाराकडे ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)

१. महामार्गावरील दुभाजक हे वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी उभारले जातात. दुभाजक फोडणे हा गुन्‍हा आहे; मात्र काही व्यावसायिक आपल्या आस्थापनांमध्ये थेट प्रवेश मिळावा, यासाठी दुभाजक फोडून अनधिकृत रस्ते बनवत आहेत.

२. दुभाजक तोडण्याचे काम चालू असतांनाही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. अशा प्रकारे करण्यात आलेले अनधिकृत रस्ते भविष्यात गंभीर अपघातांना आमंत्रण देऊ शकतात. महामार्गावर अनेक ठिकाणी यापूर्वीही अशाच पद्धतीने दुभाजक फोडून रस्ते निर्माण करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत.

संपादकीय भूमिका

असा निष्काळजीपणा करणार्‍या प्राधिकरणातील संबंधित अधिकार्‍यांना बडतर्फच करायला हवे !