आधी मन शुद्ध करावे !

‘एकदा समर्थ रामदासस्वामी भिक्षा मागण्यासाठी एका घरासमोर उभे राहिले. त्यांनी दार वाजवून ‘जय जय रघुवीर समर्थ ।’, असे म्हटले. घराचे दार उघडून एक स्त्री बाहेर आली. तिने त्यांच्या झोळीत भिक्षा घातली. या वेळी त्यांच्यात पुढील संवाद झाला.

समर्थ रामदासस्वामी

स्त्री : महाराज, काही उपदेश द्या.

समर्थ : आज नाही. उद्या देतो.

दुसर्‍या दिवशी समर्थांनी पुन्हा तिच्या घरासमोर उभे राहून ‘जय जय रघुवीर समर्थ ।’ म्हटले. त्या दिवशी महिलेने बदाम-पिस्ता घालून खीर बनवली होती. ती खिरीचे वाडगे घेऊन बाहेर आली. समर्थांनी कमंडलू पुढे केल्यावर त्यात खीर ओतणार, इतक्यात तिला त्यात शेण आणि कचरा दिसला. ते पाहून ती म्हणाली,

स्त्री : महाराज, हा कमंडलू तर खराब आहे.

समर्थ : खराब तर आहे; पण तू त्यातच खीर घाल.

स्त्री : नाही महाराज. मग खीर खराब होईल. तुमचा कमंडलू द्या. तो मी धुऊन स्वच्छ करून देते.

समर्थ : म्हणजे हा कमंडलू स्वच्छ झाल्यावरच तू त्यात खीर घालणार ना ?

स्त्री : हो महाराज.

समर्थ : माझाही हाच उपदेश आहे. जोपर्यंत मनात चिंतेचा कचरा आणि वाईट संस्कारांचे शेण असेल, तोपर्यंत उपदेशामृताचा काही लाभ होणार नाही. जर उपदेशामृत मिळवायचे असेल, तर आधी मन शुद्ध करावे लागेल. वाईट संस्कारांचा त्याग करावा लागेल. तेव्हाच खरे सुख आणि आनंद यांची प्राप्ती होऊन तो अनुभवता येईल.’

– श्री. सुदर्शन देसाई, अकलूज