हित-अहिताचे ज्ञान : निरोगी मनाची गुरुकिल्ली !

दिनचर्या पाळून जीवनशैली सुधारा आणि मनाला स्थिरत्वाकडे नेऊन आनंदी जीवन जगा !

१. मनाची अस्वस्थ स्थिती

‘सगळे चांगले असूनसुद्धा कधी कधी अकारण उदास वाटू लागते. आयुष्यातील एखाद्या वळणावर आपल्या आयुष्याचा आढावा घेतांना काय मिळाले ? आणि काय निसटले ? याची बेरीज-वजाबाकी यांचा मेळ राखता येत नाही. काही जुन्या आठवणी, प्रिय व्यक्तीचा विरह, पेललेली आणि सोसलेली आजारपणे या गोष्टी साकळतात.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

सकाळी उठून एखादी गोष्ट आपण का करत आहोत ? त्यातून काय मिळणार आहे ?, याचा विचार करता करता मन थकून उदास होऊन आपण आतल्या आत कुढत गप्प होऊन जातो. कंदिलाच्या काचेवर धरलेली काजळी जसे आत पेटलेल्या ज्योतीचे तेज बाहेर पोचवू शकत नाही, तसेच काहीसे आपल्या मनाचे होते. आपल्या मनातील ऊर्जेचा खळखळता प्रवाह जणू काही बांध बसल्याप्रमाणे अडतो. रजोनिवृत्तीच्या आसपास आणि नंतर बर्‍याच स्त्रियांमध्ये अशा पद्धतीची लक्षणे बघायला मिळतात.

२. इतरांनी आपल्याला सावरण्यापेक्षा आपणच काळजी घेणे महत्त्वाचे !

अशा प्रत्येक वेळी मनाचे हिंदोळे तुमच्या प्रेमाच्या माणसांपर्यंत पोचतातच, असे नाही. जेव्हा तुम्हालाच तुमच्या मनावर ही कसली काजळी धरली आहे, हे समजत नसते, तेव्हा तुमची जवळची माणसे तरी किती आणि काय सावरणार तुम्हाला ? ‘प्रत्येक वेळी आपल्याला इतरांनी सावरले पाहिजे’, ही अपेक्षा थोडी बाजूला ठेवून स्वतःची काळजी ही आपणच घेण्यास जितक्या लवकर शिकू, तेवढे ते आपण आणि कुटुंबीय यांच्या दृष्टीनेही सुलभ अन् आनंददायी असते.

३. हितकर गोष्टी करा आणि अहित सेवनापासून दूर रहा, हे सांगणारा श्लोक

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

मनावर काम करणार्‍या उपायांचे आयुर्वेदात सुंदर वर्णन करण्यात आले आहे,

‘धीधैर्यात्मादिविज्ञानं मनोदोषौषधं परम् ।।’ (संदर्भ : अष्टांगहृदयम्)

‘धीः’ म्हणजेच हित काय आणि अहित काय, याचे ज्ञान ! ‘धैर्य’ म्हणजेच चांगल्या किंवा वाईट परिस्थितीमध्ये मनाची असलेली स्थिरता आणि ‘आत्म विज्ञान’ म्हणजेच या वेळी माझ्यासाठी जे हितकर आहे, ते करत रहाणे अन् अहित सेवनापासून दूर रहाणे.

४. हितकारक सवयी लावून घ्या !

मला सकाळी उठायला आवडत नसले, तरी ते माझ्या प्रकृतीसाठी हितकर आहे; म्हणून मी उठेन. इतक्या छोट्या गोष्टींपासून प्रारंभ करता येतो. नैसर्गिक चक्राप्रमाणे शरिरात क्रिया घडतात. त्यानुसार काही वेळा आपल्या मनाला दटावून त्याचे न ऐकता दूरगामी चांगले परिणाम देणार्‍या हितकारक सवयी लावून घ्यायला हव्यात.

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

५. शरीर आणि मन यांचा एकमेकांशी असलेला संबंध

एक गोष्ट लक्षात घ्या, ‘शरीर आणि मन यांचा परस्परावलंबी संबंध आहे. शरिरात झालेला वातप्रकोप तुमच्या मनाच्या ठिकाणी चंचलता आणि ‘मूड स्विंग्ज’ (वागण्यात अचानक पालट होणे) सारखी लक्षणे दाखवतो. शरिरातील पित्ताचा त्रास हृदयाच्या ठिकाणी असलेल्या पित्ताला बिघडवून त्याचे मनाच्या ठिकाणी असलेले काम खराब करतो. अतीविचार करणे, हे पचन बिघडवते. पचन बिघडले की, मन थकते इत्यादी.

६. मनाची काजळी दूर करण्यासाठी हितकर शारीरिक सवयी लावून घेणे महत्त्वाचे !

ज्याप्रमाणे ज्योत मोठी आणि तेजस्वी करण्यासाठी आपण वात चिमटीत धरून त्यावरील काजळी काढतो. कंदिलाची काच घासून स्वच्छ करतो, त्याप्रमाणे थोडे स्व-समुपदेशन करून काही शारीरिक सवयी पालटून मनाची काजळी दूर करणे आवश्यक असते. अशा वेळी तुमच्या प्रकृतीला हितकर शारीरिक सवयी तुम्ही लावून घेतल्या, तर त्यांचा नक्कीच लाभ दिसतो. यामध्ये मूळ दिनचर्या पाळणे, अभ्यंग करणे, ध्यान लावणे, नस्य करणे, वेळेवर झोपणे, उठणे, योग्य खाणे, व्यायाम करणे या गोष्टींचा अंतर्भाव होतो. अशाने मन स्थिर व्हायला साहाय्य होते आणि जवळील व्यक्तींचा साहाय्याचा हात तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीत स्वीकारू शकता, हे नक्की !’

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.