ज्येष्ठ मासातील महत्त्वाची व्रते !

‘शास्त्र’ सदर : प्राचीन शास्त्र, सोप्या भाषेत

१. निर्जला एकादशी (२५.६.२०२६)

‘प्रत्येक मासातील दोन (शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील) एकादशींच्या दिवशी उपवास करणे अत्यंत महत्त्वाचे असते (त्याविषयीची सविस्तर माहिती आपण लवकरच जाणून घेणार आहोत.); मात्र त्यातही ज्येष्ठ शुक्ल एकादशी विशेष महत्त्वाची आहे. या एकादशीला ‘निर्जला एकादशी’, असेही म्हणतात. या एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवसभर, म्हणजे सकाळी उठल्यापासून दुसर्‍या दिवसाच्या सूर्याेदयापर्यंत पाणी न पिता उपवास केल्यास १२ एकादशींच्या उपवासाचे पुण्य लाभते.

२. वटपौर्णिमा (२९.६.२०२६)

सौभाग्यवती स्त्रिया वटसावित्रीचे व्रत सहसा एका दिवसाचे करतात; मात्र व्रताविषयीच्या मूळ ग्रंथांमध्ये हे व्रत ३ दिवसांचे सांगितले आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी पुढीलप्रमाणे व्रत करण्याचा प्रयत्न करावा.

अ. त्रयोदशी (२७.६.२०२६) : या दिवशी दिवसभर उपवास करून केवळ रात्री भोजन करावे.

श्री. अमर जोशी

आ. चतुर्दशी (२८.६.२०२६) : या दिवशी ‘अयाचित’, म्हणजे कुणी स्वतःहून आणून दिले, तर ते भोजन करावे.

इ. पौर्णिमा (२९.६.२०२६) : या दिवशी अभ्यंगस्नान करावे. पूर्ण दिवस उपवास करावा. प्रातःकाळी वटवृक्षाचे आणि ब्रह्मा-सावित्री या देवतांचे पूजन करावे. शक्य असल्यास दुपारी आपल्या कुलाचाराप्रमाणे दंपती-भोजन घालावे, म्हणजे दांपत्यास (पती-पत्नी यांस) भोजन द्यावे. ते शक्य नसल्यास भोजनाएवढी रक्कम दांपत्यास दान करावी.

ज्यांना वटवृक्षाकडे जाणे शक्य नाही, त्यांनी आपल्या देवघरातच पाटावर अष्टगंधाने वटवृक्षाची आकृती रेखाटून त्याची पूजा करावी. सौभाग्यवतींना मासिक पाळीची अडचण असल्यास पुरोहितांकरवी वटपूजन करून घ्यावे. उपवास मात्र स्वतः करावा.’

(साभार : ‘धर्मसिंधु’ आणि ‘पूजासमुच्चय’ या ग्रंथांमधून)

‘वरील लिखाण आमच्या अल्पमतीनुसार आहे. यामध्ये विद्वानांना काही पालट सुचवायचे असल्यास अथवा अधिक माहिती उपलब्ध करून द्यायची असल्यास सनातन वेदपाठशाळेच्या ८१८०९६८६६० या क्रमांकावर संपर्क करावा’, ही नम्र विनंती !’ 

 – श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा (२१.५.२०२६)