संपादकीय : ‘जय’शंकर !

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी त्यांच्या युरोप दौर्‍याच्या वेळी धुरंधरपणे प्रत्युत्तर देणे म्हणजे काय असते ? हे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना दाखवून दिले आहे. ‘काही देश युरोपकडून शस्त्रे विकत घेतात आणि भारतावर आक्रमण करतात. भारताकडून कधी असे झाले आहे का ? याविषयी तुमचे काय म्हणणे आहे ? हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का ?’, असे प्रत्युत्तर पत्रकाराला देऊन त्याचे आणि इतरांचे तोंड बंद केले. फिनलँड येथे परिषदेत एक पत्रकार एस्. जयशंकर यांना खोदून खोदून प्रश्न विचारत होता, ‘तुम्ही रशियाच्या समवेत सहानुभूती बाळगता, हे आम्हा युरोपियन लोकांना दु:खद वाटते. नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. तेल खरेदी करता, ते योग्य आहे का ?’ ‘भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे’, या सूत्रावर वारंवार प्रश्न विचारले जातात आणि भारताच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केला जातो. यामुळे साहजिकच भारताची अपकीर्ती होते. असे असले, तरी प्रश्न विचारणार्‍यांचे देश कोणती नैतिकता जपतात ? हासुद्धा प्रश्न आहे. याच विषयावर मागील वेळीही विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले होते, ‘मी जर युरोपकडून रशियन तेल खरेदीचे आकडे पाहिले, तर युरोप जेवढे तेल एका दुपारमध्ये खरेदी करतो, तेवढे भारत एका महिन्यातही खरेदी करत नाही. माझ्या देशाचे उत्पन्न मर्यादित आहे आणि मला माझ्या देशातील नागरिकांना स्वस्त दरात इंधन देणे, हे माझे कर्तव्य आहे’, असे ठासून सांगितले. आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर पाश्चात्त्य देशांचा दुटप्पीपणा उघडा पाडणे असो किंवा भारताची बाजू ठामपणे मांडणे असो, डॉ. एस्. जयशंकर यांच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास आणि मुत्सद्दीपणा दिसून येतो.

भारताची आक्रमक नीती

काँग्रेस सरकारच्या काळापर्यंत भारतावर अनेक देशांचा ज्यामध्ये अमेरिका, युरोप खंडातील देश, रशिया, चीन इत्यादी अलिखित, लिखित दबाव होता. या देशांनी त्यातही महासत्ता अमेरिका अन् बलाढ्य देश ज्यामध्ये फ्रान्स, इटली, जर्मनी यांच्या सोयीनुसार वागण्याचा सुप्त दबाव भारतावर असे. त्यामुळे पाकने भारतावर कितीही आतंकवादी आक्रमणे केली, तरी भारतीय शासनकर्त्यांना अमेरिकेने एकदा ‘नाही’ सांगितले, तर त्यानुसार निमूटपणे भारत प्रतिआक्रमण करत नसे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आले आणि काळ पालटला. भारत कुणाच्याही दबावाला वा आंतरराष्ट्रीय दबावाला भीक न घालता पाकविरोधात धडक कृती करू लागला. कॅनडा, चीन यांसह जगभरातील बलाढ्य देशांनाच चोख राजनैतिक प्रत्युत्तर देऊ लागला. परराष्ट्र विभागात कार्यरत असलेले आणि पुष्कळ अनुभव असलेले परराष्ट्र सचिव डॉ. एस्. जयशंकर हे परराष्ट्रमंत्री बनले. त्यांचा या विभागात असलेला दांडगा अनुभव आणि कमालीचे संवादकौशल्य यांच्या उपयोगाने परराष्ट्र विभाग अतिशय भक्कम स्थितीत आला. एरव्ही ‘परराष्ट्र विभाग काय काम करतो ?’, असा प्रश्न भारतियांना पडत असे. आखाती देशात फाशीची शिक्षा झालेल्या ८ भारतियांची शिक्षा रहित करून त्यांना पुन्हा सन्मानाने भारतात आणण्याचा विषय असो, कॅनडासारख्या भारताशी पूर्वग्रह ठेवून वागणार्‍या देशाला दमात घेऊन त्यांच्या राजनैतिक अधिकार्‍यांची देशातून हकालपट्टी करण्याचा विषय असो, एकाच वेळी जगातील अमेरिका आणि रशिया, इराण, तालिबानशासित अफगाणिस्तान, आखाती देश यांच्याशी सलोख्याचे अन् व्यापारी संबंध ठेवण्याचा विषय असो. भारताच्या परराष्ट्र विभागाने बुद्धी आणि धोरण कौशल्याची चुणूक दाखवली आहे. २ देशांमधील युद्धाच्या स्थितीतही भारताने त्यांच्याशी राजनैतिक आणि व्यापारी संबंध तसेच ठेवून जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.

धार्मिकतेशी घट्ट मुळे

या सर्व पालटाच्या केंद्रस्थानी आहेत डॉ. एस्. जयशंकर ! त्यांनी स्वत:च्या पुस्तकात आणि भारतातील अनेक व्यासपिठांवर हे मान्य केले आहे की, भारताची सध्याची परराष्ट्रनीती ही रामायण अन् महाभारत यांच्यावर आधारित आहे. मारुति आणि श्रीकृष्ण हे भारताच्या परराष्ट्रनीतीचे आदर्श आहेत. यानुसार एस्. जयशंकर यांनी अनेक जागतिक व्यासपिठावर भारताविषयी अनेक आक्षेप घणाघाती युक्तीवाद करून मोडून काढले आहेत. युरोपमध्ये २ वर्षांपूर्वी झालेल्या सार्वजनिक संवादाच्या कार्यक्रमात भारत कोणत्या बाजूला जाणार ? भारत कधी जागतिक राजकारणात उतरणार कि केवळ कुंपणावर बसून पहात बसणार का ? असे अनेक खोचक प्रश्न विचारले होते. तेव्हा जयशंकर यांनी सांगितले होते, ‘युरोप अजूनही जुन्या मानसिकतेत आहे. युरोपला त्याचे प्रश्न हे जगाचे प्रश्न वाटतात; मात्र प्रत्यक्षात जगाचे प्रश्न वेगळे आहेत. युरोपने त्याची मानसिकता पालटावी’, असे खडसावले. त्याचप्रमाणे त्यांनी पुढे असेही सांगितले, ‘भारताने या देशांसमवेत जावे, त्या देशांसमवेत जावे, याची आम्हाला काही आवश्यकता नाही. भारत जगातील मोठी लोकशाही आहे, आमच्यात क्षमता आहे. आम्ही आमची धोरणे, उद्दिष्टे स्वत: का ठरवू शकत नाही ?’ त्यांच्या या उत्तरांनी त्यांनी अनेक दशकांपासून चालत आलेल्या पाश्चात्त्य देशांच्या वर्चस्ववादी मानसिकतेवर थेट प्रहार करत भारताचे अस्तित्व अधोरेखित केले.

वर्ष २०२२ मध्ये वॉशिंग्टनमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात मंत्रीस्तरीय बैठक झाली. त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी भारतात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याविषयी अमेरिका लक्ष ठेवून असल्याचे विधान केले. यावर जयशंकर यांनी अमेरिकेच्याच भूमीवर दुसर्‍याच दिवशी सडेतोड उत्तर देतांना म्हटले, ‘लोकांना आमच्याविषयी मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे; पण त्यांच्या या मतांमागे कोणते हितसंबंध, कोणत्या ‘लॉबी’ आणि कोणती ‘व्होट बँक’ काम करत आहे, यावर मत मांडण्याचा आम्हालाही तितकाच अधिकार आहे. जेव्हा मानवाधिकारांवर चर्चा होईल, तेव्हा भारत मागे हटणार नाही. अमेरिकेतही मानवाधिकारांचे उल्लंघन होते आणि आम्ही हे सूत्र येथेही उपस्थित करतो.’ बलाढ्य अमेरिकेला त्याच्याच भूमीवर सुनावणारे जयशंकर हे बहुधा पहिलेच परराष्ट्रमंत्री आहेत. त्यामुळे भारताचे राजनैतिक सामर्थ्य आणि आक्रमक परराष्ट्रनीती जगाला पहाता आली. अमेरिकेतील भारतद्वेषी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्या भारतविरोधी मानसिकतेवर आणि विधानांवर त्यांनी कठोर प्रहार करत सोरोस यांची संस्था अन् त्यांचे देणगी देण्याचे कार्य यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून सोरोस यांची ‘लायकी’ दाखवून दिली. जयशंकर यांनी अमेरिकेला हे स्पष्ट करून दिले आहे, ‘भारत हा अमेरिकेचा ‘भागीदार’ आहे, त्यांचा ‘अनुयायी’ नाही. ते अमेरिकेशी मैत्रीचे संबंध ठेवतांना भारताच्या सार्वभौमत्वाला सर्वोच्च स्थान देतात.’ भारत अमेरिकेच्या दावणीला बांधलेला नाही, तसेच अमेरिकेला जुमानतही नाही, हे भारताने जेव्हा अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादले, तेव्हा युरोपशी सर्वांत मोठा व्यापार करार करून अमेरिकेला जोरदार धक्का देऊन दाखवून दिले. ही अमेरिकेच्या विरोधात एस्. जयशंकर यांची मोठी खेळी होती. एकूणच जगामध्ये भारताचा दबदबा वाढायला ‘जयशंकर’च कारणीभूत आहेत आणि त्याचा भारताला सार्थ अभिमान आहे, हे जगाने लक्षात घ्यावे !

भारताची आक्रमक परराष्ट्रनीती आणि धोरण, हे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या कामगिरीचेच फलित !