
भारताच्या राजकीय इतिहासात १० जून २०२६ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवायला हवा; कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १२ वर्षे म्हणजे एक तप ‘पंतप्रधान’पद सांभाळून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला. मोदींचा ४ सहस्र ३९९ दिवसांचा हा संघर्षमय; पण यशस्वी प्रवास भारताच्या पुनरुत्थानाचा प्रवास ठरला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवर अनेक महनीय व्यक्ती पंतप्रधान झाल्या; पण एकमेव नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या मनात दीर्घकाळ अधिराज्य गाजवले. मोदींची यशस्वी कारकीर्द पहाता देश-विदेशातून त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत. अनेकांनी त्यांचा सन्मान केला, तर अनेकांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सध्या भारत ‘मोदी’मय झाला आहे. भारताला ‘विकसनशीलते’कडून विकसितते’कडे, ‘आतंकवादाच्या सावटा’पासून ‘आतंकवादमुक्ती’कडे, ‘असुरक्षितते’कडून ‘युद्धसज्ज’ आणि ‘सुरक्षितता’ यांच्याकडे नेणारे एकमेव नरेंद्र मोदीच आहेत. गेली अनेक दशके शत्रूंच्या द्वेषपूर्ण दृष्टीत दिवस काढणार्या भारताला मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खरी ओळख मिळवून दिली. संस्कृतनुसार ‘प्रजानां हिताय राष्ट्रस्य च उन्नतये यः सर्वान् मन्त्रिणः मार्गदर्शयति सः प्रधानमन्त्री ।’ म्हणजे जो प्रजेचे हित आणि राष्ट्राची उन्नती यांसाठी मंत्र्यांना मार्गदर्शन करतो, तो प्रधानमंत्री (पंतप्रधान) होय ! मोदींचा कार्यकाळ या वचनाची पुष्टी दर्शवतो.
परिवर्तित भारत !

मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीचा आणि सध्याचा भारत यांच्यात पुष्कळ भेद आहे. वर्ष २०१४ पूर्वीच्या काळात भ्रष्टाचाराने गाठलेला उच्चांक, धोरणे आणि निर्णय यांचा अभाव, सातत्याने होणारे बाँबस्फोट अन् आतंकवादी आक्रमणे, नक्षलींच्या कारवायांत होणार्या पोलिसांच्या हत्या यांमध्ये भारत देश पिचला होता; पण आज हाच भारत जगातील प्रमुख शक्तींमध्ये गणला जातो. ‘जी-२०’ परिषद असो, आंतरराष्ट्रीय कूटनीती असो किंवा जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचे वाढते महत्त्व असो, भारताचे महत्त्व सगळीकडे अधोरेखित होत आहे. हा मोदींच्या ध्येय-धोरणांचा परिणाम आहे. ‘प्रधानमंत्री जनधन’, ‘स्वच्छ भारत’, ‘आयुष्मान भारत’, ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ अशा असंख्य योजनांमुळे भारताची पावले विकासाकडे वळू लागली. पायाभूत सुविधा, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, डिजिटल व्यवहार अशा अनेक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली. गरिबांसाठी घरे, गॅस जोडण्या, शौचालये आणि आरोग्यविमा योजना यांमुळे मोदीरूपी सरकार सामान्य नागरिकांच्या दारात पोचले. त्यामुळे मोदी ‘जननायक’ ठरले. आतंकवादाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने आक्रमक होत प्रत्युत्तर देण्याची सिद्धता दर्शवली. त्यांच्या काळात झालेले ‘उरी सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘बालाकोट एअर स्ट्राईक’ ही आक्रमणे म्हणजे भारताच्या इतिहासातील मोठा निर्णायक टप्पा ठरला. यातून ‘भारतावर आक्रमणे करण्याचे दिवस आता संपले आहेत’, असा संदेश शत्रूराष्ट्रापर्यंत गेला. भारतीय संयमाला ‘दुर्बल’ समजणार्यांना भारताच्या प्रत्युत्तरक्षमतेचाही विचार करावा लागला. परिणामी आतंकवादी आक्रमणे, तसेच बाँबस्फोट यांचे प्रमाण लक्षणीयरित्या न्यून झाले. सैनिकांचा आत्मविश्वास वाढला आणि जनतेत राष्ट्रीय अभिमान दृढ झाला. भारताने संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारत शस्त्रसज्जतेलाही गती दिली. आधुनिक युद्धसामग्री, क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने आणि संरक्षण तंत्रज्ञान यांच्या निर्मितीत लक्षणीय प्रगती साधली. साहजिकच भारताची जागतिक पत उंचावली. कलम ३७० हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू-काश्मीर भारताच्या मुख्य प्रवाहात आले. यामुळे मोदी ‘राष्ट्रनेता’ झाले. अयोध्येतील श्रीराममंदिराची पूर्तता करून मोदींनी ‘युगपुरुष’ हा बहुमान पटकावला. कोरोना महामारीच्या संकटकाळात त्यांनी भारतियांच्या आरोग्याचे रक्षण केलेच; पण अडचणीत सापडलेल्या बलाढ्य राष्ट्रांनाही साहाय्याचा हात दिला. जागतिक योग दिनाच्या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग आणि आयुर्वेद यांचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले. आज भारतीय अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर पोचली आहे. मोदींच्या अथक प्रयत्नांतून भारताची यशस्वी वाटचाल चालू आहे. असे असले, तरी मोदी सरकारकडून हिंदु समाजाच्या काही अपेक्षा आहेत. ‘त्याही मोदी निश्चित पूर्ण करतील’, अशी हिंदूंना आशा आहे.

हिंदूंच्या अपेक्षांची पूर्तता व्हावी !

हिंदूंच्या दृष्टीने मोदी प्रशासक नाहीत, तर ते हिंदु संस्कृतीच्या पुनर्जागरणाचे नेतृत्व करणारे शिल्पकार आहेत. हिंदूंच्या दृष्टीने भारतात समान नागरी कायदा कधी लागू होणार ? राष्ट्रीय एकात्मता साधायची असेल, तर सरकारने लवकरात लवकर यावर निर्णायक पाऊल उचलावे. देशातील सहस्रो हिंदु मंदिरे सरकारी अधिपत्याखाली आहेत; मात्र अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे त्यांच्याच कह्यात आहेत. ही विसंगती कधी दूर होणार ? ‘मंदिरांचे उत्पन्न हे मंदिरांचा विकास, धर्मशिक्षण, वेदपाठशाळा, तसेच हिंदूंचे कल्याण यांसाठी वापरले जावे’, अशीही हिंदूंची मागणी आहे. याविषयी सरकारने राष्ट्रीय धोरण आखावे. नवनवी मंदिरे उभारण्यासह प्राचीन मंदिरांचे संरक्षण आणि संवर्धन यांसाठीही प्रयत्न करावेत. त्यातूनच भारताची अद्वितीय मंदिर संस्कृती टिकून राहील. हीच संस्कृती देशाच्या पुनरुत्थानाला बळ देत आहे आणि देणार आहे. धर्मांतराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा करावा. हिंदूबहुल देशातील हिंदूच आज सर्वाधिक असुरक्षित आहेत. ठाम भूमिका घेऊन त्यांच्या सुरक्षेची हमी पंतप्रधान देतील का ? शिक्षणातून भारतीय संस्कृतीचा गौरव झाल्यास तो वैभवशाली वारसा पुढील पिढीपर्यंत पोचून राष्ट्राभिमानी आणि सुसंस्कारित पिढी घडेल. यासाठी शिक्षणव्यवस्थेत व्यापक पालट आवश्यक आहेत. ‘आतंकवादमुक्त भारत’ हे स्वप्नही आगामी वर्षांत मोदींनी पूर्ण करावे. याच्याच जोडीला लोकसंख्या नियंत्रण, तसेच गोसंरक्षण यांसाठी कायदा आणणे, विस्थापित हिंदूंच्या संदर्भात विशेष पुनर्वसन आणि सुरक्षा योजना राबवणे, सीमापार असलेल्या हिंदूंच्या वारसा स्थळांचे संरक्षण करणे, संस्कृत विद्यापिठांचा विस्तार करणे, धार्मिक अल्पसंख्यांक संस्थांच्या निधीचा लेखाजोखा ठेवणे आदी महत्त्वपूर्ण ध्येयेही पंतप्रधानांनी दृष्टीक्षेपात ठेवावीत.
महान नेत्यांचे मूल्यमापन केवळ त्यांच्या यशावर नव्हे, तर त्यांनी अपूर्ण राहिलेल्या अपेक्षा कशा पूर्ण केल्या, यावर होत असते. त्यामुळे आगामी काळात हिंदूंच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी वेगाने वाटचाल करावी, असे कोट्यवधी हिंदूंना वाटते. यातूनच अधिक भक्कम, समर्थ आणि सांस्कृतिकदृष्ट्या आत्मनिर्भर भारत निर्माण होईल.
३७० कलम रहित करणे आणि श्रीराममंदिराची उभारणी, ही पंतप्रधान मोदी यांची महान कार्ये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
संपादकीय : सत्तापिपासू तृणमूल बंडखोर !
जग अस्थिर; पण भारत आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करत आहे ! : PM Narendra Modi
नियत, नीती आणि निर्णय यांमुळे देशाच्या विकासाला गती ! : PM Narendra Modi
संपादकीय : भारत युद्धसज्ज !
Prime Minister Narendra Modi : निवडून आलेले आणि १२ वर्षे पदावर राहिलेले नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान !