नूतनीकरण होऊनही अस्वच्छतेमुळे माणगाव (रायगड) बसस्थानकाची दुर्दशा  !

बसस्थानकाच्या परिसरात असलेली अस्वच्छता

माणगाव, १० जून (वार्ता.) – रायगड जिल्ह्यातील माणगाव बसस्थानकाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. प्रशस्त बसस्थानक, आधुनिक प्रकाश दिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रवाशांना बसण्याची व्यवस्था, जुन्या बांधकामाची डागडुजी, प्रतीक्षालयात नवीन फरशी, बसण्यासाठी मार्बलचे कठडे, नवीन दिवे, पंखे, ‘सीसीटीव्ही छायाचित्रक’ आदी सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत; परंतु प्रवासी करत असलेल्या अस्वच्छतेमुळे आणि येथे नियमित चांगली स्वच्छता न केल्यामुळे बसस्थानकाच्या नूतनीकरणाला गालबोट लागत आहे. (अस्वच्छता करणार्‍या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारला पाहिजे ! – संपादक)

अशी आहे बसस्थानकावर अस्वच्छता !

१. बसस्थानकावरील कचराकुंड्यात कचरा टाकण्याऐवजी बसस्थानकाच्या परिसरात सर्वत्र कचरा टाकलेला दिसतो. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, बिस्किटचे पुडे, वेफर्स यांची वेष्टने, चहाचे कागदी कप, शिल्लक खाद्यपदार्थ बसस्थानकाच्या परिसरात सर्वत्र पुष्कळ प्रमाणात पडलेले दिसतात.

उपहारगृहाच्या बाहेर चहाच्या पेल्यांनी कचर्‍याची बादली भरल्यामुळे आजूबाजूला टाकण्यात आलेले कप

२. चहाच्या दुकानाच्या बाहेरील कचर्‍याचा डबा पूर्णपणे भरला होता. तो रिकामा करण्यात आला नव्हता किंवा रिकाम्या पेल्यांसाठी बाजूला अन्य पिशवीही ठेवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी रिकामे पेले कचर्‍याच्या डब्याच्या बाहेर टाकले होते.

३. चहाच्या स्टॉलच्या बाहेरील कचर्‍याचा डब्याच्या बाजूची भिंत, बसस्थानकावरील फुलदाण्या यांवर पान-तंबाखू खाऊन पिचकार्‍या टाकण्यात आल्या होत्या. यामुळे रंगकाम केलेल्या भिंती विद्रूप झाल्या आहेत.

बसस्थानकाच्या या स्थितीविषयी बसस्थानकाच्या अधिकार्‍यांना ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘प्रवासी स्वच्छता पाळत नाहीत. कचरा कुठेही फेकतात. उपलब्ध सुविधांचा सुयोग्य उपयोग करत नाहीत. माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील स्थानक असल्यामुळे येथे गर्दी अधिक असते. त्या तुलनेत स्वच्छता कर्मचारी एकटाच आहे. आम्ही अधिक मनुष्यबळाची मागणी केली आहे. (आधुनिक स्थानकासमवेत ते स्वच्छ ठेवण्यासाठी तेवढेच स्वच्छता कर्मचारी का नाही नेमले ? आगार व्यवस्थापनाला हे लक्षात का आले नाही ? – संपादक)

-बसस्थानकांच्या दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह पाठवा !

आपल्या भागातील बसस्थानकेही अस्वच्छ असल्यास, पिण्याचे पाणी, बसण्यासाठीची बाकडी, कचराकुंड्या अशा किमान सुविधाही नसल्यास, बसस्थानकांच्या अशा दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह ‘सनातन प्रभात’साठी ‘९२२५६३९१७०’ या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावर पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन स्वच्छता मोहिमेसाठी सहकार्य करा !


हे वाचा → SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !


नागरिकांना आवाहन !

‘बसस्थानकांची स्वच्छता’ हे जसे एस्.टी. महामंडळाचे दायित्व आहे, तसेच ‘सुजाण नागरिक’ म्हणून आपलेही दायित्व आहे. ‘एस्.टी. ही सर्वसामान्यांचा आधार आहे’, याची जाणीव ठेवून बसस्थानके स्वच्छ-सुंदर राखण्यासाठी प्रत्येक नागरिकानेही या अभियानामध्ये योगद्यान द्यावे.

सूचना नोंदवा !

वल्लभनगर येथील बसस्थानकाच्या दु:स्थितीविषयी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या  ‘https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Suggestions.aspx’ या लिंकवर ‘सनातन प्रभात’ने नोंदवली आहे. आपणही आपली सूचना त्वरित नोंदवा !